एजाजहुसेन मुजावर

शिक्षक म्हणून नोकरी करताना जाता- येता बार्शी परिसरात भटक्यांच्या पालांभोवती दिसणारे शाळाबाह्य मुलांचे चित्र महेश निंबाळकर यांना अस्वस्थ करायचे. त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि पत्नी विनयाच्या मदतीने या मुलांसाठी बार्शीमध्ये स्नेहग्राम संस्था सुरू केली. औपचारिक शिक्षणाबरोबरच कौशल्याधिष्ठित शिक्षण आणि व्यावहारिक जीवनानुभव देणारे स्नेहग्राम वंचितांचे ज्ञानमंदिर बनले आहे.

palghar geography garden marathi news
पालघर: शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात भूगोल उद्यानाची स्थापना, राज्यातील चौथा प्रकल्प
Northwest Mumbai beautification of Jogeshwari Caves is sometimes under construction awaiting rehabilitation
आमचा प्रश्न : वायव्य मुंबई – जोगेश्वरी गुंफेचे सुशोभीकरण कधी प्रकल्पबाधितही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
kolhapur, mahalaxmi mandir, mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मी देवी मूर्ती संवर्धनास स्थगिती देण्यात यावी, जबाबदारी निश्‍चित करा; महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी
Conservation Work, Kolhapur s Mahalakshmi Ambabai Idol, Original Idol Unavailable for Darshan, mahalakshmi ambabai darshan not 2 days, 14 to 15 april 2024, kolhapur mahalakshmi mandir, mahalakshmi ambabai,
रविवारपासून अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन; भाविकांना दर्शन पितळी उंबऱ्यापासून

समाजात सर्वाधिक वंचित राहिलेल्या भटक्या जमातीच्या निराश्रित, अनाथ, वंचित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विनया आणि महेश निंबाळकर हे दाम्पत्य सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील कोरफळे येथे स्नेहग्राम प्रकल्पाच्या माध्यमातून निवासी शाळा चालवत आहे. स्थलांतरित व शहरात  रस्त्यांवर भीक मागणारी शाळाबाह्य़ मुले, अनाथ, निराधार, वंचित व संघर्षग्रस्त मुले, तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांची मुले, लैंगिक शोषणाला बळी पडलेली मुले, दुर्लक्षित भटक्या जाती-जमातींची मुले अशांना निंबाळकर दाम्पत्याने एकाच छताखाली आणून औपचारिक शिक्षणासह कौशल्याधिष्ठित शिक्षण आणि व्यावहारिक जीवनानुभव देण्याचे व्रत स्वीकारले आहे.

बार्शीत राहणाऱ्या महेश निंबाळकर या तरुणाने २००७ साली स्नेहग्राम प्रकल्प सुरू केला. बार्शीत मराठवाडय़ातून, राजस्थान व इतर प्रांतातून आलेल्या डवरी गोसावी, शिकलगार, पारधी, पाथरवट इत्यादी स्थलांतरित, भटक्या जमातीच्या कुटुंबांतील मुले कधी काळी भीक मागायची. काच-कचरा गोळा करायची, प्रसंगी भुरटय़ा चोऱ्याही करायची. अनेकदा त्यांना लैंगिक शोषण निमूटपणे सहन कराव लागे. त्यांच्यासाठी काही तरी केले पाहिजे, या विचारांनी प्रेरित होऊन निंबाळकर यांनी २० सप्टेंबर २००७ रोजी भटक्यांची अनौपचारिक शाळा सुरू केली.  गावच्या माळरानावर पालांमध्ये राहून दररोजच्या जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या या भटक्या कुटुंबांकडे केवळ शिक्षणाचाच अभाव नव्हता, तर भयानक दारिद्रय़, व्यसन, आरोग्याचे प्रश्न, कुपोषण, अंध:श्रद्धा अशा किती तरी प्रश्नांनी त्यांची मान पकडलेली होती.

