देशातील आरोग्य विज्ञान विद्यापीठांशी अ‍ॅलोपॅथीखेरीज आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी अशा चारही उपचारपद्धतींची विविध वैद्यकीय महाविद्यालये संलग्न आहेत. म्हणजे, या उपचारपद्धतींतील गुणांचे लाभ एकमेकींना मिळावेत, यासाठी ‘आंतरपॅथी संशोधन’ होण्यासाठीचा प्रशासकीय डोलारा तयार आहे. परंतु अपवाद वगळता, विद्यापीठ स्तरावरील उपक्रम म्हणून हे संशोधन होताना दिसत नाही. तसे होणे या देशातील सर्वसामान्य रुग्णांसाठी कसे गरजेचे आहे, अशी बाजू मांडणारा लेख.
भारत हा जगातील एकमेव देश आहे, जिथे अनेक शतकांपासून आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी तसेच गेल्या दोन शतकांपासून अ‍ॅलोपॅथी या वैद्यकाच्या चारही शाखा समाजाला सेवा पुरवत आहेत. आयुर्वेद तर भारताचे वैद्यकशास्त्र. अथर्ववेदापासून याची उत्पत्ती झाली. होमिओपॅथीचा जन्म जरी जर्मनीत झाला तरी होमिओपॅथी डॉक्टरांची सर्वात जास्त संख्या आज भारतात आहे. युनानी डॉक्टरांची भारतातील संख्यादेखील लक्षणीय अशी आहे. देशभरात अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरांइतकीच संख्या या आयुर्वेद- होमिओपॅथी- युनानी डॉक्टरांची आहे. उपरोक्त चारही प्रकारच्या डॉक्टरांना या देशात कोठेही वैद्यक व्यवसाय करण्याची कायदेशीर परवानगी आहे.
अ‍ॅलोपॅथीला राजाश्रय आहे. जगभरात होणाऱ्या संशोधनामुळे दररोज त्यात नवीन ज्ञानाची भर पडताना दिसते. साहजिकच पुराव्यांवर आधारित अशा या वैद्यक शाखेने आरोग्यसेवा क्षेत्रात आघाडी घेतली आहे. परंतु ही सेवा दिवसेंदिवस महाग होत चालली आहे. ती गरीब, ग्रामीण लोक यांना अप्राप्य होऊ लागली आहे. अ‍ॅलोपॅथीच्या या प्रचंड रेटय़ातही आयुर्वेद, होमिओपॅथी त्यांचे अस्तित्व टिकवून आहेत याचे मुख्य कारण म्हणजे समाजाला त्या पॅथी हव्या आहेत. संधिवात, त्वचेचे विकार, दमा, तसेच वाढत्या वयाशी संबंधित विकारांसाठी लोकांचा आयुर्वेद वा होमिओपॅथीवर जास्त विश्वास आहे. सर्वसामान्य लोकच काय पण अ‍ॅलोपॅथिक डॉक्टर मंडळींपैकीही काही जण स्वत:च्या वा त्यांच्या नातेवाइकांच्या काही विकारांसाठी आयुर्वेद व होमिओपॅथीची मदत घेतात हे आम्ही केलेल्या एका पाहणीतून स्पष्ट झाले.
आयुर्वेद/ होमिओपॅथी कितपत प्रभावी आहेत हा वादाचा विषय आहे. यावर अनेक डॉक्टरांच्या टोकाच्या भूमिका आहेत. होमिओपॅथी म्हणजे तर केवळ ‘प्लॅसिबो’ किंवा मानसिक उपचार आहे, इथपर्यंत टीका झालेली आहे. आयुर्वेदिक उपचार म्हणजे वर्ष- दोन र्वष दवाखान्याच्या खेटय़ा-चकरांची हमी असेही कुचेष्टेने म्हटले जाते! दुसरीकडे या पॅथीच्या डॉक्टरांच्या कर्करोगापासून ते एड्ससारख्या अनेक असाध्य रोगांवर यशस्वी उपचार केल्याच्या जाहिराती अनेक वृत्तपत्रांतून वाचायला मिळतात. अशा यशोगाथा लाभार्थीच्या मौखिक प्रसारातूनही समाजात पसरतात. या सगळ्यामुळे सामान्य माणूस चक्रावून जातो. त्याला कशावर विश्वास ठेवायचा तेच कळत नाही. याची परिणती त्याचे आíथक व मानसिक शोषण होण्यात होते.
