|| हेमंत मोने
११ सप्टेंबर हा विनोबांचा जन्मदिवस. त्यांच्यासारख्या माणसाचं असणं हेच किती महत्त्वाचं होतं, आहे याची सर्वच पातळ्यांवरच्या विलक्षण गर्तेच्या आजच्या काळात प्रकर्षाने जाणीव होते. त्यांच्याशी साधलेला हा पत्ररूप संवाद.

पूज्य विनोबा, आम्हाला तुमचं स्मरण नेहमीच होत राहील, कारण तुमचं आयुष्य हीच तुमची शिकवण आहे. तुमच्या कार्यात आणि शिकवणुकीत असलेल्या एकरूपतेमुळे आम्ही तुमच्यापुढे नतमस्तक होतो. खरी निरहंकारिता कर्मात आहे असं तुम्ही म्हणता. उदाहरणं आणि दृष्टांत देण्याची तुमची पद्धत खूप छान आहे! ती नुसती भाषा नव्हे, हृदयाची भाषा आहे. सूर्य रोज उगवतो, नदी सतत वाहते. तिला कोणता अहंकार आहे, असा प्रश्न विचारून कार्यरत असणं म्हणजेच अहंकारी नसणं हे तुम्ही आम्हाला शिकवलंत. तुम्ही तुमच्या भूदानाच्या मोहिमेत ४७ लाख एकर जमीन भूमिहीनांना मिळवून दिलीत नव्हे, लोकांनी ती स्वेच्छेने तुमच्या पदरात टाकली. अहिंसेचा सार्वजनिक प्रयोग यशस्वी केलात. कार्यमग्नतेचे आणखी दुसरे उदाहरण कोणते? एवढेच नव्हे तर त्यातील कणभर मातीही तुम्ही अंगाला लावून घेतली नाहीत. कर्मयोगाने तुमच्या कृतीतून मूर्तरूप धारण केले.

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
Uddhav Thackeray Patrika Major Change On 1st May
उद्धव ठाकरेंच्या कुंडलीत ‘१ मे’ला मोठा बदल, यश येईल भाळी; ज्योतिषी उल्हास गुप्ते सांगतायत नेमकं घडणार काय?

गुण आत्म्याचे, दोष देहाचे

कार्यशून्यता आणि आळस झाकण्यासाठी निरहंकारितेची ढाल पुढे करू नका हे तुमच्याशिवाय कोण सांगणार? परमेश्वराचं दर्शन घ्यायचं असेल तर व्यक्तीमधल्या गुणांचं दर्शन घ्या असा सोपा मंत्र तुम्ही आम्हाला दिला आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे आणि स्वत:चेसुद्धा गुणच पाहा असं आपण म्हणता. तुमच्या प्रत्येक विचारामागे आध्यात्मिक आणि तार्किक बैठक असते.  गुण आत्म्याचे आणि दोष देहाचे आहेत, त्यामुळे नेहमी गुणदर्शन, गुणग्रहण आणि गुणस्तवन करा असं तुम्ही सांगता. तुमची ही साधी शिकवण प्रत्यक्षात आणली तर व्यक्ती – व्यक्तीत सौमनस्य निर्माण होईल, भीती दूर होईल. व्यक्ती-व्यक्तीमधील आश्वासकता वाढेल. पण लक्षात कोण घेतो?

शरीरात स्वास्थ्य निर्माण व्हायला हवं असेल, समतोल साधायचा असेल तर वात, पित्त, कफ यांचं संतुलन साधलं गेलं पाहिजे हा दृष्टांत देऊन साम्ययोगाचं महत्त्व समाजासाठी किती आहे, हे तुमच्या खास शैलीत तुम्हाला पटवलं आहे. अतिगरिबी किंवा अतिसमृद्धीतून अनेक प्रकारची पापं निर्माण होतात. म्हणून जास्त सुख नाही आणि जास्त दु:खही नाही अशा अवस्थेत चित्त प्रसन्न राहते असं तुम्ही सांगता.

