दीपेश वेदक viva@expressindia.com

प्रचंड पाऊस, नद्यांना आलेले पूर, जागोजागी दरड कोसळून वाहून गेलेले रस्ते यांच्या बातम्या आपण गेले काही दिवस सतत ऐकत होतो. जुलै महिन्यात महाराष्ट्रात आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमध्ये महाड, पोलादपूर, चिपळूण, सांगली, महाबळेश्वर भागांत मोठय़ा प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले. अशा वेळी आपत्तीग्रस्त भागातील बचावकार्यासाठी महाराष्ट्रातील काही साहसी संघटना तात्काळ धावून गेल्या. वर्षभर लोकांना गडकिल्ले दाखविण्याचे, साहसी उपक्रम राबविण्याचे काम करणाऱ्या या तरुण मावळ्यांनी बचावकार्यात मोठे योगदान दिले.

२२ जुलैला संध्याकाळी दरड कोसळल्याची बातमी कळताच सागर नलावडे आणि शिलेदार फाउंडेशनची टीम मुंबई आणि परिसरातून लगोलाग रवाना झाली. आवश्यक ते सामान गोळा करून ही मंडळी तळीये गावाकडे निघाली. वाटेत जागोजागी दरड कोसळली होती, पुराच्या पाण्याने रस्ता दिसेनासा झालेला, अशा वेळी कोणत्या रस्त्याने जात तळीये गाव गाठता येईल, हे पाहून त्या दिवशी रात्रीच त्यांनी पुढे कूच केले. सकाळी आठ वाजता ही मंडळी गावात पोहोचली आणि एनडीआरएफच्या टीमसोबत त्यांनी रेस्क्यूची दिशा ठरवली. चारजणांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले होते. गाव जमिनीखाली गेलेले आणि एक पूर्ण रात्र निघून गेली होती. त्यामुळे बचावकार्य जिकिरीचे होते. अडकलेल्या व्यक्ती जिवंत असण्याची शक्यता धूसर होती. अशा वेळी लोकांना धीर देत ढिगारा उपसून पहिल्या दिवशी एकूण ३३ मृतदेह शोधण्यात त्यांना यश आले. शोधमोहीम चालूच होती. अजूनही पाऊस पडत होता. आपले आप्त सापडत नसल्याने गावकरीही शिलेदार आणि एनडीआरएफच्या टीमसोबत मदतकार्यात सहभागी झाले  होते. दुसऱ्या दिवशी ठाणे डिझास्टर रेस्क्यू फोर्सची टीमही दाखल झाली. सर्वानी एकत्र येऊन उरलेले मृतदेह शोधून काढले. आणि बचावकार्य थांबवण्यात आले. ‘सध्या महाड आणि परिसरात मदतीचे सामान घेऊन आमची टीम दाखल झाली आहे. भविष्यात अशा प्रकारची आपत्ती आली तर तात्काळ मदत पोहोचावी यासाठी आमची संस्था कार्यरत असेल. त्यासाठी आवश्यक साहित्य जमवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विविध भागांतील इच्छुक व्यक्तींना एकत्र आणून त्यांना अशा अपत्तीशी सामना करण्यासाठी तयार करण्याचे कामही शिलेदार फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आले आहे,’ असे शिलेदार फाउंडेशनच्या सागर नलावडे यांनी सांगितले.

