शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना प्रामुख्याने कारणीभूत ठरते ते शेतीसाठी घेतलेले कर्ज. कर्ज घ्यायचे, शेतीत गुंतवायचे. पण दुष्काळ, नापिकी यामुळे ते फेडण्याइतपतही उत्पन्न शेतीतून मिळत नाही. बहुतांश शेतकरी कर्जबाजारी होतात. कर्जाच्या वाढत्या बोजाने त्रस्त होऊन त्यातलेच कोणी मृत्यूला जवळ करतात.. हे रोखायचे कसे? त्यासाठी कर्जमाफी, कर्जमुक्ती हा एक उपाय ठरू शकेल का? सरकारी पातळीवर याबाबत अजूनही ‘अभ्यास’ सुरू असताना, एका संस्थेने मात्र शेतकऱ्यांचे कर्ज फेडण्याचा उपक्रमच हाती घेतला आहे. तिचे नाव ‘आपुलकी’.
ग्रामीण महाराष्ट्रातून शहरांमध्ये स्थायिक झालेल्या २० अभियंत्या तरुणांनी ‘आपण शेतकऱ्यांचेही देणे लागतो’ या भावनेतून पाच वर्षांपूर्वी ही संस्था स्थापन केली. कुठल्याही सरकारी अनुदानाशिवाय लोकांच्या सहकार्यातून संस्थेचे काम चालते. संस्थेचे ना कार्यालय, ना पगारी नोकर. सगळे वेळातला वेळ काढून संस्थेसाठी कार्य करणारे. शेतकऱ्यांचे सातबारे कोरे करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. या तरुणांनी काय केले? कर्जबाजारी शेतकऱ्यांची माहिती मिळवली. त्यातील गरजू शेतकरी निवडले. आतापर्यंत २९ शेतकऱ्यांची सुमारे १३ लाख रुपयांची संपूर्ण कर्जमुक्ती करून त्यांचे सातबारे कोरे केले. ही तर केवळ सुरुवात होती..
राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढू लागल्याने अनेक लोक अस्वस्थ झाले होते. अभिजीत फाळके, अमोल शिरामवार यांसारख्या तरुणांमधील ही अस्वस्थता एका सकारात्मक ऊर्जेत परावर्तित झाली. त्यांच्या ‘आपुलकी’शी जगभरातील सुमारे ८ हजार सभासद जुळले आहेत. त्यांच्या मदतीतूनच संस्थेचे काम चालू आहे. यातील अनेक जण परदेशात स्थायिक झालेले. पण त्यांच्या संवेदनशील मनाचा दमदार हुंकार ‘आपुलकी’तून व्यक्त होतोय. अभिजीत फाळके सांगतात, ‘संस्थेनं शेतकऱ्यांसाठी अनेक कार्यशाळा आयोजित केल्या.
‘उडान’ हे त्यांचे नाव. त्यातून सुमारे सहा हजार शेतकऱ्यांना नि:शुल्क प्रशिक्षण देण्यात आले आहे. ‘स्व. रमेश तेंडुलकर कृषी अवजार बँके’मार्फत दोन वर्षांमध्ये १४३० एकरांत शेतकऱ्यांना अल्पदरात शेतीची सर्व कामे करून दिली. २९२ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील विद्यार्थ्यांना प्रकाशवाट या उपक्रमांतर्गत सौर दिवे भेट देऊन शिक्षणातील काळोखाचा अडथळात दूर केला. नागपूर जिल्ह्य़ातील कतारीसावंगा येथे २५० देशी बियाणे जतन करून ठेवण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना संत्री, हापूस आंबे विकण्यासाठी सहकार्य, ३७७ आत्महत्याग्रस्त कुटुंबांना रोजगार निर्मितीसाठी सढळ हस्ते मदत, २२ शेतकरीपुत्रांना शिक्षणासाठी आर्थिक मदत, सचिन तेंडुलकर यांच्या खासदार निधीतून उस्मानाबाद जिल्ह्यातील डोनजे हे गाव दत्तक घेण्यास पुढाकार, पाणंद रस्ते, पाझर तलावांचे खोलीकरण, ग्रामीण महाराष्ट्रातील ३ शाळा डिजिटल करण्यासाठी सहकार्य, असे अनेक उपक्रम संस्थेमार्फत राबवण्यात येत आहेत.’
अभिजीत फाळके सांगतात, ‘आपुलकी ही संस्था शेतकऱ्यांना केवळ आर्थिक मदत देत नाही, तर त्यांना मानसिक आधारही देते. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्यांना पिठाची गिरणी, शिलाई मशीन यांसारखी रोजगार मिळवून देणारी साधने देऊन त्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी मदत केली जाते. मध्यंतरीच्या काळात विदर्भ आणि मराठवाडय़ात गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले. सरकारी मदत मिळेल तेव्हा मिळेल, आपण आधी धावून गेले पाहिजे, या भावनेतून ‘माझी संवेदना, माझा शेतकरी’ हे अभियान राबवण्यात आले. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप करण्यात आले. शहरी लोकांना शेती चळवळीशी जोडण्याचे आणखी एक काम संस्थेने हाती घेतले आहे. शेतकऱ्यांना जर मदत करायचीच असेल, त्यांचा शेतमाल थेट विकत घ्या, असा प्रचार विविध कंपन्यांमध्ये जाऊन करण्यात आला.’
‘आपुलकी’सारख्या संस्था मदत करताहेत, पण यातून सर्व प्रश्न सुटतील, असे नाही. शेतकऱ्यांना मिळणारे पीककर्ज, त्याला होणारे उत्पन्न, कर्जाच्या परतफेडीची व्यवस्था, प्रापंचिक खर्चाचा ताळमेळ, असे अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांच्या आयुष्यातील ताण वाढलेला आहे. पण त्याने हतबल होऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलायला नको, ही खरी या युवकांची तळमळ आहे. ‘तुम्ही एकटे नाहीत. आम्ही शहरांमध्ये असलो, म्हणून शेतीची नाळ तुटलेली नाही. तुम्ही हाक द्या, धावून येऊ,’ असे या तरुणांचे आवाहन असते. समस्या डोंगराएवढय़ा आहेत. तीस-पस्तीस शेतकऱ्यांनी कर्जमुक्त होणे, ही बाब छोटीशी. पण सर्वानी हातभार लावला, तर समस्या कमी होऊ शकतात, हेच या शहरी तरुणांनी दाखवून दिले आहे.