माढा तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून नोकरीस जाता-येता महेश िनबाळकर यांना बार्शी परिसरात भटक्या जमातीच्या पालांवर राहणाऱ्या या वंचित, उपेक्षित कुटुंबांचे चित्र दिसायचे. नेहमीचे हे चित्र पाहताना निंबाळकर  अस्वस्थ होत होते. डी.एड्.चा अभ्यासक्रम पूर्ण करताना त्यांनी समाजसेवेची आवडही जोपासली होती. एकदा लातूरला जात असताना बार्शी परिसरात भटक्या कुटुंबांच्या पालांभोवती २५-३० मुले दिसली. अर्थात, ती सर्व मुले शाळाबाह्य़च होती. भटक्या जमातीची कुटुंबे दोन-चार महिने एका ठिकाणी पाल टाकून राहतात आणि नंतर तेथून दुसरीकडे निघून जातात. बार्शी भागात पुढे भटक्यांच्या पालांची संख्या वाढली आणि त्या ठिकाणी स्वत:चे भवितव्यच नसलेली शाळाबाह्य़ ७५ ते १०० मुले आढळून आली. निंबाळकर यांनी एके दिवशी पालांवर जाऊन डवरी गोसावी कुटुंबीयांची भेट घेतली. या समाजाचे प्रमुख सदाशिव मुळेकर हे भेटले. सोबतच बावरी समाजाचे  सीताराम बावरी यांचीही भेट झाली. त्यांच्याशी निंबाळकर यांनी अनौपचारिक गप्पा मारताना तेथील भटक्या मुलांना जवळच्या शाळेत शिक्षणासाठी पाठविण्याची सूचना केली. त्याला दोघांनीही प्रतिसाद दिला. त्यानंतर निंबाळकर यांनी अहवाल तयार केला. शासनदरबारी पत्रव्यवहार केला. या प्रक्रियेत सहा-सात महिन्यांचा कालावधी गेला. परंतु, या मुलांना शाळेत सामावून घेताना त्यांच्या वास्तव्याचा काळ तीन-चार महिन्यांसाठी असल्याने शाळेतील विद्यार्थी पटावर घेण्याचा प्रश्न होता. परंतु, पटावर न घेता या भटक्या मुलांना त्यांच्या तीन-चार महिन्यांच्या वास्तव्य काळापुरते शाळेत सामावून घेण्याचा आग्रह निंबाळकर यांनी धरला. निदान तेवढय़ा काळापुरते तरी या भटक्या मुलांना शिक्षणासोबत शालेय पोषण आहाराचा लाभ मिळू शकेल. शेवटी त्यात यश आले आणि ही मुले जवळच्या शाळेत जाऊ लागली.

दुसरीकडे निंबाळकर यांनी शाळेच्या सुटीच्या दिवशी पालांवर जाऊन मुलांची शिकवणी घेण्यास सुरूवात केली. यात त्यांनी जवळच्या शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयातील विद्यार्थ्यांची मदत घेतली. दोन विद्यार्थ्यांना निंबाळकर यांनी स्वखर्चाने मानधन देऊन भटक्या मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. नंतर त्यातूनच भटक्यांच्या शाळेची संकल्पना पुढे आली. मात्र, त्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. घरच्या मंडळींनी प्रखर विरोध केला. ‘महेश वाया गेला.’ असे बोलही कुटुंबियांतील सदस्यांच्या कानावर येऊ लागले. यादरम्यान, निंबाळकर यांचा विवाह झाला. शेजारच्या परांडा तालुक्यातील विनया या डी.एड्.धारक तरुणीशी त्यांनी लग्न केले. लग्नानंतर महेश यांचा निश्चय आणखी दृढ झाला आणि त्यांना पत्नीने साथ दिली.