आपत्ती व्यवस्थापकांनी महाडमध्ये पूर येण्याची शक्यता असल्याचे कळवताच कोलाडच्या महेश सानप यांनी आपल्या महाडमधील बहिणीला फोन करून परिस्थिती काय आहे याचा अंदाज घेतला. महाबळेश्वर भागातही प्रचंड पाऊस असल्याचे त्यांना कळले. या भागात सतत जोरदार पाऊस पडत राहिला, तर सावित्रीला पूर येणार हे ठरलेलं गणित. अशा वेळी महेश सानप आणि ‘वाईल्डर वेस्ट अ‍ॅडव्हेंचर’ची टीम दोन राफ्ट आणि एक कयाक घेऊन महाडच्या दिशेने निघाली. महाडच्या कोणत्या भागात पाणी साचू शकते याचा अंदाज घेत तीन टीम पाडण्यात आल्या. शिवाय मदतीसाठी नगरपालिकेची बोटही त्यांना मिळाली. जिथे पाणी भरण्याची शक्यता जास्त आहे, अशा भागातील लोकांना सुरक्षित जागी हलवण्यास सुरुवात झाली. लोकांना जवळच्या शाळेत, मोठय़ा इमारतीत, जवळच्या नातेवाईकांच्या घरी हलवण्यात आले. संध्याकाळी या भागातले पाणी थोडे कमी झाल्याचे लक्षात येताच तसेच लोक सुरक्षित असल्याचे पाहून टीमने परतीच्या प्रवासाला सुरुवात करण्याचे ठरवले. मात्र पावसाने अचानक पुन्हा वेग धरला आणि महाडमधून बाहेर पडण्याचे रस्ते बंद झाले. अशा वेळी पुन्हा घरी न जाता पुढील काही दिवस तिथेच थांबून लोकांना मदत करण्याचे या टीमने ठरवले. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याशी संपर्क साधून कोणती गावे पाण्याखाली जाऊ शकतात, याचा अंदाज घेऊन त्या भागात टीम बचावकार्यासाठी रवाना झाल्या. महाड शहरातही पाणी खूप साचले आहे, हे लक्षात घेत त्या भागातही कोणी अडकले नाही ना हे पाहून रात्रभर बचावकार्य सुरूच होते. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा संपूर्ण परिसराची पाहणी करून, अजून कोणी अडकलेले नाही ना, याची खातरजमा करून टीम स्वगृही परतल्या. तोवर महाडकरांच्या मदतीला एनडीआरएफ पोहचली होती. नेटवर्कमध्ये असेपर्यंत टीमने १८६ फोनना उत्तर देत दोनशेहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले होते. महाडला वीजपुरवठा करणारी लाइन सावित्री नदीच्या काठावरून जाते. अतिवृष्टीमुळे या लाइनवरचे सगळे पोल पडून अद्यापही महाडच्या अनेक भागांत वीजपुरवठा पूर्ववत झालेला नाही. अशा वेळी नवीन लाइन टाकण्याच्या कामातही ही टीम गेले काही दिवस प्रशासनाला मदत करते आहे.

लगतच्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडताच २१ जुलैला चिपळूणमध्ये पाणी शिरले. पुढील दोन दिवस हे चिपळूणकरांसाठी धोक्याचे होते. घराघरांत पाणी शिरल्याने काय करावे हे सुचत नव्हते. जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापकांनी जिद्दी माउंटेनीअर्सशी संपर्क साधताच त्यांनी बचावकार्याची तयारी दाखवली. २१ जुलैला रात्रीपासून मदतीसाठी फोन येत होते. चिपळूणमध्ये पोहोचवणारे सगळे रस्ते पाण्याखाली गेल्याने पर्यायी मार्ग काढत रत्नागिरीहून जिद्दी माउंटेनीअर्सची पाच जणांची टीम रात्री चिपळूणमध्ये दाखल झाली. अडकलेल्या मंडळींनी, त्यांच्या नातेवाईकांनी जिद्दी माउंटेनीअर्सना संपर्क करायला सुरुवात केली होती. अनेक ठिकाणी पाणी पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचले होते. अनेक बैठी घरे पाण्याखाली गेली होती. लोक छतावर जाऊन बसले होते. पाण्याचा प्रवाह वाढत होता. बोटीचे इंजिन घरालगतच्या वायरिंगमध्ये अडकण्याचा धोका होता. अनेक ठिकाणी झाडांवर साप बसलेले ते लोकांच्या घरात, बचावकार्यासाठी गेलेल्या बोटीत शिरण्याचा धोका होता. अनेक तलाव पाण्याखाली गेलेले, त्यांचा अंदाज येत नव्हता. त्यात मगरी आणि इतर जलचर होते, जे पाण्यासोबत बाहेर येण्याचा धोका होता. त्यामुळे भौगोलिक स्थितीचा अंदाज घेणेही गरजेचे होते. ‘त्या रात्री साधारण २५० फोन आम्हाला आले. अनेक घरांत लहान मुले, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक होते. त्यांना वाचवण्यासाठी आम्ही आमची बोट घेऊन निघालो. या रात्रीत एकूण २४ जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आम्हाला यश आले. आणि मग पाणी थोडे कमी झाल्यावर आम्ही इतर भागांतही बचावकार्यासाठी पोहोचलो’, असे जिद्दी माउंटेनीअर्सचे धीरज पाटकर सांगत होते. ‘चार महिन्यांच्या बाळापासून ते घरावर अडकलेल्या आजीबाईपर्यंत सगळ्यांना वाचवण्यासाठी आम्ही धडपडत होतो. इतर शासकीय यंत्रणाही मदतीला होत्या. पाण्याचा वाढता प्रवाह लक्षात घेत सोबत असलेली बोट हेलकावे घेत वाहून जाण्याची भीती होती. स्वत:चा जीव वाचवत इतरांना वाचवणं हे मोठं आव्हान होतं’, असंही ते पुढे म्हणाले. सध्या जिद्दी माउंटेनीअर्स चिपळूण आणि परिसरातील परिस्थितीचा आढावा घेत लोकांना  दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवण्यासाठी मदत करत आहेत. जिथे अजूनही मदत पोहोचली नाही, तिथे ती कशी पोहोचवता येईल यासाठी कार्यरत आहेत.

