या वर्षी ११वीकरिता केंद्रीय प्रवेश पद्धत राबविली जात असून, उद्या मंगळवारपासून चार दिवसांच्या कालावधीत संबंधित विद्यार्थ्यांनी मूळ कागदपत्रांसह त्यांची निवड झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयांत जाऊन प्रवेश घ्यावा. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी शिक्षण उपसंचालकांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक शिक्षण संचालक वसंत पायमल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.    
११वीच्या प्रवेशामध्ये गोंधळ होऊ लागल्याने केंद्रीय प्रवेश पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय सन २००९-१० पासून घेण्यात आला. यंदाही त्याची अंमलबजावणी करण्यात आली. शहरात ३३ मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालये आहेत. तेथे प्रवेश मिळण्याबाबत सहा ठिकाणी उद्बोधनवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. १७ जूनपासून प्रवेशअर्जाची विक्री व संकलन झाले होते. २२ जूनपासून अर्जाची छानणी व निवडयादी तयार करण्याचे काम सुरू होते. १ जुलै रोजी संकेतस्थळावर निवडलेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. २ जुलैपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. ६ जुलै रोजी रिक्त जागांवर प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे. तर ८ जुलैपासून ११वीचे वर्ग सुरू होणार आहेत.    
या वर्षी कला विभागासाठी मराठी माध्यमाकरिता ११४९, तर इंग्रजी माध्यमाकरिता २० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. वाणिज्य विभागासाठी मराठी माध्यमाकरिता २५८४, तर इंग्रजी माध्यमाकरिता १०३० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. सर्वाधिक विद्यार्थी विज्ञान विभागाकडे असून ती संख्या ७०५१ इतकी आहे. प्रवेशप्रक्रियेबाबत तक्रारी असतील तर विद्यार्थ्यांनी कमला कॉलेज (कला शाखा), कॉमर्स कॉलेज (वाणिज्य शाखा) व गोखले कॉलेज (विज्ञान शाखा) येथे ४ जुलैपर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.