सुरुवातीला सहा-सात महिने शिक्षण देताना पालांवरील भटक्या मुलांमध्ये अपेक्षित परिणाम दिसून आले नाहीत. त्यानंतर शिकवण्याच्या पध्दतीत केलेल्या बदलानंतर मुलांमध्ये प्रगती दिसून आली. या वंचित मुलांची बार्शीतील भगवंत विद्यालयात शिक्षणाची सोय केली. अनौपचारिक शिक्षणानंतर अपौचारिक शिक्षणाचे पुढचे पाऊल आरंभले गेले. त्यासाठी पर्याय म्हणून निवासी शाळा सुरू करण्याबाबत महेश यांनी विचार सुरू केला. २०१४ मध्ये त्यांनी शासनाकडे निवासी शाळेचा प्रस्ताव सादर केला व जून २०१५ मध्ये खांडवी येथे पहिल्यांदा निवासी शाळा सुरू झाली. परंतु वर्षभरातच दुप्पट भाडेवाढीमुळे स्थलांतरित होण्याची वेळ आली. एव्हाना, घरच्यांचा विरोध झुगारून महेश निंबाळकरांनी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाच्या नोकरीचा राजीनामा दिला. पत्नी विनया यांनाही जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षकपदाची नोकरी चालून आली होती. परंतु, नियुक्तीपत्र हातात पडूनही मागचा-पुढचा विचार न करता तिने नोकरीकडे पाठ फिरवत पतीला साथ दिली.

विनया हिने महेश यांना अंगावरचे सोन्याचे दागिने काढून दिले. त्यातूनच कोरफळे येथे माळरानावरील तीन एकर जमीन खरेदी केली आणि निवासी शाळेसाठी स्नेहग्राम प्रकल्पाला सुरुवात झाली.

डॉ. विकास आमटे व कौस्तुभ आमटे यांनी निंबाळकर दाम्पत्याच्या कार्याची दखल घेतल्यानंतर प्रकल्प उभारणीसाठी आवश्यक असलेली संसाधने देण्याचा निर्णय घेतला. अखेर २५ मे २०१७ रोजी अजित फाउंडेशनच्या माध्यमातून स्वयंअर्थसाहाय्यित शाळा म्हणून स्नेहग्राम विद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यासाठी विनया व महेश निंबाळकर या दाम्पत्याने शिक्षकाच्या नोकरीचा त्याग करून वंचित व उपेक्षित घटकातील मुलांचे भविष्य घडविण्यासाठी पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या प्रामाणिक धडपडीची दखल घेऊन ‘आनंदवन’चे विश्वस्त तथा ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे व आनंदवन समाजभान अभियानाचे प्रमुख कौस्तुभ आमटे यांच्याकडून शाळेसाठी पाच टीनशेड, अ‍ॅम्ब्युलन्स, भांडी, एक महिन्याचा किराणा माल,  जनरेटर, गणवेश व चादरी अशी भरघोस मदत मिळाली. याशिवाय कीर्ती ओसवाल (पुणे), आयएएस अधिकारी रमेश घोलप आदींच्या विशेष सहकार्याने उजाड माळरानावर आणि निर्जन ठिकाणी ‘स्नेहग्राम’ साकारले गेले आहे.

सध्या स्नेहग्राम विद्यालयात वेगवेगळी कौटुंबिक पाश्र्वभूमी असलेली ४० मुले-मुली निवासी शालेय शिक्षण घेत आहेत. यात ५ ते १२ वयोगटातील २५ मुले व १५ मुली आहेत. विविध प्रयोगांतून मुलांमध्ये दडलेल्या क्षमता, ऊर्जाचा, वैशिष्टय़पूर्ण सुप्तगुणांचा ठाव घेत त्यांचा ज्ञाननिर्मितीत उपयोग केला जातो. शासनाच्या मदतीविना इथे समाजव्यवस्था व शासनव्यवस्थेपासून वंचित व उपेक्षित असलेल्या भटक्या मुला-मुलींना मोफत निवासी शिक्षण देताना समाजातील दानशूर मंडळींकडून मिळणारे सहकार्य महत्त्वाचे आहे. ‘स्नेहग्राम’च्या परिसरात जंगली व फळांची विविध सातशे वृक्षांची लागवड झाली असून या वृक्षांची देखभाल मुलेच करतात. ‘स्नेहग्राम’चा दरमहा खर्च सुमारे एक लाखाचा आहे. हा खर्च १२५ देणगीदारांच्या माध्यमातून भागविला जातो. आणखी निधी मिळाला तर विविध उपक्रम राबविण्याचा स्नेहग्रामचा विचार आहे.

