News Flash

माझं माध्यम, माझी भाषा

परदेशात गेल्यानंतर जाणवणारा संस्कृतिबदल, खाण्यापिण्यात होणारा बदल, भाषेचा बदल हा जीवनशैलीतील मोठा बदल आहे.

|| विशाखा कुलकर्णी

दरवर्षी येणाऱ्या ‘मराठी भाषा दिना’निमित्त शाळा-कॉलेज विविध संस्था मराठी भाषेविषयी विविध कार्यक्रम आयोजित क रतात. या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिकांची, साहित्याची विविध मराठी-अमराठी लोकांना ओळख करून दिली जाते. करोनामुळे सर्वच गोष्टी सध्या ऑनलाइन होत असताना यंदाचे ‘मराठी भाषा दिना’चे कार्यक्रमदेखील ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर होताना दिसत आहेत. तरुणाईचे माध्यम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स च्या मदतीने परदेशातही अनेक मराठीजन खास मराठीतून विविध यूट्यूब चॅनेल्सच्या माध्यमातून आपल्या भाषेचा प्रसार करताना दिसतात…

 

खरं तर कुठल्याही भाषेचे संवर्धन करणे म्हणजे केवळ  एखाद्या दिवशी त्या भाषेविषयीचे प्रेम व्यक्त करणे एवढेच नाही, तर त्या भाषेचा रोजच्या आयुष्यात  होणारा अधिकाधिक वापर महत्त्वाचा असतो. मराठी भाषेच्या बाबतीत मराठी तरुणाई प्रत्यक्ष मराठीचा वापर करतेच, पण ज्या माध्यमाचा वापर ते सर्वाधिक करतात ते माध्यम म्हणजे ऑनलाइन प्लॅटफॉर्म… त्यावरही तरुणाई मराठी भाषेचा वापर आवर्जून करताना दिसते. खरे तर महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातील बोलीभाषेसह मराठी भाषा सोशल मीडियासारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर वापरणे भाषेच्या वापर आणि प्रसार-प्रचार होण्यासाठी गरजेचे आहे. अनेक सोशल मीडिया क न्टेन्ट क्रिएटर्स मराठीतून व्यक्त होत सोशल मीडियावर नवनवीन क न्टेन्ट टाकत असतात. यूट्यूबवर पोस्ट केले जाणारे व्हिडीओ ब्लॉग हेही अशाच प्रकारचे माध्यम आहे. सध्या याच माध्यमांच्या मदतीने परदेशात अनेक जण विविध संकल्पनांवर आधारित मराठी यूट्यूब चॅनेल्स, शोज करताना दिसत आहेत.

परदेशात गेल्यानंतर जाणवणारा संस्कृतिबदल, खाण्यापिण्यात होणारा बदल, भाषेचा बदल हा  जीवनशैलीतील मोठा बदल आहे. याविषयी अनेकांनी आपल्या प्रवास वर्णन ब्लॉगमध्ये लिहिले आहेच, पण व्यक्त होण्याचं आणखी नवं माध्यम ‘व्ह्लॉग’ म्हणजेच व्हिडीओ ब्लॉग, या माध्यमातूनही अनेक जण परदेशात राहून आपल्या तिथल्या ‘लाइफस्टाइल’विषयी ब्लॉग्स तयार करत असतात.  परदेशात स्थायिक झालेल्या अनेक मराठी बांधवांनी असे व्हिडीओ ब्लॉग तयार केले आहेत, जे यूट्यूबवर लोकप्रिय आहेत. पूर्वी परदेशात जाणारी, जाऊन आलेली व्यक्ती म्हटलं की, लोकांना फार अप्रूप वाटे. खरं तर  हल्लीच्या काळात अनेक जण पर्यटन, शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने परदेशात जातात, तिथेच वास्तव्यदेखील करतात, पण तरीही परदेशी समाजजीवन – राहणीमान याविषयी असणारे प्रश्न, उत्सुकता कायम आहे. त्यातही मराठी माणसे आपले राहणीमान, खाण्या-पिण्याच्या पद्धती, परदेशात जातानाही घेऊन जातात आणि तिथे वास्तव्य करताना आपले मराठीपण जपत तिथली होतात. मग त्या लंडनच्या कहाणीमधल्या अशिक्षित असूनही, लंडनमध्ये जाऊन अक्षरश: शून्यातून विश्व उभारत आपली मराठी संस्कृती तिथे जपणाऱ्या – रुजवणाऱ्या आजीबाई वनारसे असोत किंवा आजही विविध मराठी मंडळे असोत, ज्यांनी एकत्र येऊन मंडळाच्या माध्यमातून परदेशात आपली मराठी संस्कृती जपली आहे. या सगळ्या मराठी व्यक्ती परदेशात गेल्यावर आपली भाषा आणि संस्कृती जपताना दिसतात. यूट्यूबवरील व्हिडीओ ब्लॉगर्स अशाच प्रकारे परदेशात राहून तिकडचे राहणीमान आणि मराठीपण याची सांगड घालत व्हिडीओ तयार करतात.

