ठाणे शहर वाहतुकाच्या चक्रव्यूहात अडकलेले असतानाच हातगाडी तसेच फेरीवाल्यांमुळे कोंडीत आणखी भर पडू लागल्याने ठाणेकर हैराण झाले आहेत. शहरातील हरित जनपथ, पदपथ तसेच रस्त्यांवर फेरीवाल्यांकडून मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण होत असतानाही त्यांच्याविरोधात कारवाई होत नसल्यामुळे सर्व पक्षीय नगरसेवकांनी गुरूवारी सर्वसाधारण सभेत महापालिका प्रशासनाच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली. याच पाश्र्वभूमीवर शहरातील वाहतूकीस अडथळा करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश ठाण्याचे महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी महापालिका प्रशासनाला दिले.
ठाणे शहरात बहुतेक अरूंद रस्ते असून त्यांच्या रुंदीकरणास फारसा वाव राहिलेला नाही. असे असतानाच शहरात दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. परिणामी, शहरात मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवर वाहनांच्या लांबच्या लांब रागा दिसून येतात. असे असतानाच शहरातील हरित जनपथ, पदपथ, रस्त्यांवर फेरिवाले अतिक्रमण करू लागल्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडू लागली आहे. याच पाश्र्वभूमीवर गुरूवारच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीचे नगरसेवक अमित सरैय्या आणि काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी सभा तहकुबी मांडली. त्याच मुद्दय़ावरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत शहरातील फेरीवाल्यांविरोधात कारवाईची मागणी केली.
दरम्यान, फेरीवाल्यांवर कारवाई करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यामुळे फेरीवाल्यांवर कारवाई करता येत नाही. तसेच फेरीवाला धोरण ठरविण्याचे काम सुरू असून त्यामध्ये फेरीवाल्यांची नोंदणी करण्यात येत आहे. येत्या पाच महिन्यात ओळखपत्रधारक फेरिवाले व्यवसाय करू शकतील तसेच त्यांच्या जागा निश्चित करण्यात येणार आहेत, असे आयुक्त असीम गुप्ता यांनी स्पष्ट केले. तसेच हरित जनपथ अडवून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यात येईल, असे गुप्ता यांनी सांगितले.
मात्र, आयुक्त गुप्ता यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर नगरसेवक फारसे समाधानी नव्हते. त्यामुळे त्यांनी फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी लावूनच धरली. दिव्यातील रस्ते अरूंद असून त्यावर फेरीवाले अतिक्रमण आहे. त्यामुळे या भागात वधु देण्यासाठी कोणीही तयार होत नाही, अशी खंत दिव्यातील नगरसेवक शैलेश पाटील यांनी व्यक्त केली. त्यामुळे अखेर शहरातील वाहतूकीस अडथळा करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश ठाण्याचे महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी महापालिका प्रशासनाला दिले.