सौरभ करंदीकर

असं म्हणतात की मानवाच्या पृथ्वीवरील ‘लिव्ह अ‍ॅण्ड लायसन्स’च्या बरेच आधीचे भाडेकरू – डायनासॉर – हे मानवाएवढेच, किंबहुना थोडेसे अधिक हुशार होते. आज उत्खननामध्ये मिळालेल्या डायनासॉरच्या सांगाडय़ांचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या मेंदूच्या सापेक्ष आकारावरून काही तज्ज्ञांचा असा ग्रह झाला आहे. जे असेल ते असो, त्यांच्या कारकीर्दीचा अंत टाळण्याची कल्पकता मात्र ते दाखवू शकले नाहीत. सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर आदळलेल्या १० ते १५ किलोमीटर आकाराच्या एका उल्केने त्यांची सद्दी संपवली. येणाऱ्या संकटाची कल्पना असणं आणि त्या संकटाचा सामना करता येणं या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. डायनासॉर संस्कृतीत विज्ञानाची काय प्रगती होती? त्यांचं तंत्रज्ञान किती पुढारलेलं होतं? याबद्दल काहीही पुरावे सापडलेले नाहीत. परंतु जर ते मानवी तंत्रज्ञानाप्रमाणे विकसित असतं तर कदाचित आज ‘डायनासॉर-मनुष्य भाई भाई’चे नारे द्यावे लागले असते!

त्या ‘डायनासॉर—किलर’ उल्केच्या आकाराची कोणतीही वस्तू आजतागायत पृथ्वीवर आदळलेली नाही, परंतु त्याहून काहीशी छोटी सुमारे ६० ते १०० मीटर आकाराची उल्का, ३० जून १९०८ रोजी रशियातील पॉदकामनाया तंगतस्का नदीलगत आदळली. या उल्केचा पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचण्याआधीच, सुमारे ५-१० किलोमीटरवर स्फोट झाला. तरीही त्यात सुमारे २००० चौरस किलोमीटर जंगल उद्ध्वस्त झालं.  असा उल्कापात दर काही शतकांच्या अंतराने होत असतो.

याहूनही छोटी, केवळ २० मीटर आकाराची उल्का २०१३ साली (पुन्हा एकदा) रशियातील चेल्याबिन्स्क प्रदेशावर आदळली. ही उल्कादेखील जमिनीवर पोहोचू शकली नाही, परंतु तिच्या वातावरणातील विध्वंसामुळे, आणि सभोवतालच्या मालमत्तेच्या पडझडीमुळे सुमारे १५०० जणांना किरकोळ दुखापत झाली, तर ११२ जणांना इस्पितळात हलवावं लागलं. या आकाराच्या उल्का दर १०-१२ वर्षांनी आपल्या ग्रहावर प्रहार करत असतात. त्यातील काही वातावरणातच विलीन पावतात, तर काही अशा हानिकारक ठरतात.

अमेरिकेचे लघुग्रह पर्यवेक्षण केंद्र अवकाशातल्या सुमारे ८ लाख वेगवेगळ्या वस्तूंवर नजर ठेवतं. त्यापैकी सुमारे २४,००० वस्तूंच्या कक्षा पृथ्वीच्या कक्षेला छेद देतात. त्यापैकी नेमक्या किती आपल्या भेटीला येतील त्यावर हे केंद्र पाळत ठेवून आहे. तंत्रज्ञान जसं प्रगत होतंय तशी निरीक्षणं अधिक अचूक होत आहेत आणि धोकादायक वस्तूंच्या संख्येतदेखील वाढ होते आहे.