२२ जुलैला सकाळी ७ वाजता नातेवाईकाचा फोन आला, चिपळूणमध्ये पाणी शिरले आहे, २००५ च्या पुरापेक्षा धोका जास्त आहे, हे समजले. वीरेंद्र वणजू आणि रत्नदुर्ग माउंटेनीयर्स रेस्क्यू टीम यांनी तात्काळ कलेक्टर ऑफिसला संपर्क साधला. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून बोट, आरटीओची एक गाडी आणि पट्टीचे पोहणारे आणि समुद्रात बोट चालवणारे काही मच्छीमार घेऊन १२ जणांची ही टीम दुपारी चिपळूणमध्ये दाखल झाली. पाण्याचा वाढता प्रवाह लक्षात घेत बोट वाहून जाण्याची भीती होती. अनेक ठिकाणी बोटीचे इंजिन सुरू करता येत नव्हते. अनेकदा इंजिन सुरू करूनही पाण्याच्या प्रवाहाने बोटीचा वेग वाढत नव्हता. चिपळूण मध्ये अनेक ठिकाणी बांधकाम सुरू असल्याने ठिकठिकाणी पिलर वर आले होते. त्यांचा धक्का बोटीला बसू शकत होता. बस, ट्रकसारखी अवजड वाहनेही पाण्याखाली दिसेनाशी झाली होती. ‘स्थानिक यंत्रणा कुठे मदतीची गरज आहे, हे वेळोवेळी कळवत होत्या. लोक इमारतीच्या आपापल्या गच्चीतून कुठे काय परिस्थिती आहे, हे सांगत होते. कुठे कोणते वाहन उभे आहे, कुठे आमची बोट अडकू शकते, कुठे अजून मदत पोहोचली नाही, हे सांगत होते. त्यांच्या मदतीने आम्ही बचावकार्याची दिशा ठरवत पुढे जात होतो, असे वीरेंद्र वणजू यांनी सांगितले. रत्नदुर्ग माउंटेनीयर्स रेस्क्यू टीमला पहिल्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या साधारण ७२ लोकांना जवळच्या उंच ठिकाणी, इमारतीच्या गच्चीवर सुखरूप पोहचवण्यात यश आले. काळोख झाल्यावर बोट सुरक्षित जागी लावून जवळच्या गावात उतरून गावकऱ्यांच्या मदतीने कुठे काय परिस्थिती आहे हे पाहून अंदाज घेण्यात आला. पाण्याच्या प्रवाहाचा वाढलेला धोका लक्षात घेत सकाळी ५ वाजता पुन्हा बचावकार्य सुरू करण्याचे ठरले. सुदैवाने सकाळी काही भागांतील पाणी ओसरल्याने बचावकार्याची दिशा बदलण्यात आली. दुसऱ्या दिवशी ४३ जणांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात टीमला यश आले. ‘स्थानिक प्रशासन, गावकरी, मच्छीमार, उपलब्ध सामग्री यांच्या मदतीने बचावकार्याला वेग आला, पाणी ओसरल्यावरही साफसफाई करणे, गाळ काढणे, धान्य, औषधे आणि इतर जीवनावश्यक साहित्य जमवणे आणि वाटप करण्यासाठी अनेक जण पुढे आले. त्यांच्या मदतीने हे कार्य अजूनही सुरू आहे’, अशी माहितीही त्यांनी दिली.

