डिजिटल स्वातंत्र्य हे वेगवेगळ्या रूपांत आपल्याला भुलवतं आहे. एकीकडे सोशल मीडियावर व्यक्त होण्यापासून ते टीव्हीच्या वाहिन्या आणि त्यावरच्या मालिका मोबाइलवर कुठेही, कधीही-केव्हाही पाहण्याचं स्वातंत्र्य आपल्याला मिळालं आहे. मात्र वाऱ्याच्या वेगाने पसरत चाललेल्या या स्वातंत्र्याच्या जाणिवेला कुठे तरी जबाबदारीचं कोंदणही असायला हवं हे भान तरुणाईच्या मनातूनही सुटून चाललं आहे..

स्वातंत्र्य! पहिल्या ऐकण्यात जितका सोपा वाटतो तितका या शब्दाचा अर्थ प्रत्यक्षात आणायला कठीण आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे मनासारखं वागायची मुभा मिळाली एवढाच उथळ अर्थ या शब्दाला अपेक्षित नाही. स्वातंत्र्यासोबत हातात हात घालून येते ती जबाबदारी! भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हाच भारतीयांना अनेक हक्क, अधिकार आणि विविध पातळ्यांवरची स्वातंत्र्यं मिळाली. स्वातंत्र्य ही संकल्पना उपभोगायची असते एवढाच आपला समज आहे. मात्र स्वातंत्र्य हे सांभाळायचं आणि जपायचं असतं याचा आपण गंभीरपणे विचार फार कमी वेळा करतो. जसजसे सभोवतालच्या क्षेत्रांमध्ये बदल होत गेले तसतसं वेगवेगळ्या गोष्टींत आपल्याला स्वातंत्र्य मिळत गेलं. उदा. आपल्याकडे प्रत्येकाला स्वत:च्या खोल्या असण्याची पद्धत आली आणि आपल्याला आपल्या राहण्याचं, निवडीचं, स्वातंत्र्य मिळालं, आपल्याकडे वैयक्तिक मालकीची वाहनं आली आणि आपल्याला कुठेही हिंडायचं स्वातंत्र्य मिळालं, आपल्याकडे स्वत:चं बँक अकाऊंट आलं आणि आपल्याला स्वत:च्या व्यवहाराचं स्वातंत्र्य मिळालं. या सगळ्या खूप लहान पातळ्यांवरच्या काही गोष्टी झाल्या, मात्र जसं तंत्रज्ञान बदलत गेलं तसं आपल्यावरचा पालकांचा र्निबध सैल होत गेला आणि आपण आपल्या स्वातंत्र्याला गृहीत धरायला लागलो. आपल्याला असलेलं स्वातंत्र्य हे आपला जन्मसिद्ध हक्क आहे असं आपल्याला वाटायला लागलं आणि ते स्वातंत्र्य नाही मिळालं तर आपण अस्वस्थ व्हायला लागलो.

तंत्रज्ञानाने दिलेल्या स्वातंत्र्याने आपल्याला व्यक्त व्हायला हक्काची जागा उपलब्ध करून दिली. आपल्या वर्तुळातल्या सर्व माणसांपर्यंत सहजपणे पोहोचायची सोय तंत्रज्ञानाने करून दिली. सुरुवातीला थोडय़ा प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करणारे आपण हळूहळू आपली बारीकसारीक गोष्ट सोशल मीडियावर टाकू लागलो. व्यक्त होण्याचं माध्यम म्हणून सोशल मीडियाची ताकद आपल्या थोडी उशिरा लक्षात आली आहे, मात्र ती जेव्हा लक्षात आली तेव्हा आपण मोठय़ा समस्या, घटना, बदल, व्यापक विषय अशा गोष्टींवरही व्यक्त व्हायला लागलो. काही वेळा सोशल मीडियावरच्या अफवांमध्येही आपण जाणता-अजाणता सामील झालो. मात्र आपल्याला काहीही बोलता येतं आणि त्यावर कोणाचंही कोणतंही बंधन नसतं हे लक्षात आल्यापासून आपण प्रत्येकच गोष्टीवर व्यक्त व्हायला लागलो. काही वेळा कोणाची थट्टा करण्याच्या नादात त्याचा अपमान झाला तर कधी कोणावर टीका करण्याच्या नादात आपण सारासार विचार करणं विसरलो. सोशल मीडियाच्या स्वातंत्र्याने आपण सगळ्या विषयांची सरमिसळ केली आणि गंभीर विषयांवर गमतीत आणि फालतू विषयांवर अत्यंत गंभीरपणे चर्चा करायला लागलो.

