गायत्री बर्वे-गोखले

सध्याच्या परिस्थितीत सतत होणारा उपदेशाचा मारा, घाबरवून टाकणाऱ्या न्यूज आणि घरात राहून येत चाललेलं नैराश्य या सगळ्यावर उत्तर म्हणजे जास्त विचार न करणे आणि आपलं मन  रमवणे. बाहेर पडता येत नाही हे जरी दु:ख असलं तरी याची चांगली बाजू आपण पाहायला हवी. आपली माणसं घरी आपल्या डोळ्यासमोर आहेत. तेव्हा एरवी न होणारा संवाद साधायची ही उरलीसुरली संधी दवडता कामा नये.

कुकिंग ही एक उत्तम थेरपी आहे, हे स्वानुभवावरून सांगते आहे. मला त्याचा कधीच कंटाळा येत नाही, फक्त डाएट रेसिपीजच नाहीत तर नव्या आणि पारंपरिक अशा सगळ्या पाककृती मला करायला आवडतात. सध्या मिळालेल्या वेळेचा मी त्या सगळ्या करायच्या राहून गेलेल्या पाककृती करून सदुपयोग करते आहे. असंच प्रत्येकाने आपल्या आवडीच्या गोष्टी करायच्या ठरवल्या तर सहज चांगला वेळ जाईल आणि कंटाळा येणार नाही. कुकिंग, पुस्तक वाचन आणि इतर अनेक छंद जोपासत असतानाच रोजच्या गडबडीत आपल्याला अजून एका गोष्टीसाठी वेळ मिळत नाही ते म्हणजे स्वत:कडे लक्ष देणे. सेल्फ ग्रुमिंग हा फॅशनचा भाग नसून तो एक मोठा फील गुड फॅक्टर आहे हे विसरता कामा नये. वय काहीही असो आपण नुसता हेअरकट करून आलो तरीही आपल्याला खूप आनंद होतो. मग भले तो अगदी साधा स्टेप कट का असेना.  फॅशन करणं अपेक्षित नाही, पण स्वत:साठी वेळ काढून बाह्य़ स्वचे थोडे लाड पुरवले तर त्या आंतर स्वचे स्वास्थ्य सुधारण्यास खूप मदत होते हे लक्षात येईल.

घरून काम करण्याऱ्यांचं रुटीन बऱ्यापैकी सेट असतं. तरीही त्यांनी वेळोवेळी छोटी विश्रांती घेणं, उठून पाणी पिणं, हात पाय मोकळे करणं, मध्येच एखादं गाणं ऐकणं यामुळे कामाचा ताण जाणवणार नाही. ज्यांना घरून काम करावं लागत नाही आहे त्यांच्या रुटीनचे बारा वाजलेले दिसून येत आहेत. अवेळी जेवण आणि उशिरा झोपणं याचा वाईट परिणाम पचन संस्थेवर होतो आणि डायरिया/ कॉन्स्टिपेशन सारखे आजार उद्भवतात. त्यामुळे कुठेही जायचं नसलं तरी वेळेत उठून आवरणं, सध्या नियम शिथिल झाले असल्याने बाहेर पडून जॉगिंग करणे किं वा घरच्याघरी व्यायाम करणेही शक्य आहे. आधीपेक्षा वस्तू मिळणे सहजसोपे झाले असले तरी रोगापासून स्वत:चा जीव वाचवणं हे आपलं मुख्य उद्दिष्ट आहे हा फरक प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवा. तेव्हा भाज्या आणण्यासाठी म्हणून सतत घराबाहेर पडण्यापेक्षा घरात असलेल्या पदार्थाचा उपयोग करता येईल. त्यांचा वापर कसा करता येईल हे पाहू.

साधारण घरात असणारे पदार्थ म्हणजे तांदूळ, कणिक, बेसन, मूग,मटकी, चणे, मूग डाळ, तूर डाळ, रवा, पोहे, साखर, बटाटे, कांदे, टोमॅटो, बेसिक मसाले,भाजणी, आंबोळी पीठ, कुळीथ पीठ, ड्राय फ्रुटस. या पदार्थामधून असंख्य पदार्थ बनवता येतात. येत नसतील तर इंटरनेटवर अनेक वेगवेगळ्या रेसिपीज उपलब्ध आहेत त्यांचा वापर करायला हवा. नाश्त्यासाठी पोहे, उपमा, गोड शिरा, थालिपीठ, बेसन चिला, मूग डाळ डोसे, रवा अप्पे, मोकळ भाजणी, ताकाची उकड, मऊ भात करता येईल. जेवणात भाजी आणि आमटीऐवजी रस्सा भाज्या, टोमॅटो चटणी, कुळीथ पिठलं, बेसन पिठलं, मूग, मटकी, चणे उसळ, कडधान्याचे कळण, टोमॅटो सार, कढी असे प्रकार बदल म्हणून केले गेले पाहिजेत. पोळीला पर्याय म्हणून भाकरी, मसाला पराठा, आंबोळी, घावन, डोसे यांचा विचार व्हायला हवा. याव्यतिरिक्त खिचडी, दाल ढोकली, मसाले भात, मऊ भात मेतकूट, टोमॅटो राईस, इडली सांबार, मिश्र डाळींचे मुठीया, उत्तप्पा चटणी हे प्रकार केले जाऊ शकतात. भाज्या न मिळाल्यास तोंडी लावणे म्हणून शेंगदाणा चटणी, तूप साखर पोळी/ तूप गूळ पोळी, लोणचं, जॅम, मुरांबा असे बरेच पदार्थ सहज खाता येतील.