अशा अस्मानी संकटांचा मुकाबला कसा करावा याचा शास्त्रज्ञ वर्षांनुवर्षे विचार करत आहेत. जगभरातील खगोलशास्त्रज्ञांनी विविध उपाययोजना सुचवल्या आहेत. अमेरिका आणि रशिया यांच्यासारखी प्रगत राष्ट्रं आपापल्या अंतराळ संशोधन संस्थांना असे कार्यक्रम आखायला सांगत आले आहेत. परंतु यात सुसूत्रता नव्हती. एखादा लघुग्रह, धूमकेतू किंवा उल्का कुठेही आदळली तरी साऱ्या जगाला त्याचा परिणाम भोगावा लागणार आहे. त्यामुळे नासाने २०१६ साली ‘प्लॅनेटरी डिफेन्स कोऑर्डिनेशन ऑफिस’ची स्थापना केली. या बहुराष्ट्रीय संघटनेने अवकाशावर नजर ठेवणे, पृथ्वीवर आदळू शकेल अशा प्रत्येक आगामी वस्तूचे निरीक्षण करणे, अशा वस्तूंची वर्गवारी करणे, प्रत्येकाकडून संभवणाऱ्या धोक्याची पातळी ठरवणे आणि त्यावर उपाययोजना राबवणे असे आपले उद्देश जाहीर केले आहेत.

‘प्लॅनेटरी डिफेन्स कोऑर्डिनेशन ऑफिस’चा पहिला उपक्रम आहे ‘डार्ट’ – डबल अ‍ॅस्टरॉइड रिडायरेक्शन टेस्ट. शास्त्रज्ञांनी या टेस्टसाठी ‘डिडमॉस’ नावाची एक उल्का-द्वयी – म्हणजेच दोन उल्कांची जोडगोळी  निवडली आहे. या उल्का-द्वयीपासून पृथ्वीला कोणताही धोका नाही. परंतु ती आपल्या काहीशी जवळून जाणार आहे. म्हणूनच प्रयोग करण्यासाठी आणि निरीक्षण करण्यासाठी ती उत्तम उमेदवार आहे. ‘डिडमॉस- ए’ ही उल्का सुमारे ७८० मीटर आकाराची आहे, तर त्याभोवती चंद्राप्रमाणे प्रदक्षिणा घालणाऱ्या ‘डिडमॉस-बी’चा आकार काहीसा छोटा – १६३ मीटरचा आहे. या उपक्रमाचं शस्त्र आहे ‘डार्ट अवकाशयान’. २०२१च्या जुलै महिन्यात या अवकाशयानाचं प्रक्षेपण होणार आहे. डिडमॉसची आणि या अवकाशयानाची भेट २०२२च्या सप्टेंबर महिन्यात होईल असा अंदाज आहे. हे अवकाशयान छोनेखानी असलं तरी बंदुकीच्या गोळीप्रमाणे ताशी १५,००० किलोमीटर वेगाने ते ‘डिडमॉस-बी’वर आदळेल आणि त्याची ‘डिडमॉस- ए’भोवती असलेली कक्षा काही अंशाने बदलून टाकेल. म्हणजेच त्याच्या प्रदक्षिणेचा काळ काही सेकंदाने कमी होईल. डार्ट अवकाशयानाचा या गळामिठीमध्ये पूर्णपणे चक्काचूर होईल त्यामुळे ‘डिडमॉस-बी’ची कक्षा खरंच बदलली का?  याचं मोजमाप पृथ्वीवरील वेधशाळेतून करण्यात येणार आहे.

‘अब्जावधी डॉलर्स खर्च करून हा छोटासा धक्का देण्यात काय मतलब?’ अशी शंका उपस्थित होईल. परंतु पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या धोकादायक उल्का, लघुग्रह, धूमकेतू इत्यादींना (वेळेवर) सूक्ष्म धक्के दिले तर त्यांचा मार्ग किंचित बदलेल आणि पृथ्वीचा धोका टळेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. ‘अर्मागेडन’ आणि ‘डीप इम्पॅक्ट’सारख्या हॉलीवूडपटात दाखवल्याप्रमाणे अण्वस्त्र वापरून उल्केचा नायनाट करायची किंवा तिचे छोटे तुकडे करायची अजिबात गरज नसते. शिवाय अशी नासधूस मनोरंजक वाटली तरी ती करणं आपल्याला खरंच शक्य आहे का? शिवाय अशा शक्तिशाली अण्वस्त्रांचं प्रक्षेपण करताना काही चूक झाली, तर ‘एक करताना दुसरं झालं’ अशी परिस्थिती होईल त्याचं काय? इत्यादी प्रश्न महत्त्वाचे आहेत. येणाऱ्या संकटांची कल्पना आणि त्यावरील उपाययोजना, या दोन्हीतील आपली प्रगती डायनासॉरला मागे टाकेल अशी प्रार्थना करू या.

viva@expressindia.com