बिकट परिस्थितीमुळे स्वत:ला शिक्षण अर्ध्यावर सोडून द्यावे लागले, तरी हार न मानता पपिता माळवे यांनी फासेपारधी समाजातील इतर मुलींना मदतीचा हात दिला. आज त्यांच्या ‘आम्ही साऱ्या सावित्री आदिवासी बहुद्देशीय संस्थे’च्या आश्रयालयात राहून ५३ विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. त्यांना गरज आहे स्वत:च्या कायमस्वरूपी जागेची. ती मिळाल्यास भटकंतीकडून स्थैर्याकडे सुरू असलेल्या या वाटचालीला बळ मिळेल…
नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर यवतमाळकडून दारव्हाकडे जाणारा भोयर बाह्यवळण मार्ग आहे. याच मार्गावरील वाघाडी गावाशेजारी असलेल्या पारधी बेड्यावर आम्ही साऱ्या सावित्रीच्या लेकी आश्रयालय आहे.
फासे पारधी समाजातील आठ मुलींपासून २०१९-२० या शैक्षणिक वर्षात सुरू झालेल्या अनाथालयात आज पहिली ते अकरावीतील ५३ विद्यार्थिनी राहतात. येथील प्रत्येक मुलीची स्वतंत्र संघर्षकथा आहे. पपिता आणि इसू माळवे या मुलींना त्यांच्या पायांवर उभे करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत.
आम्ही साऱ्या सावित्री आदिवासी बहुद्देशीय संस्था, वाघाडी, यवतमाळ
Aamhi Sarya Savitri Aadivasi Bahuuddeshiya Sanstha, Waghadi, Yavatmal
या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्याबरोबर देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच भ्रमणध्वनी क्रमांक लिहावा.
ऑनलाइन देणगीसाठी तपशील
● बँकेचे नाव : द कासमॉस को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, शाखा यवतमाळ
● चालू खाते क्रमांक : १०६१००१०२४३१
● आयएफएससी : सीओएसबी००००१०६
भटकंती करणारा फासेपारधी समाज आजही दारिद्र्य, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, अज्ञान यात खितपत पडला आहे. हा समाज शिक्षणापासून कित्येक कोस दूर आहे. समाजात मुलींना शिकवण्याबाबत प्रचंड उदासीनता दिसते. मुलगी दहा-बारा वर्षांची झाली की तिचे समाजातीलच तरुणाशी लग्न लावून दिले जाते. बालवयातच मातृत्व लादले जाते. मुलींना या जोखडातून बाहेर काढून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या हेतूने फासेपारधी समाजातीलच पपिता माळवे या तरुणीने सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची वाट धरली. शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलींना आपल्या झोपडीवजा घरात आश्रयास ठेवत अन्न, वस्त्र, निवारा देत त्यांच्या आयुष्यात ज्ञानज्योत लावली.
घरच्या बिकट परिस्थितीमुळे पपिता केवळ बारावीपर्यंत शिक्षण घेऊ शकली. शिकत असतानाही तिला कायम मजुरी करावी लागत असे. शिक्षण कमी असल्याने मजुरी करण्याची वेळ आली, याची जाणीव झाल्याने पपिताने पारधी समाजातील मुलींना शिक्षणासाठी मदत करण्याचा निश्चय केला. या समाजाला शिक्षणाचा गंध नाही. भटके आयुष्य जगावे लागत असल्याने पारधी बेड्यावरील मुलींना शाळेत घालण्याचे धाडस पालक करत नाहीत. कायमस्वरूपी राहण्याची सोय झाल्यास पालक मुलींना शाळेत घालतील, हे लक्षात घेत पपिताने २०१९-२० मध्ये प्रायोगिक स्तरावर आठ मुलींना त्या नियमित शाळेत जातील आणि अभ्यास करतील, या अटीवर आपल्या राहत्या झोपडीवजा घरात ठेवले. पपिताच्या निर्णयाला तेव्हा समाजातील अनेकांनी विरोध केला होता. मुलींचे लग्न लावून देणेच योग्य असल्याचा युक्तिवाद अनेक पालकांनी केला. मात्र, पपिताने त्यांची समजूत काढली. स्वत: असुविधांच्या विळख्यात, रोजमजुरीवर जगत असतानाही ती निर्णयावर ठाम राहिली. तिला पती इसू माळवे यांनीही साथ दिली. मुलींचा खर्च भागवण्यासाठी या दाम्पत्याने स्वत:च्या कमाईतील वाटा दिला. इसू माळवे हे ऑटो रिक्षा चालवतात.
