फिरवून भरारा गोफण..

आता प्रादेशिक पक्षांनी भाजपविरोधी राजकारणाची राष्ट्रीय आघाडी तयार करावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाल्यास नवल वाटायला नको!

(संग्रहित छायाचित्र)

सौरभ कुलश्रेष्ठ

भाजपला वगळून शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सत्ता स्थापन झाल्यामुळे संजय राऊत यांचे केवळ शिवसेनेतच नव्हे, तर दिल्लीच्या राजकारणातही वजन वाढले आहे. त्या जोरावर आता प्रादेशिक पक्षांनी भाजपविरोधी राजकारणाची राष्ट्रीय आघाडी तयार करावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाल्यास नवल वाटायला नको!

बालकवींच्या एका कवितेत ‘फिरवून भरारा गोफण..’ असे वर्णन येते. कवितेमधील त्याचा संदर्भ वेगळा असला, तरी विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा यासाठी भाजपवर सातत्यपूर्ण व आक्रमक हल्ला चढवत नेटाने शिवसेनेचे राजकीय शिवार राखण्यासाठी झटलेल्या खासदार संजय राऊत यांना ते लागू पडते. राऊतांच्या गोफणीतून सुटलेल्या अणकुचीदार शब्दांनी पक्ष म्हणून भाजपला आणि काही वेळा विशिष्ट नेत्यांचा नेमका वेध घेत पुरते घायाळ केले. शिवसेना आणि भाजपचे खरेच फाटले आहे याचा स्पष्ट राजकीय संदेश काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्या पत्रकार परिषदांमधून देणे आणि त्याचवेळी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांशी पर्यायी समीकरणे जुळवण्यासाठी अनौपचारिक चर्चा सुरू करणे अशी दुहेरी आणि मोलाची कामगिरी राऊत यांनी पार पाडली.

संजय राऊत यांना आधीपासूनच देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील भाजपबद्दल आत्मीयता नव्हती. आपल्या लेखांतून अनेकदा राऊत यांनी तसे संकेत दिले होते. एकदा तर मुख्यमंत्रीपद गेले की कोणी विचारत नाही, असा संदेश देताना- ‘अनेक माजी राज्यात फिरत आहेत,’ असा टोमणा राऊत यांनी लगावला होता. भाजपऐवजी राऊत यांचा ओढा राष्ट्रवादीकडे असल्याचे जगजाहीर होते. निवडणुकीत राज्यातील मतदारांनी भाजप-सेना महायुतीला स्पष्ट बहुमत दिले. पण शिवसेनेला वगळून अपक्षांच्या मदतीने भाजप बहुमत सिद्ध करू शकणार नाही, असे संख्याबळ दिले. निकालाच्या दिवशी हे चित्र स्पष्ट होताच सत्तेच्या समान वाटपाच्या भाजपच्या घोषणेच्या आधारे शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदी बसवण्याची ‘हीच ती वेळ’ असल्याचे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आले. शिवसेनेतील इतर ज्येष्ठ नेते हे भाजपसोबतची युती तोडण्यास अनुकूल नसताना खासदार संजय राऊत यांनी पक्षांतर्गत चर्चेत- शिवसेनेने ही संधी सोडू नये, अशी ठाम भूमिका मांडली आणि उद्धव यांना पर्यायावर विचार करण्यास राजी केले. नशिबाने राऊत यांना साथ दिली आणि ‘काय ठरलंय’ याबाबत मौन बाळगणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘मुख्यमंत्रीपदाबाबत काहीच ठरले नव्हते’ असे विधान करून टाकले. अशाच संधीची वाट पाहणाऱ्या उद्धव यांनी मग फडणवीस यांची कार्यशैली नापसंत असणाऱ्या संजय राऊत यांच्यावर भाजपवर हल्ले चढवण्याची कामगिरी सोपवली. त्याच संध्याकाळी राऊतांनी भाजपच्या या विधानामुळे उद्धव ठाकरे नाराज झाल्याचे स्पष्ट करत सत्तावाटपाची चर्चा करण्यासाठीची बैठक शिवसेनेने रद्द केल्याचे जाहीर केले.

त्या दिवसापासून पुढचे सलग दोन आठवडे संजय राऊत यांच्या गोफणीतून भाजपवर रोज मारा सुरू झाला. शिवसेनेपुरते या नाटय़ाचे दिग्दर्शक उद्धव असले तरी पटकथा राऊतच लिहीत होते. सत्तावाटपात अधिक चांगली खाती मिळवण्यासाठी हे सुरू आहे, असे भाजपच्या नेत्यांचे मत होते. कारण यापूर्वीही उद्धव यांनी राऊतांना आक्रमक भूमिका घेण्यास सांगत युतीमध्ये आपल्या वाटय़ाच्या जागा वाढवून घेतल्या होत्या. पण आठवडाभरानंतरही राऊतांचा मारा आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच्या गाठीभेटी वाढल्या. त्यानंतर मात्र शिवसेना खरोखरच वेगळा विचार करत असल्याची भाजपचीच नव्हे, तर दोन्ही काँग्रेसचीही खात्री पटली. शरद पवारांच्या मार्गदर्शनानुसार काँग्रेसच्या नेत्यांशी संवाद ठेवला. त्यांना उद्धव यांच्याशी जोडून दिले. भाजपने ‘युती तोडणारा नेता’ असा हल्ला राऊतांवर चढवला. पण तेच राऊत यांचे यश होते. शिवसेना सोबत येत नसल्याने सरकार स्थापन करू शकत नाही, असे जाहीर करत फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. ते माजी मुख्यमंत्री झाले. भाजपविरोधी लढाईतील राऊत यांचा तो पहिला विजय होता. त्यानंतर सेनेच्या नेतृत्वाखाली दोन्ही काँग्रेसचे सरकार यावे यासाठी शरद पवार हेच निर्णायक ठरतील, हे लक्षात घेऊन भाजपच्या नेत्यांना ‘मातोश्री’वर बोलावणाऱ्या उद्धव यांना पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’वर नेण्याची कामगिरीही राऊत यांनी पार पाडली. शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठीचे पत्र देण्यात दोन्ही काँग्रेसनी आयत्या वेळी घेतलेल्या माघारीचा प्रसंग सोडला, तर राऊतांनी चोख कामगिरी पार पाडली. त्यामुळेच राऊत रुग्णालयात दाखल झाल्यावर दोन्ही काँग्रेसचे नेते त्यांना भेटायला पोहोचले.

भाजपला वगळून शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सत्ता स्थापन झाल्यामुळे संजय राऊत यांचे केवळ शिवसेनेतच नव्हे, तर दिल्लीच्या राजकारणातही वजन वाढले आहे. त्या जोरावर आता प्रादेशिक पक्षांनी भाजपविरोधी राजकारणाची राष्ट्रीय आघाडी तयार करावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाल्यास नवल वाटायला नको. गोव्यात लक्ष घालत त्यांनी छोटीशी झलक दाखवलीच आहे!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mp sanjay raut shiv sena abn

ताज्या बातम्या