स्थलांतरित मजुरांच्या आयुष्यात अनिश्चितता ही एकमेव निश्चित गोष्ट असते. ऊसतोड मजुरांच्या आयुष्यातील अनिश्चितेचे दुष्परिणाम त्यांच्या पुढच्या पिढ्यांनाही भोगावे लागतात. त्यांच्या मुलांना तरी स्थैर्य लाभावे, शिक्षण मिळावे, त्यांची या स्थलांतराच्या आणि उचल घेण्याच्या चक्रातून सुटका व्हावी म्हणून अहिल्यानगर येथील ‘उचल फाउंडेशन’ प्रयत्नशील आहे…
संस्थेपर्यंत कसे जाल?
शेवगावमधील ब्राह्मण गल्लीत मुंजोबा मंदिराजवळ उचल फाउंडेशनचे वसतिगृह आहे.
संस्थेकडे जाण्याचे मार्ग- १) नगरहून तिसगावमार्गे शेवगाव ६५ किमी. २) छत्रपती संभाजीनगरहून पैठणमार्गे शेवगाव ८५ किमी. ३) बीडहून गेवराईमार्गे शेवगाव ९० किमी.
ऊसतोड मजुरांची मुले शिकावित, त्यांच्या मुलींची बालविवाहाच्या जाचक प्रथेतून सुटका व्हावी, त्यांचे आरोग्य उत्तम राहावे आणि विकासासाठी उपलब्ध असणाऱ्या संधींचा त्यांना लाभ घेता यावा, म्हणून ‘उचल’ ही सेवाभावी संस्था कार्यरत आहे. त्यांच्या कार्याला आर्थिक हातभाराची गरज आहे.
उचल फाउंडेशन
Uchal Foundation
या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्याबरोबर देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच भ्रमणध्वनी क्रमांक लिहावा. संस्था ८० जी करसवलत पात्र आहे.
ऑनलाइन देणगीसाठी तपशील
● बँकेचे नाव : कॉसमॉस बँक, शाखा दिल्ली गेट, अहिल्यानगर
● चालू खाते क्रमांक : ११३१००१०५४५६
● आयएफएससी : सीओएसबी००००११३
अहिल्यानगर जिल्हा आणि मराठवाडा यांच्या सीमेलगत सहा-सात साखर कारखाने आहेत. या परिसरातील गावांत ऊसतोडणी मजुरांची संख्या लक्षणीय आहे. हे मजूर दरवर्षी राज्यभरात ऊसतोडणीसाठी स्थलांतर करतात. त्यांची संख्या हजारोंच्या घरात असते. सततच्या स्थलांतरामुळे शिक्षणाचा अभाव, बालविवाह, अंधश्रद्धा, कुपोषण, व्यसनाधीनता, महिलांमधील असुरक्षितता असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या मजुरांच्या कुटुंबांतील मुलांना याच भागात राहून शिक्षण मिळावे, यासाठी शेवगावमधील (जिल्हा अहिल्यानगर) उचल फाउंडेशन प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न, मजुरांच्या खोप्यांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवणे, गर्भवती आणि बालकांचे मृत्यू रोखणे अशा आव्हानात्मक जबाबदाऱ्या ही संस्था पार पाडत आहे. ऊसतोडणी मजुरांमध्ये ‘उचल’ हा परवलीचा शब्द आहे. त्यावरच त्यांचे जीवन अवलंबून आहे. उचल म्हणजे ऊसतोडणीच्या कामासाठी घेतलेली आगाऊ रक्कम. मात्र या रकमेला अनेक पाय फुटतात. त्यामुळेच ऊसतोडणी मजुरांचे कुटुंब दारिद्र्यातच खितपत पडलेले असते. संस्थेचे ‘उचल’ हे नाव याच गंभीर प्रश्नावर बोट ठेवणारे आहे.
