छेड काढल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान गोळीबार होण्यात झालेल्या घटनेत संबंधित तरूणीने दिलेल्या फिर्यादीवरून येथील आझाद नगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. गावठी पिस्तुलातून गोळीबार करणाऱ्या संशयितांपैकी दोघांना अटक करण्यात आले असून पिस्तुल जप्त करण्यात आले आहे.
शहराच्या म्हाळदे शिवारात टवाळखोरांकडून होणाऱ्या छेडछाडीमुळे वैतागलेल्या एका मुलीचे नातेवाईक याचा जाब विचारण्यासाठी शुक्रवारी रात्री टवाळखोरांच्या घराजवळ गेले असता त्याच भागातील माजिद मोहंमद यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. यावर संतप्त झालेल्या मुलीच्या नातेवाईकांनी माजिद यासा लाकडी दांडय़ाने मारहाण केली. एकाने त्यांच्या दिशेला गावठी पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्या. आझाद नगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या कमर अली व शाहिद अख्तर यांना रविवारी सकाळी अटक केली असून त्यांच्याकडून पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. छेड काढणाऱ्यांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांनी अशा प्रकारे कायदा हातात घेतल्यामुळे पोलिसांना त्यांच्याच विरोधात गुन्हा दाखल करावा लागला.
त्यामुळे प्रारंभी टवाळखोर नामनिराळे राहिले होते. मात्र आता संबंधित मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अख्तर, समीर व नसीम या तिघांविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.