News Flash

‘नीतिमत्तादेखील जातीशी बांधील’

नीतिमत्तादेखील जातीशी बांधील असते. सन २००५ ते २०१० या ५ वर्षांत दरवर्षी अनुसूचित जाती-जमातीच्या एक हजारपेक्षा अधिक महिलांवर बलात्कार झाल्याची आकडेवारी आहे. तेव्हा अशी आंदोलने

| January 15, 2013 01:10 am

मिलिंद समता पुरस्कार डॉ. मुणगेकर यांना प्रदान
नीतिमत्तादेखील जातीशी बांधील असते. सन २००५ ते २०१० या ५ वर्षांत दरवर्षी अनुसूचित जाती-जमातीच्या एक हजारपेक्षा अधिक महिलांवर बलात्कार झाल्याची आकडेवारी आहे. तेव्हा अशी आंदोलने का उभारली गेली नाहीत? दिल्लीतील बलात्काराच्या घटनेनंतर देशात सर्वत्र निषेधाचा सूर उमटला. तो योग्यच आहे. पण एरवी आपली संवेदना का हरवते? नीतिमत्तादेखील जातीशी बांधील असते, हा सिद्धान्त १९३८ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला होता. आजही तसेच वातावरण आहे, असे मत खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले.
नागसेनवनातील लुम्बिनी उद्यानात मिलिंद कला महाविद्यालयाच्या वतीने यंदाचा मिलिंद समता पुरस्कार डॉ. मुणगेकर यांना एम. एस. मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘पीईएस’चे अध्यक्ष एम. एस. मोरे होते. व्यासपीठावर प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान, डॉ. भन्ते सत्यपाल, उपप्राचार्य डॉ. संतोष बुरकुल व प्रा. लीला सांगोळे उपस्थित होते. डॉ. मुणगेकर म्हणाले, की भारत हा सर्वशक्तिमान देश असल्याचे सांगितले जाते. पण मैला वाहून नेणारे कामगारही आपल्याकडे आहेत. झाडू कामगारांची संख्या मोठी आहे आणि ते बहुतेक दलित कसे? जागतिकीकरणाने विकासाचा वेग वाढला असला तरी त्याचे फायदे सर्वसामान्य गरीब कुटुंबांपर्यंत पोहोचले नाहीत. नेल्सन मंडेला, माओ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तिघांचेच काम जागतिक पातळीवर मोठे मानले जाते. त्यातही बाबासाहेबांनी केलेला संघर्ष एकाकी आहे. जातिव्यवस्थेविरुद्ध, ब्रिटिश सरकारविरुद्ध आणि स्वकीयांबरोबरही त्यांना संघर्ष करावा लागला.
कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन सोल ऑफ इकॉनॉमिक्स या विद्यापीठांवरील सवरेत्कृष्ट विद्यार्थी असे ज्यांचे नाव आजही कायम आहे, ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीमार्फत दिल्या जाणारा मिलिंद समता पुरस्कार माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा पुरस्कार असल्याचे मी मानतो. या पुरस्काराने मी भारावून गेलो आहे, असेही ते म्हणाले. डॉ. आंबेडकरांनी ‘पीईएस’ची स्थापना केली म्हणूनच मुंबईसह महाराष्ट्रातील दीनदलितांची मुले शिक्षण घेऊ शकली. ‘पीईएस’ने मानवी विकासाची, मानवी मुक्तीची, आत्मसन्मानाची प्रेरणा दिली. अलीकडच्या काळात पीपल्स एज्युकेशन सोसायटीमधील वाद ऐकून मन खिन्न होत असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. मिलिंद महाविद्यालयासाठी खासदार निधीतून पाच लाखांचा प्रस्ताव मंजूर केला जाईल, असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोपात मोरे यांनी डॉ. आंबेडकरांच्या कर्तृत्वामुळे आज खासदार मुणगेकरांसारखे अनेक लोक उच्चपदावर कार्यरत आहेत. बाबासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य समाजकार्यासाठी खर्च केले, शोषितांचा उद्धार केला, असे सांगितले. प्रास्ताविक प्राचार्या डॉ. प्रधान यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सुजित गायकवाड यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2013 1:10 am

Web Title: behaviour is related to caste
Next Stories
1 परभणी जिल्ह्य़ात ज्वारीचे पीक आले भरात..
2 दुष्काळानिमित्त शिवसेनेची संघटना बांधणी सुरू!
3 वस्तूंचे आमिष दाखवून फसवणूक ‘लाँग लाईफ’विरुद्ध अखेर गुन्हा दाखल
Just Now!
X