एखाद्या व्यक्तीला मनोविकाराने ग्रासले की सारेच संपते, या धारणेतून रुग्ण आणि रुग्णाच्या कुटुंबीयांना बाहेर काढण्याची महत्त्वाची जबाबदारी डोंबिवलीतील ‘मनोदय ट्रस्ट आणि मानस सायकॉलॉजिकल हेल्थ सेंटर’ पार पाडत आहे. आजाराची लक्षणे दूर झालेल्या रुग्णांनी आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहावे आणि लवकरात लवकर स्वावलंबी व्हावे, यासाठी सुरू असलेल्या संस्थेच्या प्रयत्नांना आता यश येऊ लागले आहे…
‘मनोदय ट्रस्ट’च्या वतीने मानसिक आजाराची लक्षणे बरी झालेल्या रुग्णांसाठी स्वमदत गटांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. त्यांना वाचन, लेखन, हस्तकलेशी संबंधित कौशल्ये विकसित करण्यास प्रोत्साहन दिले जाते. रोजगार मिळवून देण्याचाही प्रयत्न केला जातो.
आमचा रुग्ण आता बरा झाला आहे, पण पुढे काय करायचे हा प्रश्न आहे. तो घरातच बसून असतो. त्याच्या शिक्षणासाठी काही करता येईल का, त्याला काही काम मिळू शकेल का?’ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अद्वैत लक्ष्मण पाध्ये यांच्याकडे असे प्रश्न घेऊन अनेक मनोरुग्णांचे नातेवाईक येत. उपचार आणि समुपदेशनाने मानसिक आजारांची लक्षणे सौम्य झाली तरी आयुष्य रुळांवर येण्यास वेळ लागतो. अशावेळी घरात एकाच जागी बसून राहिलेल्या रुग्णांत अस्वस्थता निर्माण होते. अशा रुग्णांचे नातेवाईक ‘रोज काही वेळ तुमच्या रुग्णालयात आणून ठेवले, तर चालेल का,’ अशी विचारणा करत. या रुग्णांच्या पुनर्वसन, प्रबोधनासाठी, त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना देत राहण्यासाठी, क्षमता व कौशल्ये विकसित करण्यासाठी ठोस प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे डॉ. पाध्ये यांना वाटू लागले आणि त्यातूनच २००८मध्ये ‘मनोदय ट्रस्ट’ची स्थापना झाली.
मनोरुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना कोणतेही शुल्क न आकारता मोफत आधार देणे, पुनर्वसनास हातभार लावणे, त्यांच्या क्षमतांचा पूर्ण विकास व्हावा म्हणून प्रयत्न करणे आणि मानसिक समस्यांविषयी जनजागृती ही ट्रस्टची मुख्य उद्दिष्टे आहेत. डॉ. अद्वैत पाध्ये ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आहेत. सुरुवातीच्या काळात रुग्णांच्या पालकांना एका व्यासपीठावर आणण्यात आले. केईएम रुग्णालयाचे ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ आणि प्राध्यापक डॉ. प्रकाश प्रधान यांच्या उपस्थितीत रुग्णांच्या कुटुंबीयांचे चर्चासत्र घेण्यात आले. डॉ. प्रधान यांनी मनोविकार, उमद्या वयात या विकारांची लक्षणे दिसू लागल्यावर काय करावे, अशा रुग्णांशी कसे वागावे, कुटुंबीयांनी होणाऱ्या त्रासाला कसे सामोरे जावे, रुग्णाच्या वाढत्या वयाबरोबर बदलत जाणाऱ्या भावना, त्यांच्या भविष्यासाठी टाकायची पावले या विषयांवर मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनातून ‘स्वमदत गट’ स्थापन करण्याची संकल्पना पुढे आली.
