आधुनिक जगात अपरिहार्य मानल्या गेलेल्या सोशल नेटवर्किंगचे दुष्परिणामही आता दिसू लागले आहेत. आधी गरज आणि मग सवयीने जास्तीत जास्त ऑनलाइन राहण्याने व्यक्तीच्या दैनंदिन आयुष्यात गंभीर स्वरूपाची वर्तन समस्या निर्माण होते आणि त्यात किशोरवयीन मुला-मुलींची संख्या सर्वाधिक आहे. माहितीच्या महाजालातील असंख्य संकेतस्थळे, मोबाइल्सवरील विविध अ‍ॅप्लीकेशन्स, गेम्स आदींच्या चक्रव्यूहात ही पिढी नको तितकी अडकत असून एका नव्या मानसिक विकाराला बळी पडू लागली आहे. त्यामुळे मुला-मुलींनी ऑनलाइनच्या आहारी जाऊ नये म्हणून आहान फाऊंडेशनने मुंबई-ठाण्यातील विविध शाळांमध्ये प्रशिक्षण मोहीम हाती घेतली असून त्यात सोशल मिडीयाचा विवेकपूर्ण वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले जाते. ‘रिस्पॉन्सिबल नेटिझम’ असे या मोहीमेचे नाव असून आतापर्यंत मुंबई-ठाण्यातील ६० हजार विद्यार्थ्यांपर्यंत ‘आहान फाऊंडेशन’ने आपले विचार पोहोचविले आहेत.  सध्या महानगरीय मुलांमध्ये ही समस्या मोठय़ा प्रमाणात भेडसावते. पूर्वी टी.व्ही.ला खिळून असलेली मुले आता आई अथवा बाबांचा स्मार्ट फोन अथवा टॅब घेऊन त्यावर एकतर गेम खेळतात अथवा इंटरनेट, फेसबुक अथवा ‘हॉटस् अ‍ॅप’ पाहण्यात तासन् तास घालवितात. पालकही कौतुकाने ‘मला फोन करण्यापलिकडे त्यातलं काही कळत नाही, पण आमची मुलं सर्व अ‍ॅप्लीकेशन्स वापरतात’, असे कौतुकाने सांगत असतात. अनेकदा तर ‘एका जागी शांत तरी बसतो’, म्हणून पालकच मुलांच्या हाती स्मार्ट फोन देतात. घरी महिलांकडे अनेकदा स्मार्ट फोन्स असतात. मात्र फोन करण्यापलिकडे ते त्याचा फारसा वापर करीत नाहीत. मग दिवसभर घरी असलेल्या मोबाईलचा मुले चक्क खेळणे म्हणून वापर करतात. किशोरवयातच फेसबुक अकाऊंट उघडून त्या माध्यमातून ही मुले हजारो मित्र बनवितात आणि तास न् तास त्यांच्याशी चॅटींग करीत राहतात. काही जणांना पॉर्न साईटस् पाहण्याची सवय लागते. दिवसभर मुले एकतर स्मार्ट फोन अथवा संगणकाला खिळून राहतात. फेसबुकच्या माध्यमातून अभासी जगात (व्हच्र्युअल) हजारो मित्र असले तरी ऑनलाइनच्या आहारी गेलेली मुले समाजात मात्र कुणाशीही घड संवाद साधू शकत नाहीत. बोलताना त्यांना समोरच्याशी नजरेला नजर मिळविता येत नाही. त्यांची सारी दिनचर्याच बदलून जाते. एकाग्रता भंग पावते. अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. झोपेच्या वेळा बदलतात. कोणत्याही कारणाने ऑफलाइन राहण्याची वेळ आली तर ही मुले बेचैन होतात.

स्मार्ट सोशल नेटवर्किंगचे धडे
आम्ही मुलां-मुलींना सोशल नेटवर्किंगचा योग्य वापर करण्याविषयी मार्गदर्शन करतो. विशेष प्रशिक्षण घेतलेले तज्ज्ञ तसेच  काही हॅकर्स मुलांशी चर्चा करतात. शाळेतील समुपदेशकांचीही आम्हाला मदत होते.   सोशल नेटवर्किंगच्या आपण आहारी जात आहोत, याची जाणीव मुलांनाही असते, पण त्यामधून बाहेर पडायचे कसे हे त्यांना माहिती नसते. यासंदर्भात पालक अतिशय हतबल असतात. आम्ही मुलांना सोशल नेटवर्किंग वापरूच नका असे अजिबात सांगत नाही. उलट काही चांगली उदाहरणे देऊन त्याचा सकारात्मक उपयोग करण्याचे मार्ग सुचवितो. ठाण्यातील सिंघानिया, वसंतविहार, डिएव्ही, सरस्वती शाळा, बेडेकर विद्यामंदिर, मो.ह.विद्यालय तसेच मुंबईतील काही शाळांमध्ये आम्ही रिस्पॉन्सिबल नेटवर्किंगच्या कार्यशाळा घेतल्या आहेत. आता ठाणे शहरातील १५ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) विद्यार्थ्यांकरवी यासंदर्भातील प्रबोधन मोहीम अधिक व्यापक करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
उन्मेष जोशी,
समन्वयक, आहान फाऊंडेशन          

नव्या मानसिक आजाराला निमंत्रण
सोशल नेटवर्किंगच्या अतिरेकी वापरामुळे तरूण पिढी नव्या मानसिक आजाराला निमंत्रण देत आहे. त्याला ‘आयएडी’ (इंटरनेट अ‍ॅडिक्शन डिसॉर्डर) असे म्हणतात. मोबाईल फोन, इंटरनेट अथवा विविध प्रकारच्या गेम्समुळे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असेल तर हे या आजाराचे लक्षण आहे, असे समजावे. शालेय- महाविद्यालयीन मुले आपला अतिशय अमूल्य वेळ त्यात वाया घालवितात. मुले याबाबत पालकांचे ऐकत नाहीत. ती आक्रमक बनतात. आमच्या संस्थेत सुरूवातीच्या काळात अशा काही रुग्णांवर अ‍ॅडमिट करून उपचार करण्यात आले. आता बाह्य़ रुग्ण विभागात ही समस्या भेडसाविणाऱ्यांवर उपचार करतो. सारखे एका जागेवर बसून एकटक स्क्रीनकडे पाहत राहिल्यामुळे लहान वयातच डोळ्याचे विकार, पाठदुखी बळावते. एकाग्रता भंग पावून स्मरणशक्ती कमी होते. त्यांची सर्जनशीलताच धोक्यात येऊ शकते.  सोशल नेटवर्किंगचा गरजेपुरता वापर करा. त्याची सवय लावून घेऊन नका, असा सल्ला आम्ही देतो.
मुक्ता पुणतांबेकर, मुक्तांगण-पुणे