पाथर्डी तालुक्याच्या मुंगूसवाडे या ऊसतोडणी मजूरांच्या तांड्यावर एका खोपीत जन्मलेला सचिन खेडकर हा महत्त्वाकांक्षी तरुण ही परिस्थिती बदलण्यासाठी पुढे आला आहे. सचिन लहान असतानाच त्याच्या आईचे ऊसतोडणीच्या ठिकाणी विहिरीत पडून निधन झाले. वडील व्यसनाधीन झाले आणि काही वर्षांत त्यांचाही मृत्यू झाला. सावत्र आई, दोन बहिणी, एक भाऊ अशा कुटुंबाची जबाबदारी सचिनवर आली. त्याने शिक्षण अर्धवट सोडून दिले. पुण्यात जाऊन मिळेल ते काम सुरू केले. काकांनी फॅब्रिकेशनच्या व्यवसायात मदत करण्यासाठी बोलावून घेतले. या कामातून साठवलेल्या पैशांतून त्याने गावाकडे वर्कशॉप सुरू केले. तो थोडा स्थिरावू लागला होता. गावातील काही मुले पोलीस भरतीची तयारी करत होती. सचिननेही अभ्यास सुरू केला. प्रकाश आमटे, ‘स्नेहालय’ यावरील पुस्तके वाचनात आली.

‘स्नेहालय’च्या युवा निर्माण शिबिराची माहिती मिळाली. तो शिबिरात सहभागी झाला. तेथे नवीन मित्र मिळाले. संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्याशी ओळख झाली. त्याने विकास आणि पुढे प्रकाश आमटे यांची भेट घेतली. या भेटी सचिनसाठी प्रेरणादायी ठरल्या. सेवाकार्यास दिशा मिळाली. ऊसतोडणी मजुरांच्या मुलांसाठी काहीतरी करावे असे त्याला वाटू लागले. आपल्या समस्या आपणच सोडवू शकतो, असा विश्वास घेऊनच तो शिबिरातून बाहेर पडला. मुंगूसवाडे गावातील पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या मुलांसाठी त्याने वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘साधना वाचनालय व अभ्यासिका’ सुरू केली. सुरुवातीची मदत ‘स्नेहालय’ने केली. स्नेहालयचे अनिल गावडे यांनीच त्याचा आंबाजोगाई येथील सुजाता दहिफळे या समाजकार्याची पदवी घेतलेल्या तरुणीशी परिचय करून दिला आणि सचिनला जीवनसाथी मिळाली.
डॉ. कुलकर्णी यांच्याशी चर्चा करताना ऊसतोडणी मजुरांच्या मुलांना एकाच ठिकाणी शिक्षण मिळावे, यासाठी वसतिगृह सुरू करण्याची संकल्पना पुढे आली. पण या कामासाठी पूर्णवेळ झोकून देणे गरजेचे होते. सचिनने मनातील इच्छा पत्नीकडे व्यक्त केली. तिनेही साथ दिली. पुढचा प्रश्न होता तो जागेचा. शेवगाव येथे स्नेहालयच्या माध्यमातून नलिनी शेरे यांनी बाबासाहेब खेडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक जुना वाडा उपलब्ध करून दिला. तिथूनच रचनात्मक सामाजिक कार्य सुरू झाले. ते वर्ष होते २०१८.
सचिनने मजुरांच्या कुटुंबाशी चर्चा सुरू केली. सुरुवातीला दोन मुले मिळाली आणि १३ जुलै २०१९ पासून उचल फाउंडेशनच्या वसतिगृहाची सुरुवात झाली. वसतिगृहातील मुलांची संख्या वाढू लागली. हृदयस्पर्शी सेवाभावी संस्था, स्नेहउमंग, स्नेहप्रेम, युवा निर्माण प्रकल्प या संस्थांच्या माध्यमातून स्वाती ढवळे, फारुख बेग, वनिता डाके, राहुल संत, मच्छिंद्र शिंदे अशा ६५ विद्यार्थी कार्यकर्त्यांनी सलग सात दिवस श्रमदानातून वाड्याची स्वच्छता केली. शेवगावचे डॉ. संजय लढ्ढा आणि शिक्षिका मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रत्येकी एक सभागृह बांधून दिले. आता या वसतिगृहात आठ मुलींसह एकूण ३० मुले निवासी शिक्षण घेत आहेत. आणखी दोघे-तिघे पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत आहेत. अनेक ऊसतोडणी मजूर आपल्या मुलांना या वसतिगृहात ठेवू इच्छितात, मात्र जागेअभावी ते शक्य होत नाही. ही गरज ओळखून ‘उचल फाउंडेशन’ने अनिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्यास सुरुवात केली. २०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला. वसुधा सावरकर, आशा धूत, स्नेहलता लबडे, गोविंदा ग्रुप, फिरस्ता संघ हे वसतिगृहाला देणगी देतात.
