एकटेपणा ही अलीकडे अनेकांना भेडसावणारी समस्या ठरू लागली आहे. मग त्यावरील उपाय म्हणून कधी सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांवर वाढते ब्लॉग इन असेल किंवा मोबाइलच्या माध्यमातून- व्हॉटस अ‍ॅप- एसएमएस यांसारख्या तंत्रज्ञानाचा आधार घेत वाढवलेले संवाद असतील.. पण सध्या कृत्रिम पद्धतीने मत्री वाढविण्याचे काटेकोर प्रयत्न होताना दिसतात. जी बाब मत्रीची, तीच बाब प्रभावशीलतेची. आज समाजात अनेकदा स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पाडण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना अनेक लोक पाहायला मिळतात. अशा व्यक्तींचा प्रभाव खरोखरीच कितपत पडतो समाजावर, माहिती नाही, पण उलट कृत्रिम प्रभाव पाडण्याचे प्रयत्न उघडे पडल्यास ती व्यक्ती अधिकच केविलवाणी होत जाते. या सगळ्याचे मूळ स्वत:कडे उत्पादन म्हणून बघण्यात आहे आणि जगाच्या बाजारपेठेत या उत्पादनाची किंमत वाढावी या एकमेव हेतूने झालेला दिशाहीन प्रवास पाहायला मिळतो.
पाश्चिमात्य देशांमध्ये या मुद्दय़ावर मात्र खूप संशोधन झाले आहे. मित्र जमविणे आणि लोकांना आकर्षक वाटेल असे आपले व्यक्तिमत्त्व घडविणे यामागे काही शास्त्र आहे की हा कलेचाच उत्स्फूर्त भाग आहे, यावर अनेक अभ्यासकांनी सखोल चिंतन केले. या अभ्यासातून अनेक निष्कर्ष पुढे आले. यातील सर्वात कळीचा मुद्दा हा होता की, ‘मत्र’ जोडण्याचेही एक शास्त्र आहे. समाजात आपले व्यक्तिमत्त्व उठून दिसावे यासाठी नेमके कोणते प्रयत्न करायचे, यासाठीची शास्त्रीय प्रक्रिया आहे. डेल कान्रेजी या लेखकाने या दृष्टीने लिहिलेले असामान्य पुस्तक म्हणजे ‘हाऊ टू विन फ्रेंडस अ‍ॅण्ड इन्फ्लुएंस पीपल’.
मानवी संवाद केव्हा खुलतो, का खुलतो, कसा खुलतो, या सगळ्या मूलभूत प्रश्नांचा विचार कान्रेजी यांनी केला आहे. किंबहुना संवाद न रंगण्याची कारणे, अगदी साध्या गप्पा मारताना संवाद अवघड वळणे कशी घेऊ शकतो, याचे तपशीलवार आणि उदाहरणांसह पृथक्करण मांडत कान्रेजी यांनी ‘घट्ट मत्रीच्या धाग्यांची वीण कशी उसवत जाते’ हे सांगितले आहे. खरे तर इतके नेमके विश्लेषण करता आले तर संवाद आणि मत्री दोन्हीही खुरटू शकत नाही. पण घोडे इथेच पेंड खाते. समोरच्या व्यक्तीच्या प्रतिसादांकडे योग्य ते लक्ष देता येत नाही, ते टिपता येत नाहीत आणि बघता-बघता आपली उपस्थिती इतरांना त्रासदायक होत जाते. आपले मित्रही निखळतात आणि आपले समाजातील वजनही निसटत जाते. आणि डेल कान्रेजी आपल्याला इथेच नेमका हात देतात.
संवाद व्यक्ती आणि समाज यांतील दुवा असतो. किंबहुना आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणारा तो एकच धागा असतो. म्हणजेच आपले आपल्या संवादावरील ‘लक्ष’ हेच खरे आपला प्रभाव पाडणारे अथवा गाडणारे ठरते, असा साधा-सोपा आणि सरळ, पण बहुधा म्हणूनच अंमलबजावणीसाठी कठीण असणारा मुद्दा कन्रेजी उपस्थित करतात. मित्र जोडण्यासाठीचे, समाजावर आपला प्रभाव पाडण्याचे कान्रेजी यांचे शास्त्र म्हणजे खरे तर केवळ स्वत:कडेच तटस्थपणे पाहणे आहे. आपल्या प्रत्येक प्रतिसादाकडे लक्ष देत, त्यामागे आपला खोलवरचा विचार आहे की उथळ वेळ मारून नेण्याची वृत्ती हे समजून घेतल्याशिवाय उत्तम व्यक्तिमत्त्व घडणे आणि त्याचा प्रभाव पडणे या दोन्ही बाबी अशक्य आहेत.
अनेकदा समोरच्या व्यक्तीविरोधात मत मांडायचे असूनही आपल्याला ते मांडता येत नाही. समोरच्या व्यक्तीला काय वाटेल किंवा आपण खरेच योग्य आहोत का, याबाबत असलेला संभ्रम याला कारणीभूत असतो. पण समोरच्याला एक वेळ त्या क्षणी लागले तरी ज्या म्हणण्याने त्याचा किंवा तिचा दूरगामी फायदा आहे, असा मुद्दा मांडताही आला पाहिजे आणि आपले नातेही घट्ट राहायला पाहिजे. ही कसरत कशी साधायची, याचे अप्रतिम सूत्र कान्रेजींनी दिले आहे. एकूणच स्वत:कडे पाहायला लावतानाच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सहज प्रभाव पाडणारे हे अप्रतिम पुस्तक.. वाचनीय आणि अनुकरणीयही!
पुस्तक- हाऊ टू विन फ्रेंडस् अ‍ॅण्ड इन्फ्लुएंस पीपल
लेखक- डेल कान्रेजी
प्रकाशक- सायमन अ‍ॅण्ड शूस्टर
पृष्ठे- २९१
किंमत-  सुमारे ४०० रुपये.