म्हणूनच आज खरी गरज आहे ती आंतरपॅथी संशोधनाची. हे संशोधन होणे अनेक कारणांसाठी महत्त्वाचे आहे. एक म्हणजे भारतीय लोकांचा या सर्व पॅथींवर विश्वास आहे. दुसरे म्हणजे अनेक शतके या पॅथी त्यांचे अस्तित्व टिकवून आहेत. तिसरे म्हणजे काही आजारांच्या बाबतीत अ‍ॅलोपॅथीच्या मर्यादा स्पष्ट झाल्याने पर्यायांचा विचार होणे आवश्यक आहे. अ‍ॅलोपॅथीच्या सर्वमान्य उपचारांना जर त्याहून सुरक्षित, स्वस्त व प्रभावी पर्याय मिळण्याची शक्यता असेल तर त्यावर संशोधन होणे अगत्याचे आहे. आरोग्य संवर्धनासाठी अ‍ॅलोपॅथीखेरीज इतर पॅथींचा काही उपयोग आहे का, हे पुराव्यानिशी सिद्ध करण्याची गरज आहे. अ‍ॅलोपॅथीच्या तुलनेत इतर पॅथी नेमक्या कितपत प्रभावी आहेत हे समजण्यासाठीही संशोधनाची गरज आहे. आयुर्वेद-होमिओपॅथी कोणत्या रोगांमध्ये निरुपयोगी आहेत हे संशोधनाद्वारे सिद्ध झाले तर जनतेचे पसे, वेळ तसेच यातनाही कमी होऊ शकतील.
अ‍ॅलोपॅथीखेरीज इतर पॅथींमधील संशोधनात अनेक मर्यादा आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयुर्वेद वा होमिओपॅथी महाविद्यालयांमध्ये रुग्णांचे प्रमाण अतिशय कमी असते.  त्यातही आंतररुग्णांचे प्रमाण नगण्यच असते. दुसरे म्हणजे या पॅथींना म्हणावा तेवढा राजाश्रय नाही. राज्यात शासनाचे एकही होमिओपॅथी महाविद्यालय नाही व गेल्या अनेक दशकांमध्ये एकही शासकीय आयुर्वेद महाविद्यालय सुरू झालेले नाही यावरून हे स्पष्ट होईल. साहजिकच संशोधनासाठी निधी मिळणे ही अवघडच बाब ठरते. अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरांमध्ये एक प्रकारचा वर्चस्वगंड (सुपिरिऑरिटी कॉम्प्लेक्स) असल्याने त्यांना इतर पॅथींच्या डॉक्टरांशी समन्वय साधायची गरजच वाटत नाही. जो काही थोडा समन्वय असतो  तो त्यांच्याकडून ‘रेफरल’ मिळवणे व आयसीयूसाठी कमी पगारी निवासी डॉक्टर मिळवणे इतपतच असतो!
याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुर्वेद व होमिओपॅथीच्या डॉक्टरांना आधुनिक संशोधनाची भाषा बोलता येत नाही. त्यातील काही डॉक्टरांना तर आधुनिक संशोधन पद्धती त्यांच्या पॅथीला लागू होत नाहीत याविषयी खात्रीच असते! साहजिकच त्यांचे चिकित्सालयीन यशाचे पुरावे हे व्यक्तिसापेक्ष पातळीवरच राहतात आणि ते आधुनिक वैद्यकात मान्यता प्राप्त करू शकत नाहीत. अजून एक गोष्ट म्हणजे इतर पॅथीतील डॉक्टर अ‍ॅलोपॅथीतील सारखेपणा असणाऱ्या संज्ञा त्यांच्या संशोधनात वापरतात ज्यामुळे आणखी गोंधळ निर्माण होतो. जसे मधुमेहाला डायबेटिस मेलीटस असे संबोधले तर त्यात सोपेपणा येतो, पण प्रत्यक्षात आयुर्वेदात मधुमेहाचे अनेक प्रकार सांगितलेले असल्याने प्रत्यक्षात असे साधम्र्य हे खरे नसते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बहुतांश आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक औषधांच्या रोगोपचारातील यशासंबंधी आकडेवारी उपलब्ध नसते. त्यामुळे एखाद्या आजारात अ‍ॅलोपॅथी औषधाऐवजी क्युअर रेट माहीत नसलेले तुमचे औषध का वापरायचे, या एथिक्स समितीच्या प्रश्नावर या तज्ज्ञांकडे उत्तर नसते. यावर उपाय म्हणून मग अ‍ॅलोपॅथिक औषधासोबत आयुर्वेदिक वा होमिओपॅथिक औषधे देण्याची संशोधने होतात. यात आपोआपच या पॅथींच्या दुय्यमतेवर शिक्कामोर्तब होते. एखाद्या रोगावर पहिले वा प्राधान्यक्रमाचे औषध असे बिरुद या पॅथीतील औषधांना त्यामुळे कधीही प्राप्त होत नाही.