असेच एक यूट्यूब चॅनेल आहे- ‘धन्य ते फॉरेन’. या चॅनेलवरून जर्मनीतील श्वेतल कदम तिथली लाइफस्टाइल, घरे, तिथले स्वयंपाकघर, रस्ते, परिसर अशा नेहमीच्या दिसण्यातल्या गोष्टींविषयी व्हिडीओ तयार करतात. या वेळी तिथे या गोष्टी भारतापेक्षा कशा वेगळ्या आहेत. जर्मनीतील लोक, हॉटेल्स तिथल्या भाषेचा वापर अशा सगळ्या गोष्टींची माहिती त्या खूप छान पद्धतीने देतात. दैनंदिन वापराच्या गोष्टी भारत-जर्मनीत कशा वेगवेगळ्या असतात अशा माहितीचे लहान-लहान व्हिडीओ बघणे रंजक आहे.

मायक्रोबायोलॉजिस्ट असलेल्या पूजा ठाणेकर-माने या आपल्या ‘इंडिया टू यूके’ चॅनेलवर आपले व्हिडीओ ब्लॉग टाकतात. इंग्लंडमध्ये वास्तव्यास असणाऱ्या पूजा यांच्या व्हिडीओमध्ये तिथली घरे, इमारती, मॉल्स अशा गोष्टींचे व्हिडीओ आहेत. यातदेखील तिथले नियम, पद्धती, प्रवासाच्या सोयी अशा सगळ्या गोष्टींचीदेखील माहिती  संवाद साधत त्या देतात, त्यामुळे हे व्हिडीओ बघून यूकेविषयीची बरीच माहिती मिळते. अशाच प्रकारची माहिती अमेरिकेतील विदुला दीक्षित आपल्या ‘अमेरिका ही साजिरी’ या चॅनेलच्या माध्यमातून देतात. अमेरिकेतील भारतीय खाणे-पिणे, दुकानं, अमेरिकेतील सण, भारतीय सण असे विषय घेत तयार केलेले व्हिडीओ पाहून मराठी माणसे अमेरिकेत कसे जीवन जगतात याची कल्पना येते. अशाच प्रकारचे व्हिडीओ जर्मनीतील सौरभ गंधे आपल्या ‘क्लास१टीव्ही’ या चॅनेलच्या माध्यमातून देतात.

ब्राझील येथे राहणाऱ्या सुलक्षणा वराडकर या ब्राझीलमधील ठिकाणे, खाद्यसंस्कृती, घरे, समाजजीवन या सगळ्यांची माहिती आपल्या व्हिडीओतून देतात, ब्राझीलमधील माणसांशी संवाद साधत, आपल्या व्हिडीओमधून मराठीत ते सांगत तयार केलेले सुलक्षणा वराडकर यांचे व्हिडीओ फार सुंदर असतात. या व्हिडीओमध्ये त्या महाराष्ट्रीय-भारतीय लोकांना ब्राझीलमधील काय आवडेल, त्यांच्या आणि आपल्या संस्कृतीत असलेले फरक, साम्य अशा अनेक विषयांवर बोलतात, नवनवीन विषयांवर असलेले हे व्हिडीओ अगदी माहितीपूर्ण असतात.

असेच वेगवेगळ्या देशांतील दैनंदिन जीवनाची माहिती देणारे अनेक  यूट्यूब चॅनेल्स आहेत, यातली काही नावं घ्यायची झाली तर… ‘अमेरिका आणि मी’, ‘फॉरेनचा मोठेपणा’, व्हर्च्युअल गप्पा’ यासह इतरही अनेक चॅनेल्स आहेत. या चॅनेल्समुळे घरबसल्या आपल्याला या देशांतील समाजजीवन जवळून अनुभवता येते. एखाद्या मराठी व्यक्तीला परदेशात जायचे असल्यास अशा ब्लॉग्समुळे त्यांना आधीच भाषेपासून सर्व गोष्टींची माहिती मिळवता येते. शाळेत असताना भूगोलाच्या पुस्तकात ओळख झालेले देश आपण असे व्हिडीओच्या माध्यमातून प्रत्यक्ष नाही तरी यूट्यूबच्या मदतीने फिरून येऊ शकतो. अनेक बारीकसारीक गोष्टी, ज्या फक्त त्या देशात अनुभवल्या जाऊ शकतात, अशा गोष्टींची माहिती या ब्लॉगमधून बघता येते. या सर्व यूट्यूब चॅनेल्समध्ये परदेशात असूनही मराठी भाषा आणि संस्कृती या सर्वांनी सोडलेली नाही, हे लक्षात येते. मराठीत असल्याने या चॅनेल्सना हजारो सबस्क्राइबरदेखील आहेत. क न्टेन्ट क्रिएशन, इन्फ्लुएन्सर्स असे परवलीचे शब्द महत्त्वपूर्ण असणाऱ्या या काळात अशा यूट्यूब चॅनेल्समुळे मराठी भाषा महाराष्ट्रासह जगभरात सर्व माध्यमांतून वापरली जात असल्याचे दिसते. अशा प्रकारे मराठी भाषेचा सर्व माध्यमांतून वापर  होत राहिला, तर ‘मराठी असे आमुची मायबोली’ या ओळी आपण अभिमानाने गाऊ शकू!

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2021 12:02 am

Web Title: my medium is my language youtube online platform akp 94
Next Stories
1 आपण यांना पाहिलंत का?
2 वस्त्रान्वेषी : या पागोट्याखाली दडलंय काय?
3 ‘कौशल्य’पूर्ण विकास
Just Now!
X