विपाली पदे

‘माझ्या पायाला चक्र आहे की नाही ते ठाऊक नाही, पण मला येणारे प्रवासाचे योग पाहिल्यावर एखाद्या ज्योतिषाला पाय दाखवावे असे वाटायला लागले आहे,’ पुलंच्या ‘जावे त्यांच्या देशा’ या पुस्तकातील हे वाक्य आजच्या तरुणाईला चपखल लागू पडले इतके त्यांचे फिरण्याचे प्रमाण वाढले आहे. देशविदेश धुंडाळणाऱ्या तरुणाईचे पर्यटनाचे प्रमाण आणि प्रकारही वाढले असून वैविध्यपूर्ण अशा त्यांच्या फिरण्याच्या संकल्पना आहेत. गेल्या काही वर्षांत केल्याने पर्यटन म्हणून फिरणारी ही मंडळी अचानक धार्मिक, ऐतिहासिक, पौराणिक महत्त्व असलेल्या शहरांकडे आकर्षिली जात आहेत..

गेल्या काही वर्षांत सोलो ट्रेकिंग करणारी, बॅकपॅकवाली मंडळी अशा नानाविध प्रकारे आपली पर्यटनाची हौस पूर्ण करणारी तरुण मंडळी मोठय़ा प्रमाणावर आजूबाजूला दिसते आहे. केवळ नवीन जागा, शहर-देश पाहायचा आहे हा निकष फिरण्याच्या बाबतीत मागे पडला आहे. अनेकदा परदेशातील काही प्रसिद्ध महोत्सव, अभ्यासदौरे आणि याहीपेक्षा साहसी पर्यटनाकडे त्यांचा ओढा दिसून येत होता. मात्र आता यापलीकडे जात चित्रपट-मालिका यांचा प्रभाव असणारी तरुणाई सध्या पौराणिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक पाश्र्वभूमी असलेल्या शहरांना प्राधान्याने भेटी देताना दिसते आहे. देशभरात अनेक जण ऐतिहासिक संदर्भ शोधून त्या त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन त्याचा अभ्यास करताना दिसतात. कधी काळी वाचून पाठ केलेल्या शाळेच्या अभ्यासक्रमातील शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची नावे आज तरुणांच्या तोंडून सहज ऐकायला मिळतात. हरिश्चंद्रगड, राजमाची, सुधागड, सिंहगड यांसारख्या किल्ल्यांची सुंदरता आजची तरुणाई नव्याने शोधू पाहात आहे. ज्या तरुणांना पुन्हा एकदा इतिहास शिकायचा आहे त्यांच्याकरता अनेक संस्था ऐतिहासिक किल्ल्यांवर विविध ट्रेक्स काढतात. अशा ट्रेक्सना काही वेळा इतिहासतज्ज्ञांना सुद्धा बोलावले जाते व त्यांच्याकरवी तरुणांसमोर इतिहासाची पाने पुन्हा चाळली जातात. इतकंच नाही तर ज्यांना भारताबद्दलच्या पौराणिक गोष्टी जाणून घ्यायची आवड आहे असे अनेक तरुण खास वेळात वेळ काढून हेरिटेज टूरला जातात. हेरिटेज टूर्समुळे आपण ज्या पौराणिक कथा-मिथक कथा वर्षांनुवर्ष ऐकत आलो आहोत, त्याचे संदर्भ पडताळण्याची, ते विश्व काय असेल, याचा अनुभव घेण्याची संधी यातून मिळते, असं हे उत्साही मुशाफिर सांगतात.

ऐतिहासिक चित्रपट-कथा-कादंबऱ्या यांचाही तरुणाईवर खूप मोठा प्रभाव आहे. त्यामुळे चित्रपटातून पाहिलेल्या कथा, त्या वेळच्या वास्तू, शहरं अनुभवणं हाही त्यांच्यासाठी खूप आनंदाचा सोहळा असतो. यासाठी नकाशावर अशी शहरे शोधून, त्याचा अभ्यास करून मग ही मुशाफिरी केली जाते. अनेकदा अशा गोष्टी एकटय़ाने शोधणं कठीण होतं. त्यामुळे सुरुवातीला स्वत: त्या पद्धतीने शोध घेत फिरणारे तरुण पर्यटक आता स्वत:च इतरांसाठी अशा प्रकारच्या अभ्यासपूर्ण किंवा ऐतिहासिक टूर्सचे आयोजन करू लागले आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे पुण्याचा अश्विन चितळे. तो ‘अश्विन हेरिटेज’ या नावाने फक्त ‘हेरिटेज टूर्स’चे आयोजन करतो. लहानपणापासूनच मला इतिहास आणि भूगोल या विषयांची विशेष आवड होती, असे सांगणाऱ्या अश्विनला या क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्यासारखे खूप आहे, याची हळूहळू जाणीव होत गेली. या जाणिवेतूनच त्याने स्वत: नियोजनपूर्वक अशा वेगळ्या वाटणाऱ्या ठिकाणांना भेटी देण्यास सुरुवात केली, असे तो सांगतो. आपण भेट दिल्यानंतर त्या शहराबद्दल आपल्याला मिळालेले ज्ञान इतरांपर्यंतही पोहोचावे या उद्देशाने एकीकडे ब्लॉग लेखन सुरू केले. तर त्याच वेळी हेरिटेज टूर्सही नेण्याचा निर्णय घेतल्याचे अश्विन सांगतो. ओरिसा, कार्ले-भाजे लेण्या, औरंगाबाद येथील अजिंठा-वेरूळ अशा ठिकाणी तो तरुणांना अभ्यासपूर्ण भटकंतीला घेऊन जातो. तसेच पुणे आणि मुंबई इथल्या लोकांसाठी त्याने ‘हेरिटेज वॉक’ही सुरू केले आहेत. या माध्यमातून आपल्याच शहरातील काही हटके ठिकाणांची माहिती देत त्याची एक वेगळीच ओळख लोकांना करून द्यायला आपल्याला आवडते, असे तो सांगतो.