सुखदु:खाची कल्पना

सुख आणि समाधान यात महदंतर आहे. एकाचा संबंध शरीराशी तर दुसऱ्याचा मनाशी आहे. पण आज आम्हाला फक्त शरीराचीच जाणीव आहे. आणि त्यामुळे सुखाची तृष्णा आहे. समाधान हरवल्याचं यत्किंचितही दु:ख नाही. बरं, सुखाचा विचारसुद्धा किती संकुचित. त्यामुळे सुख फक्त मला एकट्यालाच मिळावं ही इच्छा आणि अपेक्षा सुखाला दु:खात फिरवते असं तुम्ही म्हणता ते किती सार्थ आहे. तुम्ही हा विचार योग्य शब्दात मांडलात. सर्वांसाठी जो सुखाची इच्छा करील तो स्वत:ही सुखी होईल. जो स्वत:साठीच सुख इच्छील तो स्वत:ही दु:खी होईल आणि इतरांनाही दु:खी बनवील. चूक सुखाची इच्छा बाळगण्यात नाही तर स्वत:साठीच सुख इच्छिण्यात आहे. नुसते एवढे सांगून तुम्ही मोकळे झाला असतात तर तो कोरडा उपदेश ठरला असता. भूदान, ग्रामदान यातूनही हा विचार तुम्ही प्रवाहित केलात, कृतीत आणलात म्हणून तुमच्या साध्या सांगण्यालाही खूप किंमत आहे. त्याकडे दुर्लक्ष करण्याचा करंटेपणा आम्ही करता कामा नये म्हणून तुमचे स्मरण, चिंतन आजही आवश्यक आहे.

समाज परिवर्तनाचा मार्ग

विनोबा, तुमचं सगळं कसं सूत्रबद्ध असतं. अगोदर हृदय परिवर्तन, मग कृतीत परिवर्तन आणि सरतेशेवटी समाज परिवर्तन हा सोपान समाजाचे प्रश्न सोडवील, अशी तुमची धारणा. तुमची भूदान मोहीम हा या गोष्टीचा पुरावा आहे. तुमच्या कृतीत जे भावतं तेच आमच्यासाठी मार्गदर्शक ठरतं. असं भाग्य फारच थोड्या लोकांना लाभतं. नाही तर उपदेश आणि कृती यात फारकत झाली की उपदेश हा फक्त उपचार ठरतो.

कायदेमंडळ, संसद सार्वभौम आहे आणि समाज परिवर्तनाचं ते एकमेव माध्यम आहे, हा विचार तुमच्याच शब्दात सांगायचं तर मतलबी राजकारण्यांनी मुद्दाम पसरवला आहे. ज्याला अनेक पळवाटा असतात तो कायदा अशी कायद्याची वेगळी व्याख्या करता येईल. पण कायद्याच्या व्याख्येपेक्षा त्याची परिणामकारकता अधिक महत्त्वाची आहे. हृदय परिवर्तनाच्या अभावी कायदा दुबळा ठरतो आणि कायदा करणारे अजूनच दुबळे होतात. तुमचं स्मरण परिवर्तनाचा मार्ग दाखवील.

