विदर्भात आतापर्यंत बहुतांश जिल्ह्यामध्ये सरासरीच्या दुपटीपर्यंत पाऊस झालेला असताना तीन जिल्ह्य़ांमध्ये जुलै महिन्याच्या पावसाचा गेल्या ११२ वर्षांतील विक्रम मोडला गेला आहे. यवतमाळ, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यानी यंदा या वेगळया उच्चांकाची नोंद केली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागामार्फत गेल्या ११२ वर्षांच्या पावसाच्या घेतल्या गेलेल्या नोंदीनुसार जुलै महिन्यात यवतमाळ जिल्ह्य़ात सर्वाधिक ३८६ मि.मी. पाऊस १९८८ मध्ये झाला होता. त्यानंतर हा विक्रम यंदा मोडला गेला असून जुलै महिन्यात या जिल्ह्यात ४८३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्य़ात जुलैतील पावसाचा उच्चांक ६०८ मि.मी. नोंदवला गेला होता. १९४० पासून हा विक्रम अबाधित होता. यंदा ८०३ मि.मी. हा नवा उच्चांक गाठला गेला. गोंदिया जिल्ह्यात ११९४ मध्ये सर्वाधिक ७४० मि.मी. पावसाचा ‘रेकॉर्ड’ नोंदवला गेला होता. तो यंदा मोडीत निघाला असून जुलैमध्ये या जिल्ह्य़ात ८८१ मि.मी. पाऊस झाला आहे.बुलढाणा, वाशीम, वर्धा आणि भंडारा या जिल्ह्या मध्येही ११२ वर्षांत नोंदवल्या गेलेल्या विक्रमाची स्पर्धा झाली.
जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीतील पावसाची सरासरी विदर्भातील सहा जिल्ह्य़ांनी आताच ओलांडली असून गेल्या अनेक वर्षांतला हा पहिलाच प्रसंग आहे. वाशीम जिल्ह्यात जून ते सप्टेंबरच्या सरासरीच्या तुलनेत ११४ टक्के पाऊस झाला आहे. यवतमाळ जिल्ह्य़ात १०४ टक्के, वर्धा १०३ टक्के, नागपूर १०४, चंद्रपूरर ११७ आणि गडचिरोली जिल्ह्य़ात सरासरीच्या १०८ टक्के पाऊस झाला आहे. चार महिन्यांच्या पावसाची सरासरी दोन महिन्यातच ओलांडली गेली आहे. अनेक वर्षांत पहिल्यांदाच अशी वेळ आली आहे. यंदा मान्सूनचे आगमन वेळेत झाले, जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाला, पण जुलै महिन्यात पावसाने मात्र कहर केला. विदर्भातील अनेक तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. काही दिवसांपूर्वी लोणार तालुक्यात तर पंधरा तासात उच्चांकी ४१९ मि.मी. पावसाची नोंद झाली.
पावसाच्या संदर्भातील अनेक आडाखे यंदा पावसाने चुकवले आहेत. पश्चिम विदर्भाच्या तुलनेत पूर्व विदर्भात पावसाची तीव्रता अधिक आहे. एकाच दिवशी ढगफुटीसारख्या पावसाचा अनुभव अनेक ठिकाणी आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून उपलब्ध झालेल्या १९०१ पासूनच्या पावसाच्या नोंदीकडे नजर टाकल्यास यंदा विदर्भात अनेक जिल्’ाांमध्ये पावसाचा वार्षिक विक्रमही मोडला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पावसामुळे सिंचन प्रकल्पांमध्येही मुबलक असा साठा झाला आहे. जुलैअखेर बहुतांश धरणे तुडूंब भरली आहेत. नागपूर विभागातील १४ आणि अमरावती विभागातील पाच मोठय़ा प्रकल्पांचे दरवाजे उघडे करावे लागले. अनेक धरणांची सर्व दारे उघडयाची पाळी या पावसाने आणली. नागपूर विभागातील ४० मध्यम प्रकल्पांपैकी २९ आणि अमरावती विभागातील २३ पैकी १६ मध्यम प्रकल्प ‘ओव्हरफलो’ झाले आहेत. जुलै महिन्यातच असा प्रसंग येण्याची ही गेल्या काही दशकांमधील पहिलीच वेळ आहे. विदर्भात येत्या काही दिवसात पावसाचा जोर कायम राहिल्यास नवे विक्रम प्रस्थापित होण्याची शक्यता आहे.