वैभव खैर याची स्वत:ची ‘नोमेडिक ट्राइब्स’ नावाची कंपनी आहे. ज्यात तो केवळ तरुणवर्गासाठी वेगवेगळ्या ठिकाणी टूर अ‍ॅरेंज करतो. एक वर्ष व्यावसायिक टूरिस्ट कंपनीत काम केल्यावर त्यात आपल्याला प्रवासाचा हवा तसा अनुभव मिळत नसल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने ही नोकरी सोडून तीन वर्षे संपूर्ण भारत पिंजून काढला. या प्रवासादरम्यान त्याने भारताची एक वेगळीच बाजू अनुभवली. त्यातूनच त्याने वाराणसी बॅकपॅकिंग, सुंदरबन दुर्गा पूजा, हरिद्वार- ऋषिकेश, खीरगंगा ट्रेक, हम्पी बदामी टेम्पल टूर, वृंदावन होळी फेस्टिवल अशा एरव्ही तरुणाई सहज जाणार नाही अशा ठिकाणी टूर नेण्यास सुरुवात केली. अशा टूर्समध्ये लोकांना आलिशान हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा काही तरी छान अनुभव जगल्याचे समाधान जास्त मिळते, असे तो सांगतो. माझा उद्देश हा तरुणाईने मजा करावा हा तर आहेच पण त्याचबरोबरीने तरुणांमध्ये रूढ झालेल्या प्रवासाच्या पारंपरिक संकल्पना बदलणे हादेखील आहे, असे वैभव सांगतो. अर्थातच, त्याच्या या टूर संकल्पना तरुणाईच्याही पसंतीस उतरल्या आहेत.

श्वेता बंडबे ही तरुणी अनेक हटके  ठिकाणी भटकंती करण्यासाठी टूर्स काढते. परंतु तिच्या फिरण्याच्या आवडीचे रूपांतर व्यवसायात करेपर्यंतचा प्रवास तिच्यासाठी निश्चितच सोपा नव्हता. आपला जॉब सांभाळत फिरण्याची आवड जपण्यासाठी ती एका टूरिस्ट ग्रुपमध्ये सहभागी झाली व तिथे तिने टूर व्यवस्थापनाचे अनेक धडे घेतले. यातूनच तिला आत्मविश्वास मिळाल्यावर तिने २०१८ साली नोकरी सोडून ‘ट्रीपर जर्नीज’ नावाची स्वत:ची कंपनी सुरू केली. सगळ्या टूरिस्ट कंपन्या जिथे नेतात तिथे तिला लोकांना न्यायचं नव्हतं. टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून प्रसिद्ध नसलेली ऑफबीट ठिकाणं ती आधी स्वत: शोधून काढते आणि मग लोकांना दाखवते. प्रसिद्ध ठिकाणांच्या टूर आयोजित करणे चुकीचे नसले तरी आपण लोकांना काही तरी वेगळं द्यायला हवे, असं श्वेता सांगते.

या सगळ्या टूरमागच्या प्रेरणा वेगवेगळ्या आहेत. मध्यंतरी मराठीत ‘हम्पी’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. याआधी ‘दिल चाहता है’ चित्रपटातून गोव्याचे सुंदर चित्रीकरण पाहिल्यानंतर अनेकांचा त्याकडे ओघ वाढला होता. अगदी त्याचपद्धतीने नंतरही ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘यह जवानी है दिवानी’ सारख्या चित्रपटांमुळे स्पेन, बार्सिलोनापासून ते हिमालयपर्यंत सगळीकडे फिरण्याचा ट्रेण्ड तरुणाईत वाढला होता. सध्याचा काळ हा ऐतिहासिक-पौराणिक चित्रपट-मालिका यांचा आहे. त्यामुळे कधीकाळी ज्येष्ठ नागरिकांच्या टूर्स म्हणून दुर्लक्षित राहिलेल्या चारधाम, कर्नाटकमधील देवस्थाने इथे तरुणाईच्या भटकंतीचे प्रमाण वाढले असल्याचे हे टूर्स ऑपरेटर्स सांगतात. अगदी वाराणसीत जाऊन गंगाघाट नुसताच अनुभवणारे, अगदी जाणीवपूर्वक गंगाआरती पाहण्यासाठी तिथे पोहोचणारे असे अनेक तरुण पर्यटक दिसतात. नुसतेच फिरण्याची हौस म्हणून भटकंती करण्यात तरुणाईला रस नाही. त्याऐवजी फिरण्यातून आपल्याच संस्कृतीची पाळंमुळं समजून घेण्यासाठी धडपडणाऱ्या या तरुण पर्यटकांनी भटकंतीला एक वेगळा आयाम मिळवून दिला आहे, यात शंका नाही.