महिला व मुलींवर सततचे स्थलांतर, शिक्षणाचा अभाव, मेहनतीच्या कामातून निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्या इत्यादींचे अनेक दुष्परिणाम होतात. हे टाळण्यासाठी संस्थापालक डॉ. संजय व डॉ. मनीषा लढ्ढा, डॉ. आशीष लाहोटी, डॉ. गणेश चेके, भगनाथ काटे यांच्या माध्यमातून २०२१ पासून मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरे मजुरांच्या खोप्यात घेतली जात आहेत. यात गर्भवतींचे आणि मुलींचे समुपदेशन केले जाते. बालविवाह रोखण्याचे प्रयत्न केले जातात. दीड हजारांहून महिलांचे समुपदेशन फाउंडेशन करते. त्यांना आरोग्य सुविधा पुरवते. वसतिगृहास मॅगसेस पुरस्काराने सन्मानित नीलिमा मिश्रा, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, नीलिमा पवार यांच्यासह महेश टिळेकर, अलका कुबल, आशा पारेख, कमलाकर सातपुते यांसारख्या कलाकारांनी आणि सामाजिक, राजकीय क्षेत्रांतील मान्यवरांनी भेट दिली आहे. विधवा, परितक्त्यांना स्वयंरोजगारासाठी संस्थापालक अरुण रामचंद्र शेठ यांनी पिठाची गिरणी, शिवणयंत्रांचे वितरण केले आहे. मजुरांच्या खोप्यांत निवासी शैक्षणिक प्रकल्प सुरू करायचा प्रयत्न आहे. त्यामध्ये स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण मिळणार आहे. देणगीदारांच्या मदतीने संस्था सर्व सेवाकार्य करते. सरकारी अनुदान मिळत नाही.
ऊसतोड मजुरांच्या टोळ्या दरवर्षी नव्या कारखान्यात स्थलांतर करतात. लांबच्या कारखान्यावर स्थलांतर झाले की वसतिगृहात ठेवलेली मुलेही आपल्याबरोबर नेण्याचा त्यांचा आग्रह असतो. त्यांना थांबवण्यासाठी, शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. गेल्या वर्षभरात अशी २० मुले वसतिगृहातून गेली. ऊस तोडणीचे काम कित्येक किलोमीटर परिसरात चालते. मजुरांच्या खोप्या दूरदूर अंतरावर असतात. तिथे जाऊन आरोग्य सुविधा मिळवाव्या लागतात. त्यासाठी फिरत्या दवाखान्याची आवश्यकता उचल फाउंडेशनला भासते आहे.
धनादेश येथे पाठवा…
एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.
पुणे कार्यालय
संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे- ४११००४. ०२०-६७२४११२५
नागपूर कार्यालय
संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, अॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ – २२३०४२१
दिल्ली कार्यालय
संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१. ०१२०- २०६६५१५००
ठाणे कार्यालय
संपादकीय विभाग, फ्लॅट नं.५, तिसरा मजला, होशबानो मॅन्शन, तनिष्क शोरूमच्या वर, गोखले रोड, नौपाडा ठाणे (प.) ४००६०२. ०२०-२५३८५१३२
मुंबई कार्यालय
लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, ०२२-६७४४०२५०
महापे कार्यालय
संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००