तब्बल १६०० डिग्री सेल्सिअस तापमानात भंगार वितळवून त्यापासून गटाराची झाकणे आणि स्मशानातील पायरसेट आदींची निर्मिती करणाऱ्यांच्या आरोग्यासाठी केवळ आठ रुपये ‘गरम भत्ता’ देऊन पालिका या कामगारांची क्रूर थट्टा करीत आहे. पोषक आहार देऊन आपल्या रुग्णालयातील डॉक्टरांची काळजी घेणाऱ्या पालिकेने या कामगारांना मात्र वाऱ्यावर सोडले आहे. परिणामी, या कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

मुंबई महापालिकेने आपल्याला आवश्यक असलेल्या लोखंडी साहित्याच्या निर्मितीसाठी मुंबई सेंट्रल परिसरातील फोरास रोडजवळ फाऊंड्री (कर्मशाळा) सुरू केली असून फाऊंड्रीतील ओतशाळेतील भट्टीमध्ये भंगार लोखंड वितळवून त्यापासून आवश्यकतेनुसार वस्तू बनविल्या जातात. मुंबईतील गटारांची (मॅनहोल) लोखंडी झाकणे, स्मशानात चिता रचण्यासाठी पायरसेट, सफाई कामगारांसाठी लोखंडी ढकलगाडय़ांचे सुटे भाग आदींची निर्मिती या फाऊंड्रीमध्ये केली जाते. सध्या या फाऊंड्रीमध्ये ५५ कामगार विविध पदांवर काम करीत आहेत.
फुटल्यामुळे अथवा अन्य काही कारणांमुळे बदलण्यात येणाऱ्या जलवाहिन्या जल विभागाकडून थेट या फाऊंड्रीत पाठविण्यात येतात. तेथे या जलवाहिन्या वितळवून त्यापासून वरील वस्तूंची आवश्यकतेनुसार निर्मिती करण्यात येते. या फाऊंड्रीमधील भट्टीमध्ये १६०० डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये या जलवाहिन्या वितळविण्यात येतात. भट्टी सुरू असताना असह्य़ अशा उष्णतेमध्ये या कामगारांना काम करावे लागते. या भयानक उष्णतेमध्ये काम करणाऱ्यांची प्रकृती धष्टपुष्ट असणे आवश्यक असते. त्यामुळे येथे कामगारांच्या नियुक्तीच्या वेळी शैक्षणिक आर्हतेबरोबर शारीरिक क्षमताही लक्षात घेतली जाते.
एकेकाळी या फाऊंड्रीमध्ये मोठय़ा प्रमाणावर भंगार येत होते आणि महिन्याला ११ ते १२ वेळा भट्टी सुरू करून विविध वस्तूंची निर्मिती केली जात होती. त्या वेळी फाऊंड्रीत कामगारांचा राबता होता. कालौघात कामगार सेवानिवृत्त होत गेले आणि रिक्त जागा भरावयाच्या राहून गेल्या. परिणामी आजघडीला तेथे ५५ कर्मचारी कार्यरत आहेत. मनुष्यबळाअभावी आता महिन्यातून दोन ते तीन वेळा भट्टी लावली जाते. मात्र त्या वेळी प्रचंड उष्णतेत काम करणारे कामगार हैराण होतात.
तब्बल १६०० डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये काम करणाऱ्या कामगारांचे आरोग्य धोक्यात येते. या प्रचंड उष्णतेमुळे नपुंसकत्व येऊ शकते, तसेच त्वचेचा कर्करोग होण्याची भीती असते. शरीरातील पाणी कमी होते, हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, उष्णतेमुळे नेत्रविकाराचा संभव असतो, रक्तातील हिमोग्लोबिन कमी होते, रक्तदाबाचा विकार जडतो, तसेच भंगार वितळविताना त्यातून निघणारे विषारी वायू आरोग्यास घातक ठरू शकतात. इतके धोके पत्करून हे कामगार आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी या फाऊंड्रीत काम करीत आहे. भट्टी लावल्यानंतर प्रचंड उष्णतेत काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याची काळजी घेण्यास पालिका विसरलेली नाही. या कामगारांना आरोग्यासाठी ‘गरम भत्ता’ दिला जातो. पूर्वी या भत्त्यापोटी पालिका कामगारांच्या हातावर पाच रुपये टेकवत होती. आजघडीला त्यात तीन रुपयांनी वाढ झाली असून आता आठ रुपये ‘गरम भत्ता’ कामगारांना मिळू लागला आहे. या भट्टीजवळ काम करण्यासाठी कणखर आरोग्य असणे गरजेचे आहे. मात्र आठ रुपयांमध्ये आरोग्याची काळजी कशी घ्यायची, असा सवाल हे कामगार विचारत आहेत.