२०२०-२१मध्ये तिच्याकडील मुलींची संख्या नऊ झाली. २०२१-२२ मध्ये तिने आपल्या वाघाडी येथील ई-वर्ग (भूमिहीनांसाठी तात्पुरत्या) जमिनीवर झोपडीवजा घरातच टिनचे शेड बांधून १५ मुलींच्या आश्रयाची व्यवस्था केली. या मुलींचा राहण्याचा, खाण्याचा, कपडे, पुस्तके आणि शिक्षणाचा खर्च लोकसहभागातून भागवण्यास सुरुवात केली. पुढे २०२२-२३ मध्ये १८, २०२३-२४ मध्ये २०, २०२४-२५ मध्ये ४० तर यंदा २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात या आश्रयालयात ५३ मुली आहेत. पहिलीत पाच, दुसरीत सात, तिसरीत चार, चौथीत पाच, पाचवीत १४, सहावीत चार, सातवीत सात, आठवीत चार, दहावीत दोन तर अकरावीत एक विद्यार्थिनी आहे. या मुली यवतमाळ शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांत शिक्षण घेत आहेत.
मुलींसाठी पपिताने ‘आम्ही साऱ्या सावित्री आदिवासी बहुद्देशीय संस्था’ स्थापन केली. आता या संस्थेद्वारे यवतमाळनजीक वाघाडी येथे ‘आम्ही साऱ्या सावित्रीच्या लेकी-पारधी समाजातील मुलींचे शैक्षणिक आश्रयालय’देखील सुरू झाले आहे. पपिता माळवे या संस्थेच्या अध्यक्ष तर त्यांचे पती इसू माळवे हे सचिव आहेत. इसू माळवे केवळ तिसऱ्या इयत्तेपर्यंत शिकले आहेत. दोघेही पारधी समाजातील असल्याने त्यांना हा समाज शिक्षणापासून वंचित असल्याने मागास आहे, याची जाणीव आहे.
येथील प्रत्येक मुलीची स्वतंत्र कथा आहे. कुणाचे आई-वडील महानगरांमध्ये भीक मागतात, तर कुणाचे गवंडीकाम करतात. कुणाचे वडील शिकार करतात, कुणाचे दारू गाळतात. कुणाचे आई-वडील दोघेही मुलीला सोडून गेले आहेत, तर कुणाची आई सोडून गेल्याने वडिलांनी दुसरे लग्न करून मुलीला बेघर केले आहे. काही मुलींचे आई-वडील दोघेही मरण पावले आहेत. यातील अनेक मुली कधी बेड्यावर तर कधी मुंबई, पुणे, गुजरातमध्ये राहून भीक मागत. सहा ते १६ वर्षे वयोगटातील या सर्व मुली आहेत. त्या यवतमाळ, अमरावती, नांदेड आदी भागातील आहेत. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पपिता आणि इसू पालकांचे मतपरिवर्तन करण्याच्या प्रयत्नांत आहेत.
