मानसिक आजारांमुळे कुटुंबीयांनी वाऱ्यावर सोडलेल्या, पदपथांवर राहणाऱ्या, तिरस्काराचा विषय ठरणाऱ्या व्यक्तींना शोधून त्यांच्यावर उपचार करण्याचा आणि सन्मानाचे आयुष्य मिळवून देण्याचा प्रयत्न वाई येथील ‘यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट’ गेली १७ वर्षे करत आहे. बेपत्ता झालेल्यांची संस्थेकडून त्यांच्या कुटुंबीयांशी भेट घडवून आणली जाते. रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत असताना ट्रस्टला आर्थिक प्रश्न भेडसावत आहेत…
रस्त्याकडेला राहणारे, केस-दाढी-नखे वाढलेले, काहीतरी बरळणारे लोक दिसले की पोलीस त्यांना ‘यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट’कडे सोपवतात. आवश्यक शारीरिक, मानसिक उपचार मिळाले की अनेक रुग्णांत सकारात्मक बदल होतात. ज्यांना सतत आधाराची गरज भासणार असते त्यांना संस्थेतच आश्रय दिला जातो.
पुणे-बंगळूर महामार्गावर खंबाटकी घाट उतरून साताऱ्याच्या दिशेने जाताना सोळशी रस्त्याला वेळे (ता. वाई) गावच्या हद्दीत ‘यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट’ ही संस्था आहे.
यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट
Yashodhan Charitable trust
या नावाने धनादेश काढावा, धनादेशाच्या मागे किंवा त्याबरोबर देणगीदाराने संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच भ्रमणध्वनी क्रमांक लिहावा. संस्था ८०जी करसवलत पात्र आहे.
ऑनलाइन देणगीसाठी तपशील
● बँकेचे नाव : कॉसमॉस बँक, सातारा शाखा
● चालू खाते क्रमांक : ०७७१००१०१०८३०
● आयएफएससी : सीओएसबी०००००७७
वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत १७ वर्षांपूर्वी मरणासन्न अवस्थेतील काही लोक आढळले. त्यांचे काय करावे हा पोलिसांसमोर प्रश्न होता. पोलिसांनी सामाजिक कार्यांत सक्रिय असलेल्या रवी बोडके आणि सोनल जमदाडे बोडके या दाम्पत्याला याबाबत सांगितले. बोडके यांनी या रुग्णांना सातारा येथील ‘नाना पाटील जिल्हा रुग्णालया’त दाखल केले. काही दिवसांत रुग्ण बरे झालेले पाहून बोडके दाम्पत्याला समाधान वाटले. पुढे असे निराधार रुग्ण आढळले की ते या दाम्पत्याकडे सोपविण्याचा प्रघातच पडला. पण रुग्ण बरे झाल्यानंतर पुढे काय, हा प्रश्न भेडसावत असे. ते पुन्हा रस्त्यावर येऊ नयेत, याचीही काळजी घेणे गरजेचे होते. बोडके दाम्पत्याच्या कार्याची माहिती मिळू लागल्यानंतर मित्रपरिवार, परिचित मदतीला आले. रवी बोडके यांनीही समाजाच्या विविध स्तरांतील लोकांशी संपर्क साधून मदत गोळा केली. वाई तालुक्यातील वेळे गावाबाहेर तात्पुरती जागा मिळवली. तिथे लोकवर्गणीतून छोटेखानी पत्र्याची शेडवजा इमारत उभारण्यात आली आणि अशा रीतीने २००७ साली ‘यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट’ची स्थापना झाली.
अनाथ, बेघर, भीक मागणारे, मानसिक रुग्ण, घरातून बेपत्ता झालेले, भिन्नमती व्यक्ती यांना आधार देण्याचे काम ही संस्था करते. पुण्यातल्या खेड शिवापूरपासून कोल्हापूरकडे जाणाऱ्या मार्गावरील पेठ नाक्यापर्यंत आणि सोलापुरातल्या माळशिरसपासून पोलादपूरपर्यंतच्या बेवारस रुग्णांना संस्था मदतीचा हात देते. परप्रांतातून ट्रक व अन्य वाहनांतून आणून महामार्गावर सोडून दिलेल्या, रस्त्याकडेला बसून काहीही खाणाऱ्या, मानसिक आजार झालेल्या, थंडी-पावसात उघड्यावर झोपणाऱ्यांना, समाज ज्यांच्याकडे तिरस्काराच्या नजरेने पाहतो अशा व्यक्तींना संस्था आश्रय देते. कामधंद्यानिमित्ताने घराबाहेर राहणारे आणि कामाच्या धबडग्यात मनोरुग्ण झालेले उच्चशिक्षित, मुलांनी सोडून दिलेले वृद्ध पालक यांचाही यात समावेश आहे.