मनोविकाराची लक्षणे बरी झालेल्या रुग्णांना ‘शुभार्थी’, तर त्यांच्या नातेवाईकांना ‘शुभंकर’ म्हटले जाते. तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि पालकांशी चर्चा करून स्किझोफ्रोनिया झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी ‘आधारवड’ हा शुभंकरांचा पहिला स्वमदत गट स्थापन करण्यात आला. ‘आधारवड’च्या मंचावर मनोरंजनाचे कार्यक्रम, कौशल्यांचे सादरीकरण करण्यात येऊ लागले. विचारांची देवाणघेवाण होऊ लागली. रुग्णांच्या चिंतेत असलेल्या पालकांना या मंचावर सकारात्मक ऊर्जा मिळत असे. परिस्थितीवर उमेदीने मात कशी करावी, याविषयी ते परस्परांशी चर्चा करत. एकमेकांना धीर देत. दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी ३० शुभंकर उपस्थित असतात. हा स्वमदत गट २० वर्षे सुरू आहे.
शुभार्थींसाठी ‘फिनिक्स’ स्वमदत गट स्थापन करून त्यांना एका मंचावर आणण्यात आले. या गटात आता ३० शुभार्थी आहेत. त्यांच्यात आत्मविश्वास, सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे काम या गटात केले जाते. योग, नृत्योपचार, विविध प्रकारचे खेळ, कौशल्ये विकसित करण्यासाठी या मुलांकडून रद्दीपासून पिशव्या, रंगीत पेपरांपासून कागदी पर्यावरणस्नेही फुले, घरघंटीवर विविध प्रकारची पिठे, कपड्यांवर आकर्षक वेलबुट्टी अशी हस्तकौशल्याची कामे करून घेतली जातात. शुभार्थींनी तयार केलेल्या वस्तूंची सामाजिक संस्थांच्या माध्यमातून, अनेक मंचावर विक्री केली जाते. या माध्यमातून मिळणारे पैसे शुभार्थींना त्यांची उपस्थिती, उत्पादकता, गुणवत्ता पाहून प्रोत्साहनपर वेतन म्हणून दिले जातात. आपण केलेल्या कामाचा परतावा म्हणून आपणास पैसे मिळतात, अशी एक कौतुकाची भावना शुभार्थींमध्ये निर्माण होऊन ते अधिक तन्मयतेने या उपक्रमांत झोकून देऊन काम करतात.
स्वमदत गटांत शुभार्थी आणि शुभंकर आपले मन मोकळे करू लागले. एकमेकांना आधार देऊ लागले. त्यातून शुभार्थींमधील एकारलेपणा दूर होऊ लागला. सांघिक काम केल्यामुळे रुग्णांत सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. नेहमी चिंतेत आणि अस्वस्थ असणारे स्वमदत गटांच्या माध्यमातून खेळीमेळीच्या वातावरणात राहू शकतात, याची प्रचीती आली. अपस्मार या आजाराचे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी ‘प्रोत्साहन’, ऑब्सेसिव कम्पल्सिव्ह डिसऑर्डरच्या (ओसीडी) रुग्णांसाठी ‘चिंतन’, डिमेन्शिया झालेल्या रुग्णांच्या शुभंकरांसाठी ‘उत्तररंग’, स्किझोफ्रेनियाच्या नोकरी, व्यवसाय करणाऱ्या शुभार्थींसाठी ‘उडान’, बायपोलर डिसऑर्डरच्या शुभार्थींचा ‘इंद्रधनुष्य’, डिमेन्शिया, पार्किन्सनच्या प्राथमिक स्तरावरील रुग्णांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मनमेंदू संवर्धनासाठी ‘मेधावी’ हे स्वमदत गट गेली १७ वर्षे सक्रिय कार्यरत आहेत.