आता जागेचा आणि शासनाच्या विविध परवानग्यांचा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. सध्या ‘एक संस्था चालवीत असलेले खासगी होस्टेल’, एवढीच या आश्रयालयाची ओळख आहे. त्यामुळे अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. सध्या दोन, अडीच हजार चौरस फूट ई-वर्ग जमिनीवर टिनच्या छताखाली आश्रयालय सुरू आहे. ही जागा रेल्वे आणि महामार्गाच्या मधोमध आहे. त्यामुळे येथून स्थलांतर करावे लागण्याची टांगती तलवार आश्रयालयावर आहे. काही विघ्नसंतोषी व्यक्ती सतत त्रास देऊन त्यांना या जागेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. परिणामी हे काम पुढे कसे न्यायचे, ही चिंता त्यांना आहे. कायमस्वरूपी जागा मिळाल्यास पारधी बेड्यावरील अधिकाधिक मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणून स्वत:च्या पायांवर उभे करता येईल. सध्या या मुलींना विविध कौशल्याधारित शिक्षण दिले जाते. काही मुलींनी संगणक अभ्यासक्रमालाही प्रवेश घेतला आहे. मुलींसाठी यवतमाळमधील एस. एल. फाउंडेशनने वाचनालय सुरू करून दिले. अनेक व्यक्ती, संस्था या आश्रयालयाला धान्य, कपडे, शैक्षणिक साहित्य स्वरूपात देणगी देतात. मुलींसाठी शिकवणी वर्गही घेतात.
यवतमाळ जिल्ह्यात जवळपास ७० पारधी बेडे आहेत. पपिता बेड्यांवर फिरून पहिली ते दहावीत शिकू शकणाऱ्या किती मुली आहेत, याची माहिती घेते. त्यानंतर त्यांच्या पालकांना भेटून मुलींना शिकू देण्याची विनंती करते. बहुतांश पालक अत्यंत गरीब असल्याने मुलांना शिकविणे त्यांच्या आवाक्याबाहेर असल्याचे सांगतात. अशावेळी शिक्षणाची, राहण्याची व भोजनाची व्यवस्था संस्थेमार्फत केली जाईल, मुलींना उच्च शिक्षण दिले जाईल, अशी हमी दिल्यावर दोन ते तीन बैठकांनंतर पालक मुलींना पपिताच्या आश्रयालयात पाठवण्यास तयार होतात. आता मुलींची संख्या ५३पर्यंत गेली आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून माळवे दाम्पत्याने आपली दोन्ही मुले जयेश (पाचवीत) आणि वंश (दुसरीत) यांना आदिवासी विभागाच्या आश्रमशाळेत वसतिगृहात ठेवले आहे. आश्रयालयातील मुलींसाठी पपिता आणि इसू हे ‘मामा, मामी’ असले तरी, मुलींचे आजारपण असो की अन्य तक्रारी हे दोघेही आई-वडिलांचे कर्तव्य पार पाडत आहेत. पपिताचे आई-वडील, बहीण आणि इसूचा भाऊ या कामात जमेल ते सहकार्य करतात. इसूचे आई-वडील अजूनही पुण्यात भीक मागतात आणि जमा झालेले पैसे अडचणीच्या वेळी सावित्रीच्या लेकी आश्रयालयासाठी पाठवतात. मुलींची प्रगती बघून पालकही समाधानी आहेत. मुली शिकल्या तर त्यांची भटकंती, शिकार, दारिद्र्य, भीक मागून जगणे यातून सुटका होईल, असा विश्वास त्यांना वाटू लागला आहे.
एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.
धनादेश येथे पाठवा…
दिल्ली कार्यालय
संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१. ०१२०- २०६६५१५००
नागपूर कार्यालय
संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, अॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ – २२३०४२१
पुणे कार्यालय
संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे- ४११००४. ०२०-६७२४११२५
ठाणे कार्यालय
संपादकीय विभाग, फ्लॅट नं.५, तिसरा मजला, होशबानो मॅन्शन, तनिष्क शोरूमच्या वर, गोखले रोड, नौपाडा ठाणे (प.) ४००६०२. ०२०-२५३८५१३२
महापे कार्यालय
संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००
मुंबई कार्यालय
लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, ०२२-६७४४०२५०