तुम्ही कधी कपडय़ाच्या चिंध्या सौंदर्यदृष्टीने बघितल्या आहेत का? किंवा प्लास्टिकची पाण्याची बाटली? आणि जुन्या वापरून मऊ झालेल्या फाइल्स? तुम्हाला आश्चर्य वाटेल हे असे प्रश्न का पडावेत, पण याच टाकाऊ सामानापासून सुंदर वस्तू बनवून त्याचा घरच्या घरी व्यवसाय सुरू केलाय पुण्याच्या दोन मुलींनी. निशिगंधा खळदकर आणि श्रुती जातेगांवकर या दोघी महाविद्यालयीन मुलींना या टाकाऊ गोष्टींमध्ये सौंदर्य दिसलं आणि बेस्ट फ्रॉम द वेस्ट हे सिद्ध करणारा हृदा क्रिएशन्स हा ब्रॅण्ड त्यांनी सुरू केला.

डीईएस लॉ कॉलेजमधून कायद्याचा अभ्यास करणारी श्रुती आणि फग्र्युसन कॉलेजमधून बीए करणारी निशिगंधा या दोघी घट्ट मैत्रिणी.. अगदी शाळेपासून नेहमी एकत्र. दोघींनाही कलेची आवड आणि काही तरी हटके करण्याची पॅशन. ही ‘बेस्ट फ्रॉम द वेस्ट’ची आयडिया कशी सुचली याबद्दल बोलताना निशिगंधा सांगते, ‘आईचे बुटीक असल्यामुळे वाया जाणारं फॅब्रिक खूप असायचं. शाळेत असताना या चिंध्यांपासूनच माझ्या फाइल्सना कव्हर लावणे वगैरे उद्योग सुरू होतेच. आमच्या फ्रेण्ड्सना गिफ्ट द्यायला मी आणि श्रुती मिळून यापासूनच वस्तू तयार करायचो. आमचं एकत्र काम करणं तेव्हापासूनच सुरू झालं.. कॉलेजमध्ये गेल्यावर फिर तो टय़ूनिंग जम गई.’

vv12इतक्या कमी वयात स्वत:चा व्यवसाय, स्वत:चा ब्रॅण्ड असणं ही नक्कीच मोठी बाब. कलेला आणि त्यातून आलेल्या व्यवसायाला खरं तर वयाची अट नसतेच. ‘एकदा आम्ही केलेल्या या टाकाऊतून टिकाऊ अशा कलात्मक वस्तूंविषयी फेसबुकवर पोस्ट टाकली आणि त्याला मिळालेल्या प्रतिसादातूनच खरं तर ‘हृदा’चा जन्म झाला आहे’, निशिगंधा सांगते. वेस्ट फॅब्रिकपासून तयार करण्यात आलेल्या फाइल्स, नोटबुक्स, लॅम्पशेड्स अशा वस्तूंना छान प्रतिसाद मिळाला आणि आपली कला आणखी लोकंपर्यंत प्रोफेशनली पोचली पाहिजे. या कल्पनेने या दोघींनी हिृदा क्रिएशन्स सुरू केलं. या ब्रॅण्डचा प्रेझेन्स सध्या तरी ऑनलाइन जगातच आहे. हिृदा क्रिएशन्सचं फेसबुक पेज आहे. निशिगंधा आणि आणि श्रुतीला या पेजवरूनदेखील ऑर्डर मिळतात. शिवाय ठिकठिकाणी भरणाऱ्या प्रदर्शनांमधून ‘हृदा’चे स्टॉल्स या मुली लावतात.

जवळजवळ वर्षभरापूर्वी हृदा क्रिएशन्सचा जन्म झाला. ‘हृदा : द आर्ट फ्रॉम विदिन’ या वेगळ्या नावाबद्दल सांगताना श्रुती म्हणाली, ‘हिृदा हा संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ आहे शुद्ध.. प्युअर – स्ट्रेट फ्रॉम हार्ट. आमची कला शुद्ध आहे. इट कम्स फ्रॉम अवर हार्ट.’ हिृदाच्या ब्रॅण्डखाली या दोघी टाकाऊ वस्तू, चिंध्या, प्लॅस्टिकच्या बाटल्या यापासून फाइल्स, वह्य़ा, नोटपॅड, पाउच, लॅम्पशेड, कार्ड्स अशा बऱ्याच गोष्टी तयार करतात. फॅब्रिक क्राफ्टिंग ही हिृदाची स्पेश्ॉलिटी. येत्या २५ आणि २६ जुलैला पुण्याच्या दर्पण आर्ट गॅलेरीमध्ये त्या या वस्तूंचं प्रदर्शन लावणार आहेत. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात प्रथमच त्या प्रदर्शन भरवत आहेत. ‘इट्स लाइक अ ड्रीम कम ट्र. ‘हृदा’ची टीम आता वाढली आहे. १५ ते २० कॉलेज स्टुडंट्स एकत्र मिळून आमच्या ब्रॅण्डसाठी काम करत आहेत. या एक्झिबिशनमध्ये जवळजवळ १००० ते १२०० वस्तू असणार आहेत. पेंटिंग, पॉटरी, टेराकोटाचे लॅम्प्स, आमची स्पेश्ॉलिटी फॅब्रिक क्राफ्ट.. असं भरपूर काही. हिृदामध्ये सगळे कॉलेज स्टुडंट्स काम करतात. आम्ही एकत्र मिळून आपापल्या कलेला एकत्रितपणे व्यासपीठ मिळवून द्यायचा प्रयत्न करतोय. आपल्या वेळेनुसार ऑर्डर्स पूर्ण करतो. एकत्र काम करताना खूप शिकायला मिळतं..’ निशिगंधा आणि श्रुती सांगतात.

आपल्यातल्या कलेला पॅशनची जोड असली की, वय, शिक्षण अशी बंधनं येत नाहीत. कॉलेजजीवनातच स्वत:चा उद्योग सुरू करणाऱ्या ‘हृदा’च्या निर्मात्या हेच सिद्ध करतात.

निहारिका पोळ