आठवडय़ाची शाळा : आवाजाला पारखे असलो तरी..

शाळेतील मुले-मुली शरीराने सुदृढ असली तरी ऐकू येत नसल्याने हातवारे केल्याशिवाय संवाद साधू शकत नाहीत.

समूह वर्गात रमलेले विद्यार्थी

रोटरी सेवा केंद्र ट्रस्ट आणि सरकारचे अनुदान यांच्या आर्थिक सहकार्यावर रोटरी स्कूल फॉर डेफशाळेचा गाडा चालविला जातो. परंतु कर्णबधिर मुलांसाठी दर्जेदार शिक्षण देणारी ठाणे परिसरातील ही एकमेव शाळा असल्याने मुंबईसह मुंब्रा, कर्जत, अंबरनाथ, टिटवाळा, कल्याण परिसरांतील मुले या शाळेत शिक्षण घेण्यासाठी येत आहेत.

‘आवाजाच्या दुनियेला हो,

जरा आम्ही पारखे,

परिश्रमांनी अन् जिद्दीनी

झेपवू आम्ही यशाकडे’

ही जिद्द समोर ठेवून डोंबिवलीतील ‘रोटरी स्कूल फॉर डेफ’ या कर्णबधिर शाळेतील विद्यार्थी वाटचाल करीत आहेत. शरीराने सुदृढ, पण निसर्गाने आघात केल्याने कर्णबधिर असलेल्या या मुलांना नियमित शाळांमध्ये दाखल करून, अन्य मुलांप्रमाणे शिकवणे, त्यांची पुढची शैक्षणिक प्रगती साधणे हे या शाळेचे ध्येय आहे. या मुलांना नियमित शाळेत दाखल करताना पालकांची तर शिकविताना शिक्षकांची मोठी अडचण होते. केवळ शिक्षण सुविधा नाही म्हणून या मुलांच्या शिक्षणाचा हक्क कुणी हिरावून घेऊ नये या हेतूने १९७० मध्ये ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली’ने रोटरी सेवा केंद्र ट्रस्टची स्थापना केली. ट्रस्टने डोंबिवली पूर्वेतील रघुवीर नगरमधील ट्रस्टच्या जागेत कर्णबधिर मुलांसाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या शाळेत फक्त चार मुले होती. आता ४६ वर्षांनंतर बाल, शिशुवर्गापासून ते पदवीपर्यंतच्या वर्गामध्ये २५० कर्णबधिर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ट्रस्टचे अध्यक्ष ओमप्रकाश धूत, मनोहर शेठ, क्लब अध्यक्ष पराग धर्माधिकारी, डॉ. घन:शाम शिराळी, राजेंद्र मानुधने, डॉ. रामकृष्ण शिंदे, मुख्याध्यापिका अपेक्षा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचा शिस्तप्रिय, पारदर्शी कारभार सुरू आहे. दहावी, बारावीचा शाळेचा निकाल नियमित शंभर टक्के लागतो. अन्य शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, हस्तकला उपक्रम, रस्ता सुरक्षा पथकात विद्यार्थी नेहमी अग्रस्थानी असल्याने सरकारच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी अ वर्ग मानांकन शाळेला मिळते.

वाचा उपचार पद्धत

शाळेतील मुले-मुली शरीराने सुदृढ असली तरी ऐकू येत नसल्याने हातवारे केल्याशिवाय संवाद साधू शकत नाहीत. या विद्यार्थ्यांना अधिकाधिक बोलता, ऐकता येईल आणि त्यामधून त्यांची शैक्षणिक प्रगती होईल यासाठी शाळा सतत प्रयत्नशील असते. त्यासाठी ‘वाचा उपचार पद्धती’द्वारे (स्पीच थेरेपी) शिक्षण दिले जाते. साडेतीन लाख रुपये खर्चून आवाजविरहित एक बंद खोली शाळेत तयार करण्यात आली आहे. यात मुलांना आरशासमोर बसवून वाचातज्ज्ञ क्रमिक अभ्यास शिकवतात. येथे उच्चाराचे धडे प्राधान्याने दिले जातात. विद्यार्थ्यांचा वाचादोष दूर करणे, त्यांना योग्य उच्चारांसह बोलते करणे आणि भाषा सुधारणे यावर भर असतो. कंठ, ओठ या हालचालींवर लक्ष केंद्रित केले जाते. उदा. ‘प’नंतर ‘फ’चा उच्चार करताना ओठासमोर मोरपीस ठेवून तोंडातून हवा काढून मोरपीस हवेने हलविले जाते. ‘ब’चा उच्चार करताना कंठाच्या हालचालींवर भर दिला जातो. अशा प्रकारे खोलीत एकेका विद्यार्थ्यांला प्रशिक्षित केले जाते. वर्गखोल्यांमध्ये आठ आठ विद्यार्थी बसवून समूह शिक्षण दिले जाते.