महाडमध्येच राहणाऱ्या डॉ. राहुल वारंगे यांच्या घरी पाणी भरू लागले आणि आजूबाजूच्या परिसरातून मदतीसाठी फोन येऊ लागले. अशा वेळी डॉ. वारंगे आणि सह्यद्रीमित्र ही संस्था लोकांच्या मदतीला धावून गेली. परिसरात सगळीकडेच पाणी साचलेले असल्याने लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात त्यांनी मदत केली. दोन दिवसांनी महाडमधले पाणी ओसरू लागल्यावर पनवेलच्या निसर्गमित्र संस्थेची आणि अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाची टीम महाडमध्ये साफसफाई करण्यास पोहोचली. अजूनही अनेक भागांत जमलेला गाळ आणि चिखल काढण्याचे काम सुरूच आहे.

सांगलीमध्ये पाण्याची पातळी वाढते आहे हे लक्षात येताच सुनील गायकवाड आणि शिवदुर्ग लोणावळा यांची टीम लगेच सांगलीच्या दिशेने रवाना झाली. सांगलीमधल्या काही गावांमध्ये बचावकार्यासाठी दोन बोटींसह त्यांची दहा जणांची टीम कार्यरत होती. सुदैवाने कुठेही अतिशय धोकादायक परिस्थिती उद्भवली नाही, मात्र ही टीम पुढील दोन दिवस खबरदारी म्हणून तिथेच होती. अत्यावश्यक साहित्य, औषधे पोहोचवण्यात त्यांनी लोकांना मदत केली. प्रतापगड परिसरात राहणारे अजित जाधव यांच्या गावात २० तारखेला दरड कोसळली. गावाच्या अगदी जवळून गेलेल्या दरडीने जीवितहानी केली नाही, मात्र ती तशीच कोसळत पुढे दीड ते दोन किलोमीटर गेली. महाबळेश्वर ते पोलादपूर भागात त्या दोन ते तीन दिवसांत अशा हजारो दरड कोसळण्याच्या घटना सतत घडत होत्या. मृत वन्य प्राणी, साप, पक्षी, मोठाली झाडे गावांमध्ये येऊन धडकत होती. माती, मोठे दगड गावांचे रस्ते बंद करत पुढे जात होते. अनेक छोटे पूल नाहीसे झाले. महाबळेश्वर भागातील ३५ गावांचा अद्यापही संपर्क तुटलेला आहे. अशा भागांत अजित जाधव आणि प्रतापगड सर्च अ‍ॅण्ड रेस्क्यू सेंटरची टीम दरड हटवण्यासाठी, मुंबईमधून पोलादपूपर्यंत आलेली मदत, औषधे, धान्य या गावापर्यंत पोहोचवण्याचे, आंबेनळी घाट पूर्ववत करण्याचे, रस्ते मोकळे करण्याचे, लोकांना सुरक्षित जागी पोहोचवण्याचे काम प्रशासन, गावकरी आणि इतर संघटनांच्या मदतीने करत आहे. मुंबईहून पोलादपूपर्यंत आलेली मदत आतापर्यंत १५०० ते १६०० कुटुंबांतील लोकांना पोहोचवण्यात त्यांना यश आले आहे.

महाड, चिपळूण, पोलादपूर असो वा सांगली.. हरएक ठिकाणच्या आपत्तीची माहिती मिळताच आपल्या जीवाची पर्वाही न करता ही तरुण मंडळी आपल्याकडच्या साधनसामुग्रीसह तिथे जाऊन धडकली. तंत्रज्ञानाचा वापर करत, स्थानिक प्रशासनाबरोबरच लोकांशी संवाद साधत त्यांनी आपापल्या पद्धतीने बचावकार्यात उडी घेतली. कु ठलाही किं तु-परंतु मनात न आणता, सरकारी मदतीची वाट न पाहता लगोलग बचावकार्य सुरू करणाऱ्या अशा अनेक तरुण संघटनांमुळे आपत्तीग्रस्त भागातील मदतकार्याला वेग आला. अनेकांचे प्राण वाचले, अनेकांना मदत मिळाली. एरव्ही वर्क फ्रॉम होमच्या कचाटय़ात अडक लेली, सुट्टीची वाट पाहात मोबाइलमध्ये रमलेली तरुण मंडळी संकटकाळात अशीही मोठी ताकद उभारू शकतात, याची प्रचीती या कार्यातून पुन्हा एकदा आली आहे. सह्य़ाद्रीच्या पर्वतरांगांमधून फिरणारी, पाऊसपाण्याची पर्वा न करता साहसी खेळ दाखवण्यात, शिकवण्यात रमलेल्या या तरुणाईने आपल्या साहसाचा योग्य वापर करत आज अनेकांना जीवदान दिले आहे.