रुग्ण संस्थेत आला की त्याची वाढलेली दाढी, केस कापून, आंघोळ घालून स्वच्छ कपडे दिले जातात. आवश्यक उपचार केले जातात. एरवी ओंगळवाणे दिसणारे लोक संस्थेत आल्यावर पूर्णपणे बदलून जातात. कालपर्यंत रस्त्यांवर फिरणारी हीच का ती व्यक्ती, असा प्रश्न पडेल एवढे परिवर्तन त्यांच्यात होते. त्यांना बोलते केले जाते. त्यांच्यावर ही वेळ का आली, हे जाणून घेतले जाते. त्यांच्या कुटुंबीयांची ही माहिती मिळवली जाते. नाव, गाव, पत्ता शोधून पोलीस प्रशासनाच्या सहाय्याने कुटुंबाशी संपर्क साधला जातो. ज्यांना स्वत:चा ठावठिकाणा आठवत नसतो त्यांचे छायाचित्र, चित्रफीत प्रसारित केली जाते. त्यांच्या निवासाची व्यवस्था केली जाते. पुनर्वसनासाठी प्रयत्न करण्यात येतात. आजवर अशा एक हजार ७८० व्यक्तींना त्यांच्या घरी पोहोचविण्यात यश आले आहे. जी व्यक्ती आपल्यापासून खूप दूर गेली आहे अथवा या जगातच नाहीत असा समज झालेल्यांसमोर, त्यांच्या प्रिय व्यक्ती अनपेक्षितरीत्या येऊन उभ्या राहतात, तेव्हा कुटुंबीयांना अतिशय आनंद होतो. भिन्नमती रुग्णांना त्यांच्या कुटुंबाची माहिती देता येत नाही. अनेकांना तर कुटुंबीयांनीच रस्त्यावर सोडून दिलेले असते. अशा रुग्णांच्या नातेवाईकांचा शोध लागला तरी ते या रुग्णांना परत स्वीकारण्यास तयार नसतात. त्यांचा सांभाळ संस्था करते. सध्या संस्थेकडे असे १६३ रुग्ण आहेत. अनेक महिला त्यांच्या मुलांसह येतात. भिन्नमती महिलांना कुटुंबाने मुलासह टाकून दिलेले असते. काहींच्या मुलांचा जन्म रस्त्यावर झालेला असतो. अशा मुलांच्या पालनपोषणाचा, वैद्याकीय सुविधांचा, शिक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा असतो. काही मुलांना संस्था स्वत: खर्च करून शाळेत शिकवत आहे.
संस्थेच्या आश्रमात सुमारे अडीचशे रुग्णांची सोय आहे. कारभार चालविण्यासाठी ट्रस्टला दरमहा अंदाजे चार ते साडेपाच लाखांहून अधिक खर्च येतो. यातील सर्वाधिक खर्च वैद्याकीय उपचारांवर होतो. संस्थेत येणाऱ्यांना अनेक आजार असतात. उपचारांसाठी डॉक्टर, परिचारिका, अनेक दाते सेवा देतात. कधी कधी रुग्णांना खासगी रुग्णालयात दाखल करावे लागते. सकाळी योगशिक्षिका येऊन शिकवतात. या खर्चाचा मेळ कसा घालावा, ही भ्रांत नेहमीच समोर असते. नव्या रुग्णांची सातत्याने वाढती संख्या आणि आश्रमात रुग्ण सामावून घेण्याची क्षमता यात तफावत आहे. त्यामुळे उर्वरित रुग्णांची सोय कशी करावी, हा प्रश्न आ वासून उभा असतो. अनेक रुग्ण अंथरुणाला खिळलेले आहेत. त्यांच्यासाठी वेगळा कक्ष उभारण्यात आला आहे.
सकाळी न्याहारी, करमणुकीचे कार्यक्रम, दुपारी जेवण, संध्याकाळी अल्पोपाहार आणि रात्री जेवण व फळे दिली जातात. स्वामी समर्थांचे छोटे मंदिर उभारले आहे. तिथे भजन-कीर्तनाचे कार्यक्रम होतात. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन हे राष्ट्रीय सण साजरे केले जातात. येथे करमणुकीसाठी टीव्ही व इतर सुविधा उपलब्ध आहेत. रुग्णांना आपण एकटे आहोत असे वाटू नये, आपणही या समाजाचाच एक भाग आहोत, समाजाला आपण हवे आहोत असे वाटेल, अशा स्वरूपाचे वातावरण निर्माण करण्याचा संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांचा प्रयत्न असतो.
संस्थेतील लोकांना जेवण, नाश्ता, कपडे, औषधोपचार, अन्य आवश्यक साहित्य, कर्मचाऱ्यांचा पगार यासाठी महिन्याला चार ते साडेपाच लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. मदतीचे आवाहन केले जाते. महिन्याला एक ते दीड लाख रुपये जमा होतात. मात्र उर्वरित रकमेसाठी अनेकदा पदरमोड करावी लागते. एकदा वादळात संस्थेचे नुकसान झाले. पत्रे उडून गेले होते. सातारा आणि पुण्यातील दात्यांनी व बोडके यांच्या मित्रांनी डागडुजीसाठी मदत केली. वाढत्या मानसिक ताणतणावांमुळे समाजात मानसिक समस्यांनी ग्रासलेल्या व्यक्तींची संख्या वाढत आहे. पोलीस, महसूल विभाग आणि विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या संस्थांकडून ‘जागा उपलब्ध आहे का,’ अशी विचारणा रोज होत असते. या वाढत्या रुग्णांना सामावून घेण्यासाठी ‘यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट’ला आर्थिक पाठबळाची गरज आहे.
एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.
धनादेश येथे पाठवा…
दिल्ली कार्यालय
संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१. ०१२०- २०६६५१५००
नागपूर कार्यालय
संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, अॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ – २२३०४२१
ठाणे कार्यालय
संपादकीय विभाग, फ्लॅट नं.५, तिसरा मजला, होशबानो मॅन्शन, तनिष्क शोरूमच्या वर, गोखले रोड, नौपाडा ठाणे (प.) ४००६०२. ०२०-२५३८५१३२
पुणे कार्यालय
संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे- ४११००४. ०२०-६७२४११२५
महापे कार्यालय
संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००
मुंबई कार्यालय
लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, ०२२-६७४४०२५०
– विश्वास पवार