मधल्या वेळी खाण्यासाठी उकडलेली मोड आलेली कडधान्ये, खजूर, बदाम, अक्रोड, काळ्या मनुका, पोळीचा घरीच केलेला खाकरा, फळं, काकडीचे, टोमॅटोच्या फोडी खाता येतील. कणकेचे लाडू, मिश्र पीठांचे लाडू, तूप गूळ पोळीचा लाडू, फोडणीचे कुरमुरे हे पदार्थ करून ठेवता येतील. थोडक्यात काय तर पदार्थ मिळत नाहीयेत म्हणून अडून न बसता, बाजारात गर्दी न करता, जे आहे त्यात भागवता आलं पाहिजे. पुढे देत असलेले पदार्थ घरात नेहमी असणाऱ्या पदार्थापासून सहज बनत असून ते पौष्टिकही आहेत व ते साहित्य आणण्यासाठी घराबाहेर पडण्याची आवश्यकता नाही.

छोले शोले

१ वाटी ८ ते १२ तास भिजवलेले काबुली चणे (या ऐवजी कोणतेही इतर कडधान्य वापरू शकता), २ चमचे तेल, १ छोटा कांदा बारीक चिरून, कोथिंबीर बारीक चिरून, अर्धा टोमॅटो बारीक चिरून, लाल तिखट, मीठ, चाट मसाला, धने पावडर, जिरे पावडर, लिंबाचा रस, कोथिंबीर.

कृती : ८—१२ तास भिजत घातलेले काबुली चणे हिंग हळद, थोडं मीठ आणि पाणी घालून २—३ शिटय़ा करून शिजवून घ्यावे. त्यानंतर त्यातील पूर्ण पाणी निथळून चणे कोरडे होण्यासाठी चाळणीत ठेवावेत. चणे कोरडे झाल्यावर त्यात हळद, लाल तिखट, धने पावडर, जिरे पावडर, चाट मसाला, मीठ घालून नीट मिक्स करून घ्यावे. फ्राय पॅन मध्ये २ चमचे तेल गरम करून त्यावर हे चणे थोडे खरपूस होईपर्यंत छान परतून घ्यावे. त्यानंतर गॅस बंद करून हे एका बाऊलमध्ये घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि लिंबाचा रस पिळून नीट मिक्स करून सव्‍‌र्ह करावे.

दही भात विथ ट्विस्ट

साहित्य : शिजवलेला भात २ कप, घट्ट थंड गोड दही १ मोठा कप, १ काकडीच्या फोडी, किसलेलं गाजर, १ चमचा उडीद डाळ, २ चमचे शेंगदाणे, कढीपत्ता, कोथिंबीर, लाल सुक्या मिरच्या, साखर,  मीठ, डाळिंबाचे दाणे (ऑप्शनल), तेल आणि फोडणीचे साहित्य.

कृती : शिजवलेल्या भातात घट्ट गोड दही, काकडीच्या फोडी, किसलेलं गाजर, मीठ , साखर, कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यावं. तेल गरम करून त्यात शेंगदाणे, उडीद डाळ तळून घेऊन त्यात हिंग मोहरी जिरे कढीपत्ता, लाल सुक्या मिरच्या घालून फोडणी करून घ्यावी व ती भातावर घालावी. वरून आवडत असल्यास डाळिंबाचे दाणे घालून खायला द्यावे. यात भाताऐजवी जाडे पोहे धुऊन वापरले तरी सुंदर लागतं.

मुठीया

साहित्य : १ कप कणिक, २ चमचे बेसन, २ चमचे कॉर्न फ्लार, १ वाटी किसलेला दुधी किंवा मेथीची पानं किंवा चिरलेली कोथिंबीर, धने-जिरे पावडर, हळद, तिखट, साखर, आलं मिरची पेस्ट, लिंबाचा रस, मीठ प्रत्येकी एक चमचा, तेल २ चमचे.

फोडणीचे साहित्य : कढीपत्ता, तीळ २ चमचे, कोथिंबीर.

कृती : तेल सोडून वरील सर्व साहित्य परातीत एकत्र करून घ्यावे. दुधी वापरत असल्यास त्याला पाणी सुटत असल्याने वेगळं पाणी लागत नाही. मेथी/ कोथिंबीर असल्यास थोडं पाणी घालून कणकेप्रमाणे मळून गोळा करून घ्यावा. नंतर तेलाचा हात लावून लंबगोल आकाराचे २ किंवा ३ उंडे करून ते कुकरमध्ये अळूवडय़ांप्रमाणे स्टीम करून घ्यावे. हे उकडलेले उंडे पूर्ण गार झाले की त्याचे तुकडे कापून घ्यावेत.कढईत फोडणी करून त्यात कढीपत्ता आणि तीळ घालून त्यावर हे तुकडे कडा लालसर होईपर्यंत परतून घ्यावेत व सव्‍‌र्ह करावेत.