साताऱ्यातील शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दिवशी प्रवेश घेतला, तो ७ नोव्हेंबरचा दिवस या वर्षीपासून ‘विद्यार्थी दिन’ म्हणून साजरा करायला सुरुवात झाली आहे. त्याचा नुसता देखावाच कसा झाला याबद्दल ६ डिसेंबरच्या निमित्ताने..
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण सातारा हायस्कूल, सातारा (सध्याचे प्रतापसिंह हायस्कूल) या ठिकाणी झाले होते. त्यांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी या शाळेमध्ये प्रवेश (रजिस्टर क्रमांक १९१४ नुसार) घेतला. बाबासाहेबांच्या शाळाप्रवेशाचं हे औचित्य साधून राज्य सरकारने या वर्षीपासून ७ नोव्हेंबर हा दिवस ‘विद्यार्थी दिन’ म्हणून साजरा करायला सुरूवात केली आहे.
बाबासाहेबांचे वडील रामजी सपकाळ यांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी बाबासाहेबांना शाळेत दाखल करताना त्यांच्या आंबवडे, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी या गावची कायम आठवण राहावी म्हणून सपकाळऐवजी आंबवडेकर हे आडनाव लिहिण्याची शिक्षकांना विनंती केली. पण कृष्णा आंबेडकर या शिक्षकांनी आंबेडकर या आडनावाची नोंद केली. बाबासाहेबांना त्यांचे आंबेडकर हे आडनाव इथल्या शाळेत अशा पद्धतीने मिळाले.
सातारा येथील छत्रपतींच्या राजवाडय़ात भरणारी सातारा हायस्कूल ही शाळा त्यावेळेस इंग्रजी माध्यमाची शाळा होती. ती कालांतराने जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आली. ही ऐतिहासिक वास्तू सध्या जीर्ण झाली असून येथील विद्यार्थ्यांची पटसंख्याही कमी झाली आहे. या शाळेच्या प्रवेशद्वारानजीक सातारा नगरपालिकेचीही शाळा आहे. सध्या सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद या वास्तूची देखभाल दुरुस्ती करीत आहे.
राज्य शासनाने या वर्षीपासून ७ नोव्हेंबर हा दिवस साजरा करण्यासाठी बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित विविध पलूंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, काव्य वाचन आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, असा आदेश काढला होता. परंतु साताऱ्यात त्यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात नेत्यांची भाषणबाजी व सत्कार सोहळ्याने या कार्यक्रमाला राजकीय स्वरूप आले होते. विद्यार्थी, शिक्षणाधिकारी आणि आंबेडकर अनुयायी मंडपात बसून वक्तृत्व, काव्य व निबंध स्पर्धेची वाट पाहत होते. पण चित्र प्रदर्शन वगळता सत्कार सोहळा आणि निव्वळ भाषणबाजीने हा दिवस संपला.
सातारा येथील संभाव्य भीमाई स्मारक, डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवन आणि ज्या ठिकाणी डॉ. आंबेडकर यांचे बालपण गेले आहे, तेथील संभाव्य स्मारक या तिन्ही ठिकाणी भूमिपूजन होऊन नंतरचे बांधकाम निधीअभावी रखडले आहे. १३ नोव्हेंबर रोजी साताऱ्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ५० वर्षे राजकीय कारकीर्द पूर्ण केल्याबद्दल सर्वपक्षीय आमदारांच्या तीन बठका झाल्या, त्यासाठी उपस्थित असलेल्या आमदार-खासदारांना ‘विद्यार्थी दिना’च्या कार्यक्रमाला उपस्थित राहावेसे वाटले नाही.
अजित जगताप response.lokprabha@expressindia.com