जीवनाचे तीन प्रकार

भिक्षा, धंदा आणि चोरी असे जीवनाचे तीन प्रकार तुम्ही सांगितले आहेत. कमीत कमी मोबदला घेऊन काम करणे म्हणजे भिक्षा. भिक्षा म्हणजे न मागणे. भिक्षेत परावलंबन नाही, ईश्वरावलंबन आहे. समाजाच्या सद्भावनेवर श्रद्धा आहे. यदृच्छा लाभ, संतोष आहे. कर्तव्यपरायणता आहे. फलनिरपेक्ष वृत्तीचा प्रयत्न आहे. चोरी म्हणजे समाजाची कमीत कमी सेवा करून किंवा सेवा केल्याचे नाटक करून समाजापासून जास्तीत जास्त भोग मिळवणे. ज्यांना प्रतिष्ठा आहे अशी बरीच मंडळी  या वर्गात मोडतात ही दुर्दैवाची गोष्ट आहे. या वस्तुस्थितीला सामोरे जाताना विनोबा तुमची फार तीव्रतेने आठवण होते. भिक्षेची गोष्ट सोडाच, परंतु समाजाची सेवा करताना योग्य मोबदल्यापेक्षा जास्त काहीही मी घेणार नाही, अशी ‘धंदा’ या दुसऱ्या वर्गात मोडण्याची सद्बुद्धी तरी तुम्ही आम्हाला द्याल का?

स्वरूपदर्शन

स्वरूप आणि विश्वरूप याचं तुम्ही केलेलं विश्लेषण तर फारच सुंदर आहे. तुमचा हा उपदेश परोपदेशे पांडित्य नाही. तुम्ही स्वरूपाचा मध्यबिंदू घट्ट पकडलात आणि विश्वरूपाच्या परिघालाही स्पर्श केलात. सूतकताई, वीणकाम, शरीरश्रम, भंगीकाम या गोष्टी तुम्ही स्वत: केल्या आहेत. ब्रह्मचर्य, शरीरश्रम, अपरिग्रह, स्पर्शभावना, स्वदेशी या व्रतांना शब्दबद्ध करून तुम्ही शब्दांचे नुसतेच फुगे फुगवले नाहीत. फक्त तेवढ्यावरच थांबला असतात तर विधान परिषदेत दिसला असतात. पण तुम्ही पडलात तप:पूत ऋ षी. ही व्रते तुम्ही तुमच्या आचरणात तंतोतंत उतरवलीत. तुमची उंची आकाशाला जाऊन भिडणारी. आम्हाला त्या उंचीकडे मान वर करूनही नीट बघता येत नाही. आता विश्वरूप तर सोडाच, पण स्वरूपाचा बिंदूही आम्ही पुसट केला आहे. घरातला कचरा कंपाऊंड भिंतीच्या पलीकडे टाकला की आमची स्वच्छता संपते हे आमच्या स्वच्छतेचे स्वरूप. पूर्वी लोक शेजार शोधीत. शेजार महत्त्वाचा, घर वगैरे त्यानंतर. या मानसिकतेत स्वरूपाबरोबर विश्वरूप सांभाळण्याचं बीज होतं. आता उरला आहे तो नुसता व्यवहार. कसं दिसेल या लौकिकाची भीड. ममत्वाची भाषा आता संपली आहे. विनोबा, तुमच्या स्मरणानं स्वरूपाचा मध्यबिंदू ठळक झाला तरी जीवन पुष्कळ सुकर होईल. तुमच्या म्हणण्याप्रमाणे विश्वरूपाची काळजी घेण्यास ईश्वर समर्थ आहे.

विज्ञान आणि राजकारण यांच्या अभद्र युतीचं फलित सर्वनाशात होईल याची सत्यता पटवणारी उदाहरणे हरघडी दिसत आहेत.

विज्ञान + अध्यात्म = सर्वोदय हे तुमचं समीकरण मूर्त स्वरूपात यायला थोडा अवधी आहे. तुमच्या इतकी उंची गाठणारा माणूस आमच्या अवतीभवती आम्हाला दिसत नसला तरी तुमचे गुण तुम्ही निरनिराळ्या माणसांमध्ये पेरून ठेवले आहेत. तुमच्याच शब्दात सांगायचे तर अशा गुणी माणसांच्या नर – समुदायाची नारायणी शक्ती आज ना उद्या जागृत होईल. विज्ञान आणि अध्यात्म यांची युती पाहण्याचं तुमचं स्वप्न क्षितिजाखाली दडणार नाही. तुमच्या स्मरणाने, आशीर्वादाने त्याचा उदय होईल.

hvmone@gmail.com