अमरावतीच्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात येत्या ११ नोव्हेंबरपासून ‘वन्यजीव व व्याघ्र संरक्षणासाठी मानवी आचरणात बदल घडविणारी साधने’ या विषयावर ११ नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावती विद्यापीठानेच या अभिनव अभ्यासक्रमाची सुरूवात २००९ साली भारतात पहिल्यांदा केली होती. यंदाचा कार्यक्रम दुसरा राहणार असून यात देशविदेशातील आंतरराष्ट्रीय वन्यजीवतज्ज्ञ आणि अभ्यासक सहभागी होणार आहेत. या अभ्यासक्रमामुळे अमरावती विद्यापीठ जागतिक नकाशावर आले आहे.
अभ्यासक्रमासाठी तीन देशांमधील १८ निवडक प्रशिक्षणार्थीची निवड करण्यात आली आहे. या प्रशिक्षकांना जागतिक ख्यातीचे प्रशिक्षक प्रशिक्षण देणार आहेत, अशी माहिती सातपुडा फाऊंडेशनचे सर्वेसर्वा व अभ्यासक्रमाचे प्रणेते किशोर रिठे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. विदर्भात तीन ठिकाणी हा कार्यक्रम घेतला जाणार आहे. कार्यक्रम प्रशिक्षणार्थीना प्रत्यक्ष वनक्षेत्रात प्रशिक्षण देण्यासाठी ताडोबा आणि मेळघाट या दोन व्याघ्र प्रकल्पांमध्ये पाठविण्यात येईल. महाराष्ट्राचे प्रधान वनसचिव प्रवीण परदेशी यांच्यासह वरिष्ठ वनाधिकारीही यात सहभागी होणार आहेत. सातपुडा फाऊंडेशनने हा अभ्यासक्रम आशिया खंडात पोहोचविल्याने त्याला विविध देशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
हवामान बदल आणि पर्यावरण संरक्षणावर संपूर्ण जगात गांभीर्याने चर्चा, विचार आणि कृती होत असताना वन्यजीव व व्याघ्र संरक्षणाच्या मुद्दय़ाचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न अभ्यासक्रमाच्या निमित्ताने केला जाणार आहे. अवैध शिकारी आणि मानव वन्यजीव संघर्ष ही अलीकडच्या काळातील गंभीर समस्या आहे. या समस्यांचा अडसर दूर करण्यासाठी पर्यावरण शिक्षणाच्या माध्यमातून त्यावर करावयाच्या उपाययोजना आणि मानवी आचरणात बदल घडविणाऱ्या नवी साधनांचा वापर यावर भर दिला जाईल. या विषयावर अमेरिका आणि इंग्लंड या प्रगत देशांमध्ये काही विद्यापीठांनी अत्यंत प्रभावी अभ्यासक्रम सुरू केले आहेत. भारतात मात्र अशा पद्धतीच्या कमी कालावधीच्या अभ्यासक्रमांचा अभाव आहे. ही उणीव सातपुडा फाऊंडेशनने २००९ सालापासून भरून काढली.
अमरावती विद्यापीठ, अमेरिकेतील एन्व्हायर्नमेंट एज्युकेशन अँड कंझव्‍‌र्हेशन ग्लाबल, महाराष्ट्र वन्यजीव विभाग आणि अमरावतीच्या निसर्ग संरक्षण पर्यावरण संस्थेचे या २० दिवसांच्या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. बांगला देश, नेपाळ तसेच आसाम, पंजाब आणि महाराष्ट्रातील १८ प्रशिक्षणार्थी अभ्यासक्रम पूर्ण करतील. वन विभागाचे पाच अधिकारीही यात सहभागी होतील. जागतिक ख्यातीचे अमेरिकेतील पर्यावरण विशेषज्ज्ञ एडवर्ड मॅकक्री, देबोरा सिमन्स, कॅनडाचे ऑगष्टो मेडिना यांचे प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन लाभणार असून येत्या सोमवारी, ११ नोव्हेंबरला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक दिनेश त्यागी यांच्या हस्ते अभ्यासक्रमाचे उद्घाटन होईल. अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू जयकिरण तिडके यावेळी उपस्थित राहतील.