News Flash

बुक शेल्फ : प्रभावशाली ‘सप्तपदी’…

समाजात जागतिकीकरणानंतर झालेले बदल आणि वैश्विक डिजिटल बाजारपेठेत झालेले बदल एक प्रश्न सातत्याने उपस्थित करीत आले आहेत, जगावर आपला ठसा उमटविणाऱ्या लोकांच्या काही समान सवयी

| February 22, 2013 01:05 am

समाजात जागतिकीकरणानंतर झालेले बदल आणि वैश्विक डिजिटल बाजारपेठेत झालेले बदल एक प्रश्न सातत्याने उपस्थित करीत आले आहेत, जगावर आपला ठसा उमटविणाऱ्या लोकांच्या काही समान सवयी असतात का आणि या सवयी काळाच्या कसोटीवर शाश्वत राहतात का?
या दोन्ही प्रश्नांचे सकारात्मक उत्तर म्हणजे, ‘अतिपरिणामकारक लोकांच्या सात सवयी’ हे स्टीफन कव्ही लिखित पुस्तक. आपल्या आयुष्यात जर आपल्याला सर्वोच्च ध्येय प्राप्त करायचे असेल तर ते ज्यावर अवलंबून आहे असे निसर्गाचे तत्त्व ओळखणे आणि त्या तत्त्वाभोवती आपले आयुष्य गुंफणे या मूलभूत संकल्पनेवर हे पुस्तक मांडले गेले आहे.
पुस्तकाची प्रस्तावनाच इतकी नेमकी आणि मार्मिक आहे की आपल्या मनावर पुस्तक तिथूनच पकड घेते. भीती आणि असुरक्षितता, ठपका आणि बकरा करण्याची वृत्ती, निराशावाद, जीवनातील संतुलनाचा अभाव, वाद-विवाद आणि समजूतदारपणा या बाबी आपण कशा हाताळतो यावर आपला समाजमनावरील प्रभाव अवलंबून असतो, असे लेखकाने उदाहरणासह सांगितले आहे.
दोन लाकूडतोडे एकदा झाड तोडत असतात. दोघांपैकी एक क्षणभर थांबतो, आपल्या कुऱ्हाडीला धार काढतो. दुसऱ्यालाही त्याने धार काढावी असे सुचवितो, पण धार काढत बसायला इथे वेळ कोणाला आहे, असे विचारत पहिला आपले काम ‘रेटत’ राहतो. परिणाम काय असेल यावर फार विचार करायची गरजच नाही. पण आपणही आपल्या आयुष्यात वेगळे काय करतो? मुळात हाती घेतलेल्या कामामध्ये कौशल्य कमी पडत असताना कौशल्य शिकण्याऐवजी आपण ‘रेटत’ राहतो. प्रभावशाली लोक इथे वेगळे ठरतात.
अनेकदा आपल्या आयुष्यात कळीचा निर्णय घेण्याची वेळ येते. यातील बहुतेक प्रश्न असे असतात की, जिथे एकच पर्याय आपल्याला विजयपथाकडे नेत असतो. उर्वरित पर्याय आपल्याला पराभवाकडे नेतात. अशा प्रसंगांमध्ये आपण असा पर्याय शोधायचा प्रयत्न करतो का की पर्याय कोणताही असो तो आपली उन्नतीच घडवू शकेल? कव्ही यांनी हे सूत्र अत्यंत परिणामकारकतेने मांडले आहे.
हरवलेल्या वाटसरूला आपण सहज प्रश्न विचारतो, ‘नेमके’ कुठे जायचे आहे. बहुतेकदा अनुभव असतो की, याचे उत्तर संदिग्ध असते तेव्हाच माणसे रस्ता चुकतात. पण व्यक्तिगत जीवनात आपण हा प्रश्न स्वत:लाच विचारतो का की ‘नेमके’ कुठे जायचे आहे आपल्याला? अकरावीला शाखेची निवड करण्यापासून, विवाहाच्या वेदीवर उभे राहीपर्यंत, नोकरीची- कारकिर्दीची निवड कराताना, एखाद्या वेळी सार्वजनिक ठिकाणी भांडताना, एखाद्या मतभेदाच्या मुद्दय़ावर तावातावाने बोलताना.. आपल्याला खरेच हे माहीत असते का की ‘नेमके गंतव्यस्थान काय आहे’.. आणि याच प्रश्नाच्या उत्तरामध्ये किंवा अनुत्तरिततेमध्ये आपण कितपत प्रभावी ठरू शकतो, या प्रश्नाचे उत्तर सामावलेले आहे.
जगभरातील विलक्षण परिणामकारक व्यक्तिमत्त्वांच्या अभ्यासातून लेखक कव्ही यांनी त्यांच्या सवयींचा लघुत्तम सामायिक विभाजक काढला आहे. हा ल.सा.वि. म्हणजेच हे पुस्तक. आज जेव्हा आपण अधिकाधिक अंतर्मुख होण्याची गरज आहे तेव्हा आपल्या अंतर्मुखतेला चालना देणारे..

पुस्तक – अतिपरिणामकारक लोकांच्या सात सवयी
लेखक – स्टीफन आर. कव्ही
अनुवाद – विदुला टोकेकर
प्रकाशन – मंजुल प्रकाशन
पृष्ठे – ४३१
मूल्य – २९५

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2013 1:05 am

Web Title: bookshelf book review of 7 habits to follow by stephen r kavi
Next Stories
1 मिकीज् फिटनेस फंडा : मार्ग स्त्री आरोग्याचा
2 विष्णूज् मेन्यू कार्ड : चला सावजींच्या राज्यात
3 व्हिवा दिवा : समिधा अवसारे
Just Now!
X