|| अंकुर गाडगीळ

मी मूळचा वसईचा. मु. पो. पापडी. पापडी ते पोझनान असा माझा शिक्षणप्रवास सुरू आहे. मुंबईतील ‘आर. डी. नॅशनल’ महाविद्यालयातून जैवतंत्रज्ञानात पदवी मिळवली. दरम्यान, स्पर्धा परीक्षांची तयारी करत होतो. त्यासाठी आणि एकूणच करिअरला कलाटणी मिळण्याच्या क्षणांमध्ये माझ्या वाचनाच्या छंदाचा सिंहाचा वाटा आहे. अभ्यासाखेरीज किल्ले भ्रमंती, संवर्धनासह मोडी लिपी शिकलो. सहा वेळा ‘कम्बाइन डिफेन्स सíव्हसेस’ (सीडीएस) परीक्षेत शेवटच्या मुलाखतीपर्यंत जाऊन बाद झालो. नंतर पुण्याच्या ‘राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थे’त विषाणूशास्त्रात (व्हायरस रिसर्च) पदव्युत्तर शिक्षण घेतलं. पीएचडीसाठीच्या ‘सीएसआयआर’ या प्रवेश परीक्षेत अपयशी ठरलो. या सगळ्याला तोंड देताना निराशेच्या विहिरीत न पोहण्याचा निश्चय केला होता. परदेशी शिक्षण म्हणजेच चांगलं असा विचार अनेकदा केला जातो. माझं तसं नव्हतं. मात्र आपल्याकडे त्यात दोन वर्षे गेली. आता अधिक थांबण्यात अर्थ नाही,हे जाणवलं. त्यामुळे माहिती काढून अर्ज करायला सुरुवात केली.

दरम्यानच्या काळात ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये एक उद्योजक आणि त्यांच्या व्यवसायाबद्दल लेख आला होता. तो वाचून मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्या कल्पनेत काही बदल सुचवले. तेव्हाच्या सखोल चर्चाचं फलित म्हणजे मला त्या संस्थेत नोकरी मिळाली. मधल्या काळात टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये एक वर्ष कनिष्ठ साहाय्यक संशोधक म्हणून काम केलं. मला घरच्यांनी नेहमीच चांगला पाठिंबा दिला. मी जवळपास ७५ ते ८० ठिकाणी अर्ज केले होते. मी त्या त्या विद्यापीठांतील प्राध्यापकांना थेट ईमेल लिहिले. काही सकारात्मक अभिप्राय आले. त्यापकी ‘युनिव्हर्सटिी ऑफ मेलबर्न’मध्ये प्रतीक्षायादीत दुसऱ्या क्रमांकावर होतो आणि वर्षभर थांबावं लागलं असतं. जर्मनीच्या ‘बॉन विद्यापीठा’तही थांबावं लागणार होतं. संशोधन क्षेत्र आणि अभ्यासविषय निवडताना ते कालबाह्य़ व्हायला नको तर वृद्धी व्हावी, हा विचार होता. मेंदूच्या आजारांवर सध्या जगभरात संशोधन सुरू आहे. त्याला वावही आहे. त्यामुळे पोलंडच्या ‘अदाम मिचकेविश युनिव्हर्सटिी’मध्ये ‘सेल अँड मॉलीक्युलर बायोलॉजी’मध्ये चार वर्षांची पीएचडी करायचं ठरवलं. मला पूर्ण शिष्यवृत्तीही मिळाली.

