नांदगाव, लासलगाव येथे कामायणी एक्स्प्रेस थांबविण्यात यावी, मनमाड येथे प्रलंबित समांतर पुलाचे काम त्वरित करावे, या मागण्या निवेदनाव्दारे मध्य रेल्वेचे महाप्रबंधक सुबोध जैन यांना शिष्टमंडलाने दिले. जैन यांनी मनमाड रेल्वे स्थानकास भेट दिली असता नाशिक र्मचन्ट बँकेचे संचालक सुभाष नहार, उद्योजक अजित सुराणा, कांतीलाल लुणावत यांनी त्यांना निवेदन दिले.
मनमाड रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवासी जनसंपर्क अधिकाऱ्यांची कायमस्वरुपी नेमणूक करावी, रेल्वे स्थानकातील आरक्षण कार्यालयातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी व स्थानकातील नवीन पादचारी पूल त्वरित करावा, या मागण्या मंडल रेल उपभोगकर्ता समिती सदस्य तथा भाजपचे जिल्हा चिटणीस नितीन पांडे यांनी मांडल्या आहेत.
मनमाड हे मध्य रेल्वेचे भुसावळ मंडळातील महत्वपूर्ण रेल्वे जंक्शन आहे. या रेल्वे स्थानकातून सुमारे १८-२० हजार प्रवासी दररोज प्रवास करतात. रेल्वे प्रवासी व प्रशासन यांच्यात समन्वय साधण्यासाठी रेल्वे प्रवासी जनसंपर्क अधिकाऱ्यांची कायमस्वरुपी नेमणूक मनमाड स्थानकात करावी, स्थानकातील रेल्वे तिकीट आरक्षण कार्यालयात संगनमताने तिकीटांचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी   मनमाड शहर भारतीय जनता पार्टीकडे आल्या आहेत.
या सर्व प्रकरणांशी संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाला तडे गेले आहेत.
मनमाड रेल्वे स्थानकात नव्याने प्रस्तावित असलेल्या पादचारी पुलाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. यावेळी भाजप शहराध्यक्ष नारायण पवार, प्रवासी संघटनेचे नईम शेख, कांतीलाल लुणावत आदी उपस्थित होते.