स्वमदत गटांत सर्वाधिक भर शुभार्थींची कौशल्ये आणि क्षमता विकसित करण्यावर दिला जातो. नृत्योपचार केले जातात, विविध भाषा शिकवल्या जातात. संगणकीय व डिजिटल तंत्राची ओळख करून दिली जाते. किशोरवयीन मुलांच्या बुद्धिमत्तेचे पैलू विकसित करणे, ताणतणाव चिंतानिवारण, पालकत्व, राग नियंत्रण, लग्न समुपदेशन, विवेकनिष्ठ उपचारपद्धतीसाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा आयोजित केल्या जातात. ‘फिनिक्स’ स्वमदत गटातील शुभार्थींसाठी ग्रंथालय आहे. त्यांच्या आवडीची, मनाला उभारी देणारी पुस्तके या ग्रंथालयात आहेत. त्यांना विविध विषय देऊन लेख लिहिण्यास सांगितले जाते. या लेखसंग्रहाचे ई-मासिक तयार केले जाते. मानसिक आरोग्याबद्दल जनजागृती करणारे चित्रपट, लघुपट दाखविले जातात. मनोविकारांवर प्रबोधनात्मक चित्रफिती तयार करून, नाटिका बसवून त्या माध्यमातून शुभार्थींना सकारात्मक विचार देण्याचा प्रयत्न केला जातो. समाजापासून दूर गेलेला शुभार्थी आपली कौशल्ये स्वसामर्थ्याने विकसित करून पुन्हा समाजाचा एक जबाबदार घटक होईल, असे काम स्वमदत गटांच्या माध्यमातून मनोदय ट्रस्ट करत आहे.
करोनाकाळात सर्व व्यवहार ठप्प होते. शुभार्थी, शुभंकर यांच्यात अस्वस्थतेचे वातावरण होते. पण, या स्वमदत गटांना ऑनलाइन माध्यमातून संघटित ठेवण्याचे काम ट्रस्टने त्या काळातही सुरू ठेवले. शाळांमध्ये किशोरवयीन मुलांसाठी लैंगिकता समुपदेशन, मोबाइल आणि इतर व्यसनांविरोधात जनजागृती उपक्रम राबविले जातात. तणाव नियोजनावर ‘जाणीव कार्यशाळा’ घेतली जाते. हे गट चालवताना आता तंत्रज्ञानाचीही मदत घेतली जाते. स्वमदत गटांच्या माध्यमातून कौशल्ये विकसित झालेले शुभार्थी स्थानिक आस्थापना, दुकाने, रुग्णालये, सामाजिक संस्थांत नोकरी करत आहेत. काहींनी स्वत:चे गाळे घेऊन व्यवसाय सुरू केले आहेत. इतरही शुभार्थींनी याच वाटेवर वाटचाल करावी, यासाठी ‘मनोदय ट्रस्ट’ प्रयत्नशील आहे.
मनोदय ट्रस्ट
Manodaya Trust
या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्याबरोबर देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच भ्रमणध्वनी क्रमांक लिहावा. संस्था ‘८०-जी’ करसवलतपात्र आहे.
ऑनलाइन देणगीसाठी तपशील
● बँकेचे नाव : कॉसमॉस बँक, डोंबिवली शाखा
● चालू खाते क्रमांक : ०७५१००१०९२९४
● आयएफएससी : सीओएसबी ०००००७५
‘मनोदय ट्रस्ट’, गौतमेश्वर धाम, तिसरा मजला, टंडन रोड, दत्तनगर चौक, डोंबिवली (पूर्व). देणगीदाराने ८०जी रिसिटसाठी आपले पूर्ण नाव, पत्ता, पॅन नंबर इत्यादी माहिती स्वतच्या ईमेल-आयडीसह manodayatrust@gmail.com किंवा ९८६९७१२६५२ या क्रमांकावर पाठवावी.
एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.
ऑनलाइन देणगीची माहिती
दिल्ली कार्यालय – संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१. ०१२०- २०६६५१५००
धनादेश येथे पाठवा…
‘लोकसत्ता’ला ७४००१९७५४९ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावी.
मुंबई कार्यालय – लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, ०२२-६७४४०२५०
पुणे कार्यालय – संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे- ४११००४. ०२०-६७२४११२५
नागपूर कार्यालय – संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, अॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ – २२३०४२१
ठाणे कार्यालय – संपादकीय विभाग, फ्लॅट नं.५, तिसरा मजला, होशबानो मॅन्शन, तनिष्क शोरूमच्या वर, गोखले रोड, नौपाडा ठाणे (प.) ४००६०२. ०२०-२५३८५१३२
महापे कार्यालय – संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००
- भगवान मंडलिक