कल्याण-डोंबिवली पालिकेत सात वर्षांपूर्वी कबड्डीपटू आरक्षणातून भरती झालेल्या क्रीडापटूंना पालिकेकडून कोणत्याही सुविधा देण्यात येत नाहीत. त्यामुळे बक्षिसे पटकावूनही कोणी ना या खेळाडूंचे कौतुक करीत, ना त्यांना क्रीडा विकासासाठी लागणारे साहित्य देण्यासाठी कोणी पुढाकार घेत. या खेळाडूंसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी मात्र दरवर्षी नियमितपणे निविदा मागविल्या जातात. ते साहित्य कोठे जाते हा मोठा अभ्यासाचा विषय असल्याचे या क्रीडापटूंनी सांगितले.
कबड्डी कोटय़ातून भरती झालेले तीन कर्मचारी व इतर विभागातील विविध क्रीडा क्षेत्रांत नैपुण्य असलेल्या एकूण १२ कर्मचाऱ्यांनी कबड्डीचा संघ तयार केला आहे. पालिकेचे नाव उज्ज्वल व्हावे यासाठी हे क्रीडापटू कर्मचारी सतत प्रयत्नशील असतात. राज्याच्या विविध भागांत होणाऱ्या कबड्डी स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी पालिकेचा हा संघ जातो. पण त्यांना पालिकेकडून कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत. रजा टाकून, स्वत:च्या खिशातील पैसे खर्च करून, स्पर्धेचे अर्ज आणून ते जमा करेपर्यंत आणि स्पर्धेला जाण्यापासून ते परत येण्यापर्यंतचा खर्च हे कर्मचारी स्वत:च्या खिशातून करतात. या कर्मचाऱ्यांच्या सुट्टय़ा दोन-दोन महिने उशिरा मंजूर केल्या जातात. या क्रीडापटूंना बूट, टी शर्ट, शूज, ट्रॅव्हल्स पिशवी असे कोणतेही कीट पालिकेकडून देण्यात येत नाही. पालिकेच्या सुरक्षारक्षक, आरोग्य, अग्निशमन विभागात हे कर्मचारी कार्यरत आहेत. सरावासाठी सुट्टी दिली जात नाही. कामाचे तास भरून हे कर्मचारी सरावाची तालीम करतात.
सुविधा द्या म्हणून मागणी करायला गेलो तर उलट चौकशीचा ससेमिरा पाठीमागे लागण्याच्या भीतीने कोणीही कर्मचारी या क्रीडापटूंसाठी सुविधा देण्याच्या मागणीचा विचार करीत नसल्याचे या खेळाडूंनी सांगितले. पालिकेचे क्रीडा अधिकारी राजेश भगत यांची उदासीनताही यामागे असल्याचे पालिकेतून सांगण्यात येते.