हा माझा पहिलाच परदेश प्रवास होता. म्युनिक विमानतळावर पोझनानलाच राहणारे एक गृहस्थ भेटले. त्यांच्याशी जुजबी गप्पा झाल्या. इथे उतरल्यावर माझ्या लॅबमधले सहकारी मला न्यायला येणार होते. त्यांना उशीर होतो आहे, असं दिसल्यावर हे गृहस्थ थांबले. आपुलकीने आमच्या लॅबमध्ये फोन करूनच ते मार्गस्थ झाले.संशोधन करणारे आम्ही, म्हटलं तर नावापुरते विद्यार्थी असतो. प्रत्यक्षात तशी वागणूक कुणी देत नाहीत. आपापल्या संशोधनाच्या काळ-काम-वेगाचं गणित प्रत्येकाने स्वतच्या जबाबदारीवर सोडवायचं असतं. त्यासाठी मार्गदर्शन केलं जातं. आठवडय़ातून एकदा असणाऱ्या चच्रेच्या वेळी कामाचा आढावा घेतला जातो. काही वेळा परिषदांना जायची आखणी केली जाते. मेंदूविषयक आजारांचा एक समूह असून त्याला ‘न्युरोडीजनरेटिव डिसिसेस’असं संबोधलं जातं. त्यापकी ‘अमयो ट्रॉपिक लॅटरल स्क्लोरोसिस’ या आजाराच्या संदर्भात मी संशोधन करतो आहे. हा माझ्या अभ्यासाचा विषय आहे. उदाहरणार्थ- ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्ज यांना हा आजार झाला होता. इथे संशोधनाच्या वेळेबाबत बरीच लवचीकता आहे. आपल्याकडे जे ज्ञान, माहिती आहे ते अजिबात कमी नाही. मात्र इथे संशोधनावर खूप खर्च केला जातो. आपल्याकडची परिस्थिती येत्या काही वर्षांत नक्कीच बदलेल असं दिसतं. इथली लॅब सर्व सोयींनी युक्त आहे. प्राध्यापक किंवा वरिष्ठांना सर /मॅडम असं न संबोधता थेट नावाने संबोधलं जातं. दोरोता राचिन्स्का या माझ्या मार्गदर्शक असून माणूस म्हणून त्या खूप चांगल्या आहेत. त्या फार फिटनेसप्रेमी आहेत. कामाच्या बाबतीत सगळ्यांचे होतात तसे आमचेही वाद-चर्चा घडतात अनेकदा. भारतात असताना सीडीएससाठी प्रयत्न करत होतो. त्यामुळे तंदुरुस्त असणं आवश्यक होतं. त्या स्पर्धात अपयश आलं तरी आरोग्याचं वरदान लाभलं. संशोधन करताना अत्यावश्यक ठरणारा स्टॅमिना कमावला आहे. आता वेळ मिळेल तसा व्यायाम करतो. गेल्या सप्टेंबरमध्ये ‘पोलिश बायोसायन्स काँग्रेस’ने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत २८ सादरीकरणांपकी मला पहिलं पारितोषिक मिळालं. तिथल्या तज्ज्ञांनी शाबासकीची थाप दिली. माझ्या अभ्यासविषयाची चर्चा होऊन संशोधन योग्य दिशेने चालल्याचा निर्वाळा मिळाला.

विद्यापीठातर्फे विविध परिषदांना हजर राहण्याच्या निमित्ताने गेल्या दीड वर्षांत बरंच फिरायला मिळालं. स्वीडनच्या स्टॉकहोम विद्यापीठात आठवडाभर, लंडनच्या किंग्ज कॉलेजमधल्या लॅबमध्ये माझ्या पीएचडीच्याच कामानिमित्त महिनाभर राहिलो होतो. जर्मनीत ‘युनिव्हर्सटिी ऑफ पोस्टडॅम’मध्ये विंटर स्कूलमध्ये (शैक्षणिक शिबीर)आठ दिवस मुक्काम होता. या आठ दिवसांत हेंनिंग या जर्मन गृहस्थासोबत इतकी छान मत्री जमली की, आम्ही जणू काही आठ वर्षांपासून मित्र आहोत, असं दोघांनाही वाटत होतं. निघताना आम्ही एकमेकांना स्वदेशात येण्याचं निमंत्रण दिलं. सध्या तो फ्रान्सला स्थायिक असल्याने त्याने फ्रान्सला येण्याचं आमंत्रण दिलंच आहे. एकंदरच फिरस्तीमुळं जगाचा आपल्याकडे बघण्याचा आणि आपला जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन पार बदलून जातो. एका अर्थी परदेशी शिक्षण घेणारा विद्यार्थी हा त्याच्या देशाचा प्रतिनिधी असतो. आपल्या वर्तन आणि आचारविचारांकडे इतरांचं लक्ष असतं. त्यामुळे आपल्या देशाविषयी लोकांचं चांगलं आणि योग्य मत कसं होऊ शकेल, याचं भान ठेवावं लागतं. आमचे प्राध्यापक आर्तूर यार्मोवोस्की यांना भारताबद्दल प्रचंड प्रेम आणि कुतूहल वाटतं. एखाद्या कार्यक्रमाच्या वेळी आम्ही विद्यार्थी एखादा पदार्थ करून आणतो. तेव्हा भारतीय पदार्थाचा आस्वाद ते आवर्जून पहिल्यांदा घेतात. गेल्या वर्षी मी त्यांना दिलेली गणेशमूर्ती त्यांनी त्यांच्या कार्यालयात अजून ठेवली आहे.