 

प्रयोग आणि पुढचे पाऊल

केवळ औपचारिक शिक्षणावर भर न देता कौशल्याधिष्ठित शिक्षण व व्यावहारिक जीवनानुभवही मुलांना दिले जातात. यात क्षेत्रभेटी, स्नेहग्राम विद्यार्थी बचत बँक, बालसंसद, बालन्यायालय, व्यवस्थापन, पशुपालन व दुग्धोत्पादन,  स्वच्छता व स्वावलंबन, शेती व कार्यानुभव, तंत्रज्ञानाचा वापर (व्हर्च्युअल क्लास, व्हीआर लायब्ररी, टॅब स्कूल) असे विविध उपक्रमशील प्रयोग राबविले जातात.

स्नेहग्राम विद्यालयात सध्या ४० वंचित मुले आहेत. भविष्यात ५०० वंचित मुलांना निवासी शाळेच्या माध्यमातून समूह शिक्षणासह सांभाळण्याचा स्नेहग्रामचा संकल्प आहे. शाळेची स्वतंत्र इमारत व वसतिगृहाची स्वतंत्र व्यवस्था उभी करायची आहे. इतर आवश्यक पायाभूत सुविधा द्यायच्या आहेत. त्यासाठी समाजातील दानशूर मंडळींची साथ हवी आहे.

संस्थेपर्यंत कसे पोहोचाल?

स्नेहग्राम प्रकल्प

सोलापूर-बार्शी रस्त्यावर सोलापूरपासून ६० किलोमीटर अंतरावर वैरागच्या पुढे पानगावलगत कोरफळे हे गाव आहे. बार्शी येथून हे गाव १५ किलोमीटर अंतरावर आहे. पानगावात प्रवेश केल्यानंतर पुढे चार किलोमीटर अंतरावर कोरफळे गावच्या हद्दीत स्नेहग्राम प्रकल्प आहे.

धनादेश –अजित फाऊंडेशन

(Ajit  Foundation)

या नावाने काढावा.  धनादेशामागे अथवा सोबत देणगीदाराने त्याचे संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच मोबाइल क्रमांक लिहावा. त्यावरून संस्थेला पावती पाठविता येईल. संस्थेकडे धनादेश ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सुपूर्द केले जातील.

देणगी करसवलतीस पात्र   

धनादेश येथे पाठवा..

एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय

लोकसत्ता, संपादकीय विभाग, मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय  

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय    

संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३९९६०७

पुणे कार्यालय      

संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे – ४११००४.  ०२०-६७२४११२५

नाशिक कार्यालय       

संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१.  ०२५३-२३१०४४४

नागपूर कार्यालय    

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८,अ‍ॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ झ्र् २२३०४२१

औरंगाबाद कार्यालय       

संपादकीय विभाग, १०३, गोमटेश मार्केट, गुलमंडी, औरंगाबाद. दूरध्वनी क्रमांक ०२४०-२३४६३०३, २३४८३०३

नगर कार्यालय       

संपादकीय विभाग, १६६, अंबर प्लाझा, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१-२४५१५४४/ २४५१९०७

दिल्ली कार्यालय     

संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा – २०१३०१ उत्तर प्रदेश    ०१२०- २०६६५१५००