या स्वातंत्र्याचे दोन प्रकारचे परिणाम झाले, अर्थातच एक सकारात्मक आणि एक नकारात्मक. या स्वातंत्र्याचा सकारात्मक उपयोग असा की परिणामकारकरीत्या एखादी भूमिका मांडणं आणि त्याला समविचारी लोकांचं समर्थन मिळणं ही कोणे एके काळी कठीण असणारी गोष्ट अगदी सहज साध्य झाली. आपल्या शब्दांवर आपलं नियंत्रण असलं की आपल्या वक्तव्याची परिणामकारकता वाढते हे आपल्या पिढीला वक्तृत्वाने नाही तर सोशल मीडियाने शिकवलं. आपल्या मताला काही ‘व्हॅल्यू’ मिळवून देणं हे या सोशल मीडियावरच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याने शक्य केलं. सोशल मीडियावर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मताला काही किंमत आहे. निदान त्या व्यक्तीच्या वर्तुळात असलेल्या इतर माणसांपर्यंत तरी त्याचं म्हणणं पोहोचतंय याची सोशल मीडियाने काळजी घेतली. या डिजिटल स्वातंत्र्याने इतरांपर्यंत आपलं मत पोहोचवणं सुकर आणि सहज केलं. मात्र या स्वातंत्र्याची नकारात्मक बाजू अशी की, कोणीही कोणत्याही विषयावर आपलं मत मांडायला सुरुवात केली. जगातल्या कोणत्याही विषयावर कोणालाही मत मांडायचा हक्क आहे हे जरी मान्य केलं तरी याचा अर्थ एखाद्याने खरंच प्रत्येक घटनेवर मत मांडायला सुरुवात केली की त्याचं हसं झाल्याशिवाय राहत नाही. पुलंनी म्हटल्याप्रमाणे ‘अमेरिकेची आर्थिक घडी यावर मत देताना आपलं कर्तृत्व काय, शैक्षणिक दर्जा काय, याचा कोणताही विचार न करता मत ठोकून मोकळं व्हायचं. त्या वेळी आपण पुणे महानगरपालिकेत उंदीर मारण्याच्या विभागात आहोत हे सोयीस्कररीत्या विसरायचं.’ असे अनेक बोलबच्चन या डिजिटल अभिव्यक्तिस्वातंत्र्यामुळे उदयाला आले. त्यांची ही बोलबच्चनगिरी अनेकदा हास्यास्पदच सिद्ध होते.

या दोन्ही बाजू पाहता डिजिटल अभिव्यक्तिस्वातंत्र्य ही आपल्याला तंत्रज्ञानाने दिलेली एक शक्ती आहे. त्या शक्तीचा वापर करून अनेक गट समाजकार्य करत आहेत, अनेक जण आपला व्यवसाय उभारत आहेत तर अनेक जण ठामपणे इतरांपेक्षा वेगळी असलेली त्यांची भूमिका मांडत आहेत. आपल्या हाती आलेल्या स्वातंत्र्याचा आपण समजूतदारपणे आणि प्रगल्भतेने उपयोग केला तर येऊ  घातलेल्या डिजिटल युगातले आपण ‘मॅच्युअर्ड’ नागरिक असू.