कानांची तपासणी

विद्यार्थ्यांची ऐकण्याची क्षमता किती आहे, हे जाणून घेण्यासाठी त्यांची श्रवण- यंत्राद्वारे तपासणी केली जाते. श्रवणयंत्र वापरण्याची किंवा त्या पद्धतीने विद्यार्थ्यांला शिकविण्याचे तंत्र विकसित केले जाते. आवाजविरहित खोलीत कर्णबधिर विद्यार्थ्यांला बसवून श्रवणयंत्राद्वारे त्याला आवाज ऐकविले जातात. विद्यार्थी ज्याप्रमाणे आवाजाला प्रतिसाद देतो, त्याप्रमाणे त्याचा आवाज ऐकण्याचा आकृतिबंध तयार केला जातो. त्या विद्यार्थ्यांची आवाज ऐकण्याची, ग्रहण करण्याची क्षमता विचारात घेऊन त्याप्रमाणे त्याला वर्गात शिकवले जाते. या चाचण्या शाळेत नियमित घेतल्या जातात. स्टारकी फाऊंडेशन या परदेशस्थ कंपनीने सर्व मुलांना श्रवणयंत्रे उपलब्ध करून दिली आहेत.

इंग्रजीवर भर

मुलांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे नोकऱ्या मिळाव्यात, इंग्रजी येत नाही म्हणून त्यांची कोठे अडचण होऊ नये म्हणून इंग्रजीवर विशेष भर दिला जातो. अनेकदा पालक मुलांना सर्वसाधारण शासकीय, खासगी शाळेत प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्नशील असतात. अशा शाळांमध्ये कर्णबधिर विद्यार्थी सर्व क्षमता असूनही अन्य विद्यार्थ्यांशी बरोबरी करू शकत नाही. त्यामुळे सगळ्यांचीच कोंडी होते. पालकांची ही द्विधा मन:स्थिती ओळखून शाळेने इंग्रजीवर विशेष भर दिला आहे. कर्णबधिर मुलांच्या क्षमतेप्रमाणे शाळेत शिक्षण देऊन त्यांची प्रगती साधण्याचा प्रयत्न केला जातो. दहावी, बारावी, त्यानंतर पदवीची मुले अर्धवेळ नोकरी करून शाळेत शिकत आहेत.

शालेय अभ्यास

विद्यार्थ्यांची प्रगती इतर सर्वसाधारण मुलांप्रमाणे व्हावी यासाठी संस्था पदाधिकाऱ्यांबरोबर शाळेतील ३२ शिक्षक झटत असतात. कोणताही विद्यार्थी अभ्यासक्रमात मागे राहू नये यासाठी खेळणी, खेळ हावभावाच्या आधारे शिकवले जाते. ‘ई लर्निग’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गोष्टी ऐकविल्या जातात. समूह श्रवणयंत्राचा वापर करून विद्यार्थ्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला जातो. नोकरी, व्यवसायाच्या दृष्टीने व्यावसायिक प्रशिक्षण शाळेत सुरू करण्यात आले आहे.

कलागुणांचा विकास

रस्ता सुरक्षा पथक (आर.एस.पी.) उपक्रमात ठाणे जिल्ह्य़ात या कर्णबधिर शाळेचे विद्यार्थी नेहमी अव्वलस्थानी असतात. शाळेत विद्यार्थ्यांना झांज, ढोलकी वाजविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. श्रवण क्षमतेप्रमाणे विद्यार्थी हे वादन करतात. विविध प्रकारच्या हस्तकलेत हे विद्यार्थी पारंगत आहेत. कृत्रिम फुले, फुलदाणी, पुठ्ठय़ांपासून आकर्षक, देखण्या शालोपयोगी वस्तू तयार करण्याची कला या विद्यार्थ्यांना अवगत आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तू भेट म्हणून दिल्या जातात. धावणे, पोहणे, अडथळ्यांची शर्यत या खेळांमध्ये विद्यार्थी पारंगत आहेत. नाटय़ स्पर्धामध्ये ते यश मिळवतात. शाळेची दोन कपाटे विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या पुरस्कार, सन्मानचिन्हांनी भरून गेली आहेत. अवांतर वाचनासाठी सुसज्ज ग्रंथालय आहे. कथा, गोष्टी, चित्ररूप कथांचे वाचन विद्यार्थ्यांकडून करून घेतले जाते. लघुउद्योग, मोठे कारखाने या ठिकाणी वेळोवेळी अभ्यास सहलीही शाळेतर्फे काढल्या जातात.

स्वच्छता, नीटनेटकेपणा हे या शाळेचे आणखी एक वैशिष्टय़. विद्यार्थीही अतिशय शांतपणे आपले दैनंदिन उपक्रम पार पाडत असतात. शाळेत दरवर्षी होणाऱ्या उपक्रमांची माहिती ‘पाऊलखुणा’ या नोंदणी पुस्तकात संकलित केली जाते. शाळेची विद्यार्थिसंख्या वर्षांगणिक वाढते आहे. त्यामुळे शाळेची जागा अपुरी पडू लागली आहे. विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी शैक्षणिक, क्रीडा व अन्य सुविधा मिळाल्या पाहिजेत, त्यांना शालेय शिक्षणाबरोबर उच्चशिक्षणही मिळाले पाहिजे, या उद्देशाने संस्था नवीन जागेच्या शोधात आहे. त्याला यश आले तर कर्णबधिर विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणारी ही शाळा उत्तरोत्तर आणखी प्रगती करेल.

(समाप्त)

संकलनरेश्मा शिवडेकर

reshma.murkar@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rotary school for the deaf

ताज्या बातम्या