एक आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे इथल्या लोकांना त्यांच्या पोलिश भाषेचा खूप अभिमान आहे. इंग्रजीला इथे ‘संशोधनाची भाषा’ सोडल्यास कोणीही डोक्यावर बसवत नाहीत. सुरुवातीच्या काळात पोलिश भाषेचा चांगलाच प्रश्न होता. विशेषत व्यावहारिक गोष्टींत अधिक अडचणी जाणवायच्या. सध्या मी विद्यापीठाच्या भाषा विभागातील वर्षभराचा पोलिश अभ्यासक्रम शिकत असून त्याच्या दोन सेमिस्टर झाल्या आहेत. पुढे इथे नोकरी करायची असल्यास पोलिश भाषेचं ज्ञान पुरेसं असणं आवश्यक आहे. ऑफ कॅम्पस डॉम्रेटेरीमध्ये राहात असून घर ते लॅब या रोजच्या ट्रामच्या प्रवासात जाता-येता वीस मिनिटं लागतात. या ट्राम प्रवासात पहिला आठवडाभर चांगलीच गडबड झाली होती. रस्त्यांची नावं पोलिशमध्ये असल्याने दिशेचा घोळ झाला होता. गुगल मॅपमुळे थोडी मदत झाली तरी तिकिटासह विविध गोष्टींची नीट माहिती करून घ्यावी लागली होती. इथे काटय़ा-चमच्याखेरीज जेवत नाहीत. त्यामुळे सुरुवातीला जेवताना थोडी तारांबळ उडत असे. आता सहज जमतं. आता मीच कुठे जेवायला गेलो की, त्यांना हाताने जेवायला शिकवतो. काही स्थानिक मित्रमंडळी झाली आहेत. एक मित्र कार्लोस हा बोहिव्हियन आहे. आमच्या सगळ्यांची इतकी छान मत्री झाली की, आपण बाहेरच्या देशातले आहोत, असं ते अजिबात जाणवून देत नाहीत. अगदी जिवाला जीव देणारे मित्र गवसले आहेत. इथल्या काही गोष्टी आपल्याला थोडय़ा गमतीशीर वाटू शकतात. त्यापकी एक म्हणजे पुरुषाचं आडनाव ‘स्की’२‘्र या अक्षरानं संपतं तर स्त्रीच्या आडनावाच्या शेवटी ‘स्का’ असं असतं. उदाहरणार्थ- आर्तूर यार्मोवोस्की, दोरोता राचिन्स्का इत्यादी.

मला स्वतच्या हाताने स्वयंपाक करून इतरांना खाऊ घालायला आवडतं. स्थानिकांना परदेशींविषयी कुतूहल वाटणं हे साहजिक असतं. त्यामुळे अनेक मित्रांच्या घरी आग्रहाने जेवायला बोलावलं जातं. तेव्हा किंवा इतरांना माझ्याकडे बोलावल्यावर माझ्या पाककौशल्याला अधिकच वाव मिळतो. पोझनानपासून १५० कि.मी.वर ‘झीलोना गुरा’ या छोटय़ाशा तालुक्याच्या ठिकाणी ‘लुक अँड कूक’ नावाची एक पाकशाळा आहे. तिथे भारतीय जेवण करायला मला आमंत्रित करण्यात आलं होतं. पोलिश भाषेत भारतीय जेवणाला ‘कुखनिया इंदिस्का’ असं म्हणतात. तिथे अनेकदा पाककलेच्या कार्यशाळा होतात. या किचन कम रेस्तराँमध्ये पाहुणे-यजमानांना स्वतचं जेवण स्वत रांधून ते इतरांना वाढण्याची सोय आहे. तिथे मी आमटी-भात,बटाटाभाजी, पोळ्या, कांदाभजी, चटणी आणि ताक असा साग्रसंगीत स्वयंपाक करून स्नेहीजनांना जेवायला वाढलं होतं. इथल्या काही शाळांमध्ये माझ्या संशोधन विषयावर आणि भारतीय संस्कृतीची माहिती सांगण्यासाठी मला आमंत्रित करण्यात आलं होतं. आपली खाद्यसंस्कृती, वेशभूषा यांविषयी स्थानिकांना कुतूहल वाटतं. मला मिळणारी शिष्यवृत्ती पुरेशी असल्याने अभ्यासात पूर्णपणे झोकून देणं शक्य होतं. युरोपमध्ये कुठेही चांगली नोकरी मिळाल्यास ती करायचा विचार आहे. दरम्यान भारतात चांगली संधी मिळाली तर भारतातच लगेच परतेन. पापडी ते पोझनान व्हाया पुणे हा प्रवास म्हणजे जणू सुरेख अनुभवांची मालकिाच. हे सगळं ठरवून अजिबात झालेलं नाही. प्रवास खरंतर अंधारातच होता, पण एक पाऊल टाकल्यावर आपोआपच पुढचा मार्ग सापडत राहिला आणि संधीच्या प्रकाशवाटा गवसत राहिल्या..

कानमंत्र

  • परदेशात गेल्यावर आपल्या ठरावीक आवडी-निवडींना थोडीशी मुरड घालून समोर आलेल्या गोष्टींचा नीट आस्वाद घ्या.
  • कोणत्याही दुविधेत न पडता मिळलेली चांगली संधी दवडू नका.

 

शब्दांकन : राधिका कुंटे

viva@expressindia.com