डोंबिवलीतील कोणत्याही भागातून रेल्वे स्थानकात जायचे आहे.. डोंबिवलीतून नवी मुंबई किंवा ठाण्याकडे रिक्षाने प्रवास करायचा आहे.. अशा वेळी रिक्षाथांब्यावर जाऊन लांबच लांब रांग लावण्याची गरज नाही.. रिक्षाचालकांना विणवण्या करत त्यांची मनधरणी करण्याची बिलकूल आवश्यकता नाही.. रिक्षा लवकर मिळावी म्हणून घाईघाईने शोधमोहीम हाती घेण्याचीही आता गरज नाही. इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी करावा लागणारा रिक्षाप्रवास आता एका दूरध्वनीने सहजसाध्य होऊ शकणार आहे. डोंबिवलीतील आयटी अभियंता ओंकार फाटक यांनी ७५ रिक्षाचालकांच्या मदतीने शहरात ‘ऑटो ऑन कॉल’ ही सेवा सुरू केली असून त्यास डोंबिवलीकरांचा मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे.
ठाणेपल्याडच्या कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीचे कंबरडे मोडले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत चालविल्या जाणाऱ्या बससेवेचे तीनतेरा वाजल्यामुळे येथील रहिवाशांना रिक्षा वाहतुकीवर अवलंबून राहावे लागते. प्रवाशांची जादा संख्या आणि तुलनेने रिक्षांची कमतरता यामुळे इच्छित स्थळी जाऊ पाहणाऱ्या प्रवाशांचे हाल होतात. रिक्षाचालकांची पुरती मनमानी या भागामध्ये निर्माण झाली असून भाडे नाकारण्यापासून ते प्रवाशांशी गैरवर्तन करण्यापर्यंत या रिक्षाचालकांची मजल गेली होती.
या भागातून प्रवास करायचा तर रिक्षाचालकांशी नमतेच घ्यायला हवे असे एकंदर चित्र आहे. हे चित्र बदलावे यासाठी डोंबिवलीत प्रयत्न सुरू झाले असून रिक्षाची सुविधा घरापर्यंत देण्याची संकल्पना डोंबिवलीचे रहिवाशी आणि व्यवसायाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंता असलेले ओंकार फाटक यांनी प्रत्यक्षात राबविण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यासाठी लागणारा सर्व अभ्यास त्यांनी सुरू केला. रिक्षाचालक मालक संघटना, आरटीओ आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ‘ऑटो ऑन कॉल’ ही सेवा देणारी संस्था स्थापन केली. या माध्यमातून प्रवाशांनी फोन केल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांमध्ये रिक्षा प्रवाशांच्या घरासमोर येऊन पोहोचते, अशी सेवा डोंबिवलीत सुरू करण्यात आली. त्यानंतरचा प्रवास संपल्यानंतर मीटरप्रमाणे भाडे आकारून त्यांना केलेल्या प्रवासाच्या भाडय़ाची पावती दिली जाते. शिवाय काही अडचणी आल्यास थेट कॉल सेंटरला फोन करून आपली नेमकी अडचणही सांगण्याची सुविधा या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
१८ नोव्हेंबर रोजी या सुविधेचा शुभारंभ झाला असून त्यासाठी टिळकनगर परिसरात एक कॉलसेंटर सुरू करण्यात आले आहे. २४ तास ही सेवा उपलब्ध होत असून सध्या डोंबिवलीमध्ये ही सुविधा दिली जात असून कालांतराने कल्याण, ठाणे शहराबरोबरच मुंबईमध्ये ही सेवा सुरू करण्याचा ओंकार फाटक यांचा मानस आहे. रिक्षाचालकांच्या कुटुंबाला विमा संरक्षण आणि रिक्षाचे पासिंग करून देण्याची सुविधा या उपक्रमात दिली जाणार आहे. शिवाय त्यांच्या कुटुंबासाठी आवश्यक सेवा-सुविधा देण्याकडे फाटक यांचा भर राहणार आहे, असे त्यांनी ‘ठाणे वृत्तान्त’शी बोलताना सांगितले.

रिक्षा हवी असेल तर..
९३२१६०६५५५, ९३२१९०९५५५ या दूरध्वनी क्रमांकांवर कॉल, एसएमएस किंवा व्हॉट्सअ‍ॅप करून प्रवासी आपल्या प्रवासाची माहिती कॉल सेंटरला कळवू शकतात. त्यानंतर त्यावर तात्काळ कारवाई सुरू केली जाईल. १५ मिनिटांमध्ये प्रवाशाला हव्या त्या ठिकाणी सेवा देण्यासाठी रिक्षा पोहोचू शकणार आहे. प्रवाशांना मासिक पासाची सुविधा उपलब्ध असून त्यामध्ये नियमित प्रवास करणाऱ्यांना काही प्रमाणात सूट देण्यात येते. त्याचप्रमाणे प्रत्येक तासाप्रमाणे रिक्षा हवी असल्यास तशीसुद्धा सोय या उपक्रमातून दिली जाते. ही सुविधा देण्यासाठी फाटक यांनी रिक्षाचालकांशी करार केला असून त्यामध्ये रिक्षाचालकांची गुन्हेगारी पाश्र्वभूमी नसल्याची खात्री त्यांनी करून घेतली आहे. ग्राहकांशी हुज्जत घालू नये, गैरवर्तन करू नये, मद्यपान किंवा धूम्रपान करू नये अशा नियमावलीचा त्यात समावेश करण्यात आला आहे.