२०१२ या राष्ट्रीय गणित वर्षांनिमित्त रामन विज्ञान केंद्रातर्फे २७ ते २९ डिसेंबर या कालावधीत विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रतिकृती (वर्किंग सायन्स मॉडेल) स्पर्धा आणि शिक्षकांसाठी शिक्षण सामग्री प्रदर्शन व  स्पर्धा होणार आहे. विद्यार्थ्यांना स्वत: तयार केलेली भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र किंवा गणित या विषयांतील कोणत्याही एका सिद्धांतावर आधारित प्रतिकृती किंवा प्रगत विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली प्रदर्शित करता येईल. शिक्षकही त्यांनी तयार केलेली शिक्षण सामग्री (टीचिंग एड) तीन दिवसांकरता रामन विज्ञान केंद्रात प्रदर्शित करू शकतात. मॉडेलचा आकार ३ गुणिले २ फुटांपेक्षा जास्त नसावा. सहभागी विद्यार्थ्यांना तिन्ही दिवस सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत आपल्या प्रतिकृतींसोबत थांबून येणाऱ्या प्रेक्षकांना प्रात्यक्षिक करून दाखवणे अनिवार्य आहे.
प्रसिद्ध गणितज्ज्ञांशी भेट हा कार्यक्रम २७ तारखेला सकाळी ११ वाजता होणार असून त्यात सातवी ते नववीतील विद्यार्थ्यांच्या गणितविषयक शंकांचे निरसन गणितज्ज्ञ करतील.
याच दिवशी दुपारी १ वाजता पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी या वयोगटांसाठी होणाऱ्या विज्ञान प्रश्न मंजुषेच्या लेखी परीक्षेत गणितावर आधारित प्रश्नांचा समावेश राहील.
गणित विषयावरील कार्यशाळा २८ डिसेंबरला सकाळी साडेअकरा ते दुपारी २ या वेळेत होईल. यात गणित विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. गणितात भारतीयांचे योगदान, वैदिक गणित व त्याची उपयुक्तता आणि प्रायोगिक गणितातील गमतीजमती विद्यार्थ्यांना शिकवल्या जातील. यात आठवी ते दहावीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील.
याशिवाय सातवी ते नववीतील विद्यार्थ्यांसाठी पोस्टर बनवा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना ‘गणितात भारताचे योगदान : भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य’ या विषयावर साडेतेरा इंच गुणिले साडेएकोणवीस इंच आकाराच्या माऊंट बोर्डवर पोस्टर तयार करून केंद्रात २२ डिसेंबपर्यंत जमा करायचे आहेत. या भित्तीचित्रांचे प्रदर्शन भरवले जाणार आहे. विद्यार्थी व शिक्षकांनी या कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त संख्येत सहभागी होण्याचे आवाहन केंद्राचे प्रकल्प समन्वयक श्रीकांत पाठक यांनी केले आहे.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी नोंदणीकरता २७३५८०० या दूरध्वनी क्रमांकावर २२ डिसेंबपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.