वरील विवेचनावरून आंतरपॅथी संशोधनाच्या आकाशात काळे ढगच दिसत असल्याचे वाचकांना वाटेल; पण विविध राज्यांत स्थापन झालेल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठांच्या रूपाने या काळ्या ढगांच्या चंदेरी रेषा अधोरेखित होताना दिसतात.
आरोग्य विज्ञान विद्यापीठांच्या अखत्यारीत आता अ‍ॅलोपॅथी, युनानी, आयुर्वेद व होमिओपॅथी या सर्व पॅथींची महाविद्यालये आहेत. डॉक्टरांची संख्या वाढवण्याचे शासकीय धोरण असल्याने राज्यांमधील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये एक वा अधिक पॅथींची वैद्यकीय महाविद्यालये आहेत. त्यामुळेच आरोग्य विज्ञान विद्यापीठे ही आंतरपॅथी संशोधनाची मुख्य केंद्रे बनू शकतात. ही विद्यापीठे आंतरपॅथी संशोधनासाठी अनेक गोष्टी करू शकतात. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व पॅथींतील संशोधनोत्सुक डॉक्टरांना शास्त्रोक्त संशोधन पद्धतींचे प्रशिक्षण देणे. सर्व पॅथींच्या अग्रगण्य तज्ज्ञांच्या मदतीने कोणत्या आजारांवर तुलनात्मक संशोधन होण्याची गरज आहे ते शोधून त्यातील प्राधान्यक्रम ठरवणे. ज्या शहरांमध्ये विविध पॅथींची महाविद्यालये आहेत तेथे संशोधनासाठी आंतरपॅथी तज्ज्ञ समित्या स्थापून त्यांना आंतरपॅथी संशोधन करण्यासाठी आर्थिक व तांत्रिक साह्य करणे. विद्यापीठात आंतरपॅथी संशोधन विभाग स्थापून त्याच्यामार्फत अशा संशोधनावर देखरेख ठेवून त्याचे मूल्यमापन करणे व संशोधन नियतकालिकात त्यांचे निष्कर्ष प्रकाशित करणे.
हे सर्व घडले तर सर्व पॅथींमध्ये काय चांगले आहे व काय वाईट याविषयी शास्त्रीय पुरावा निर्माण होईल. अंतिमत: याची परिणती समाजाला स्वस्त, प्रभावी, जोखीमरहित उपचार, मग ते कोणत्याही पॅथीचे का असेनात, मिळण्यात होईल. आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथींना देशाच्या आरोग्यव्यवस्थेत त्यांचे सुयोग्य स्थान मिळेल. या पॅथीतील बोगस तज्ज्ञांच्या खोटय़ा दाव्यांना भुरळून आíथक/मानसिक नुकसान सोसणाऱ्या समाजाचाही फायदा होईल.
हे घडायचे असेल तर देशातील आरोग्य विज्ञान विद्यापीठांनी सर्व पॅथींना समानतेने वागवण्याच्या केवळ कागदी उद्दिष्टांच्या- ‘मिशन स्टेटमेंट’च्या बाहेर येऊन वास्तवात, जमिनीवर काही तरी करण्याची गरज आहे यात शंका नाही!
* लेखक सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ आहेत.त्यांचा ई-मेल  drjvdixit@gmail.com