मी या वर्षांपासून होस्टेलवर राहायला आलेय. माझा कोर्स संपायला अजून तीन वर्षे आहेत. महिन्याभरातच मला इथल्या जेवणाचा कंटाळा यायला लागला आहे. बऱ्याचदा मी जेवणाला दांडी मारते आणि इकडचं-तिकडचं खाऊन भागवते. शिवाय मला खूप पिंपल्स येतायत, पूर्वी इतक्या यायच्या नाहीत. मी काही टॉनिक्स किंवा प्रोटिन पावडर्स वगैरे घेऊ का? जेवणाचा आणि पिंपल्सचा काही संबंध असतो का?
-रिया
हॅलो रिया, तू पहिल्यांदाच घरापासून लांब, एकटीच्या बळावर राहतीयेस. होस्टेलवर अॅक्च्युअली पोचल्यावर लक्षात येतं की एकटं राहणं रोमँटिक आहे, तितकंच जबाबदारीचं आहे. घरी असताना काही झालं की आईचा जप असतो. आई, पाणी दे, माझी वही कुठंय, सकाळी नक्की उठव, माझा ड्रेस अजून आला कसा नाही इ. इ. बऱ्याचदा उशीर झाला म्हणून न खाता निघालं आणि आई प्लेट घेऊन समोर आली की, ‘च्, आत्ता कशाला, उशीर होईल’ असं म्हणत शेवटी खाल्लं जातं. पण हे तेव्हा लक्षात येत नाही सगळं.
होस्टेलवर आल्यावर सवयीनं अलार्मचं तोंड बंद केलं जातं, सावकाशीनं जाग येते तेव्हा कळतं, अरे, आपलं पहिलं लेक्चर चुकलं..
बाहेर जाताना लक्षात येतं की ड्रेसला इस्त्रीच नाहीये.
सगळ्यात वैताग असणारं असतं ते जेवण! कितीही चांगली मेस असली तरी थोडय़ा दिवसांनी घास तोंडात फिरायला लागतो. तेव्हा आठवते प्लेट घेऊन समोर येणारी आई आणि आपण तिच्यावर केलेली चिडचिड.
अपुऱ्या आहारामुळे पिंपल्स जास्त येऊ शकतात का ही तुझी शंका अगदी रास्त आहे. पेशींना आणि त्वचेला संरक्षण देणारी अॅण्टिऑक्सिडन्ट्स योग्य आहारातूनच आपल्याला मिळतात. आहाराचा बॅलन्स बिघडल्यामुळे आपला हॉर्मोनल बॅलन्सही बिघडतो. अपुऱ्या आहारामुळे आपल्या स्ट्रेस लेव्हल्सही वाढतात आणि या सगळ्याचा परिणाम भरपूर पिंपल्स येण्यात होतो.
आपल्याला होस्टलची मजा तर चाखायचीय आणि कोर्सही नीट पार पाडायचाय. मग शरीराला आणि मनाला प्रॉपर इंधन पुरवल्याशिवाय पर्याय नाही. मनाच्या इंधनाविषयी नंतर कधीतरी बोलू, आज शरीराच्या इंधनाविषयी, त्यासाठी हे डूज आणि डोन्ट्स! होस्टेललाइफ कोळून प्यायलेल्या माझ्या अनेक मैत्रिणींनी हे फॉलो केलेत आणि त्यावर शिक्कामोर्तब केलंय.
’ जेवण चुकवायचं नाही. ती म्हण आहे ना, राजासारखा ब्रेकफास्ट, सामान्य माणसासारखं लंच आणि गरिबासारखं डिनर!
’ काही ना काही खुराक रूममध्ये ठेवायचा.
’ फळं, काकडय़ा, टोमॅटो, फ्रीज असेल तर दूध, दही, चीज यासारखे पदार्थ, अंडी, कॉर्नफ्लेक्स, चणे, शेंगदाणे, चुरमुरे वगैरे.
’ भरपूर पाणी प्यायला विसरायचं नाही. स्किन आणि केस फ्रेश, चमकदार राहायला हे अतिआवश्यक. कारण आपल्या शरीराचा जवळजवळ साठ टक्के भाग पाण्यानं बनलाय.
’ होस्टेलवर राहतोय म्हणजे जंक फूड खाल्लंच पाहिजे असं नाही. त्याला पर्याय आहेत.
’ पार्टीज, लेट नाइट्स पूर्णपणे टाळता येणं तुम्हाला अशक्य आहे. पण जागरण करताना भरमसाट कॉफी पिणं, सतत जागरणं करणं आणि दिवसा टिवल्याबावल्या करून शेवटच्या क्षणासाठी सगळा अभ्यास ठेवणं हे टाळणं जमू शकेल. पार्टीजमध्ये आपण आपले नियम ठरवून ते पाळणं खूप उपयोगी पडतं. म्हणजे काय, तर वेळेची डेडलाइन ठरवणं, मित्रमैत्रिणींच्या आग्रहाला बळी न पडता ड्रिंक्स, स्मोकिंग टाळणं, (स्मोकिंगमुळे स्किनवर सुरकत्या पडतात, हे सिद्ध झालंय.)
तुला कदाचित आयर्नसारखी काही टॉनिक्स घ्यायला लागतील, पण ती डॉक्टरांच्या सल्ल्यानंच घे. प्रोटिन पावडर्सचं म्हणशील तर जाहिरातीत दाखवतात म्हणून आपण यासारख्या गोष्टींना भुलतो. आहारात सुधारणा केलीस तर हे सगळं घ्यायची तुला गरज पडणार नाही.
Take care of your body, it’s the only place you have to live in!
विचारा तर खरं…
तरुणपणात निसर्गनियमाप्रमाणे प्रेमात पडायला होतंच. अर्थात ओघानं प्रेमभंगही आलाच. नवीन नाती, नवीन अभ्यासक्रम, नवीन जॉब आणि त्यांमधल्या गुंतागुंती. शरीराविषयी शंका, निर्णयांविषयी शंका असं खूप काही मनात सुरू असतं. खरं तर शंका खूप जेन्युईन असते पण ऐकणारा काय म्हणेल, हसेल की काय असं वाटतं. कुणाला विचारावं हेही कळत नाही. तुम्हाला वाटतंय असं काही? मग हा कॉलम आहे खास तुमच्यासाठी, तुम्हाला पडत असलेल्या प्रश्नांना वाट देण्यासाठी. इथे तुम्हाला वाटणाऱ्या शंकेला कुणी नाकं मुरडणार नाहीये की फालतू म्हणून त्या निकालात काढणार नाहीये. बिनधास्तपणे त्या शेअर करा. viva@expressindia.com या आयडीवर. सब्जेक्टलाईनमध्ये ओपन अप असं लिहायला विसरू नका.