हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेऊ या या नव्या सदरातून.

आपल्या विशिष्ट आवडीनिवडी आता विशिष्ट निमित्ताने पूर्ण करणं बंधनकारक राहिलेलं नाही. पूर्वी चकली म्हणजे दिवाळीतच करायच्या, तिळाचे लाडू केवळ मकरसंक्रांतीतच बनणार आणि ख्रिसमस, नव्या वर्षांसाठीच केक तयार होणार, अशी समीकरणं होती. रेडिमेडच्या या युगात मात्र या गोष्टी सहज होऊ  लागल्या. केकचा विचार केला तर ज्या ब्रॅण्डमुळे केक खाणं, विविधप्रसंगी केक आणणं हे खूप नियमित झालं, तो ब्रॅण्ड म्हणजे माँजिनीज.

१९०२ साली दोन इटालियन बंधूंपैकी मेस्सर माँजिनी यांनी फोर्ट भागातील चर्चगेट स्ट्रीटवर आपलं छोटंसं रेस्टॉरंट सुरू केलं. रूढार्थाने हे रेस्टॉरंट नव्हतं. युरोपियन मंडळींकरता केक, पेस्ट्री पुरवणारं केक शॉप, मीटिंग पॉइंट, युरोपियन मंडळींना निवांतपणे खाता खाता क्लासिकल म्युझिक ऐकण्याचं ठिकाण असं माँजिनीजचं स्वरूप होतं. केक, पेस्ट्री नव्यानव्यानंच भारतीयांना कळत होते. त्यामुळे श्रीमंत, उच्चभ्रू भारतीय आणि बहुतांशी युरोपियन मंडळींची इथं वर्दळ असायची. भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि माँजिनीज बंधू आपला व्यवसाय खुराना नामक गृहस्थांना विकून स्वदेशी निघून गेले. १९६१ मध्ये खुराना यांच्याकडून खोराकीवाला नामक व्यावसायिकाने माँजिनीज विकत घेतलं. त्यातला अर्धा भाग ‘अकबर अलीज’ या सुप्रसिद्ध शोरूमला विकण्यात आला. मात्र केक आणि पेस्ट्रीला एतद्देशीयांचा वाढता प्रतिसाद पाहून खोराकीवाला यांनी तो विभाग चालू ठेवायचा निर्णय घेतला. केक बनवण्यासाठी लागणारी माँजिनी बंधूंची सारी साधनसामग्री होतीच. केक आणि वाढदिवस यांचं समीकरण जसं जुळत गेलं तसं खोराकीवाला यांनी बाकी सगळा पसारा आवरून फक्त केक आणि पेस्ट्रीवर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. १९७० मध्ये बांद्रा इथे ‘माँजिनीज’चं पहिलं केक शॉप सुरू झालं. इथल्या केकची खासियत वेगळी होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळत गेला. पण खोराकीवाला यांनी खूप सारी केकशॉप काढण्याऐवजी आपल्या शाखा चालवायला देण्याचा मार्ग स्वीकारला. आजही माँजिनीजची स्वत:ची अशी मोजकीच दुकानं आहेत. पण त्यांच्या शाखा मात्र देशभरात आहेत. १७ राज्यांत १००० केक शॉपचा हा पसारा वितरकांच्या माध्यमातून वाढला आहे.

माँजिनीजने काळाच्या ओघात विविध तंत्रे आत्मसात केली. केक गार ठेवण्यासाठी कूलिंग सिस्टीम विकसित केली. भारतासारख्या देशात शाकाहारी संस्कृतीचं भान राखत केकमध्ये पहिल्यांदाच शाकाहारी केकचा पर्याय दिला. किंबहुना माँजिनीजचा ६० टक्के व्यवसाय या शाकाहारी केकमधूनच येतो. अलीकडचं नवं पाऊल म्हणजे ई-कॉमर्सच्या माध्यमातून केकची विक्री. तब्बल तीन दिवस ताजे राहतील असे केक माँजिनीजने तयार केले. ब्लू डार्ट आणि फेडेक्सच्या माध्यमातून २४ तासांत केकची डिलिव्हरी केली जाते. त्यासाठी माँजिनीजने अनोखं पॅकिंग स्वीकारलं. आज ई-कॉमर्सच्या माध्यमातून १५०० ते १७०० ऑर्डर्स पूर्ण केल्या जातात.

नि:संशय माँजिनीज हा भारतातील मोठा केक ब्रॅण्ड आहे. दिवसाला ४०,००० पेस्ट्रीज, १०,००० बर्थडे केक आणि ३ लाख मफीन्स माँजिनीजमध्ये विकले जातात. राष्ट्रीय पातळीवर किंवा भारतातल्या कानाकोपऱ्यात माँजिनीज पोहोचू पाहात असलं तरी स्थानिक पातळीवर मात्र त्यांना अनेक निरनिराळ्या ब्रॅण्ड्सची तगडी टक्कर मिळतेय. तरुणाईपेक्षा मध्यमवयीन मंडळी आणि उच्चभ्रू वर्गाला आकर्षित करण्याकडे माँजिनीजचा भर आहे.

ब्रॅण्ड माँजिनीजने आतापर्यंत नेमकं काय केलं? तर स्थानिक पातळीवर आपल्या शाखा विस्तारत केक आणि पेस्ट्रीसारख्या गोष्टी सहज उपलब्ध करून दिल्या. इतक्या सहज की, वाढदिवसाच्या पलीकडे नववर्ष, गेट टुगेदर, लग्न, साखरपुडा, निवृत्ती समारंभ अशा कोणत्याही भारतीय समारंभात मूळचा नसलेला केक कापण्याचा सोहळा सहज जोडला गेला. ‘गो अहेड,सेलिब्रेट’ ही टॅगलाइन त्यांनी सर्वार्थाने सार्थ केली. आज केकसाठी अधिक चांगले, चवदार केक ब्रॅण्ड्स किमान शहरी भागात आहेत, पण उपलब्धता आणि पोहोचण्याची क्षमता याबाबतीत माँजिनीजला पर्याय नाही. लांबवरूनही दिसणारे जांभळ्या गुलाबी रंगातील माँजिनीजचे केक शॉप्स केकच्या खवय्यांना हमखास आवडीच्या चवी मिळणार, याची ग्वाही देतात.

सध्याचं आपलं सगळं जगणंच उत्सवी होतंय. पूर्वी वर्षांचा वाढदिवस साजरा होणं मुश्कील होतं आणि आज बाळाचा महिन्याचा वाढदिवसही साजरा होतो. हा मधला टप्पा पार करताना आपल्या सोबत असणारे जे ब्रॅण्ड्स आहेत, त्यातला गोड क्रीमी ब्रॅण्ड म्हणजे माँजिनीज. जगण्यातलं सेलिब्रेशन आणि सेलिब्रेशन करत जगणं दोन्ही साजरा करणारा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

viva@expressindia.com