राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणीकरण जवळपास पूर्ण झाले असून सुमारे ९५ टक्के कामाचे डाटा एन्ट्री झाल्याचा दावा अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा ११ मे रोजी आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी श्याम अवस्थी, ऋषीकेश पोहरे, अजय तापडिया व श्रीकांत पिसे उपस्थित होते.
राज्यातील शिधापत्रिकांऐवजी कुटुंबप्रमुखाच्या फोटोसहीत बारकोडेड शिधापत्रिका वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्यात अस्तित्वात असलेल्या दोन कोटी २७ लाख शिधापत्रिकांपैकी सुमारे दोन कोटी पंधरा लाख शिधापत्रिकांचे डाटा एन्ट्रीचे काम पूर्ण झाले आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीत तक्रारी आल्यास १८००२२४९५० या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविण्याचे आवाहन मंत्री अनिल देशमुख यांनी केले. या टोल फ्री क्रमांकाचा सहा हजार लोकांनी लाभ घेतला आहे. अकोला जिल्ह्य़ाच्या पुरवठा अधिकाऱ्याबद्दल तसेच  वितरण प्रणालीबद्दल अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून याचा आढावा घेण्यात येईल, असे देशमुख म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा ११ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत अकोल्यात आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्यास राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी व मंत्र्यांची उपस्थित राहील. अकोला शहर व ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत विरोध असल्याची    विचारणा    केल्यावर    त्यांनी   सर्वच राजकीय पक्षात गटबाजी असल्याचे कारण पुढे करीत गटबाजी    असल्याचे    अप्रत्यक्षपणे  मान्य केले. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भात अधिकाधिक जागांची मागणी करणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले.
बुधवारी रात्री झालेल्या या पत्रकार परिषदेची माहिती शहर अध्यक्ष अजय तापडिया यांना देण्यात आली नव्हती. जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे यांनी मंत्र्यांच्या सांगण्यावरून पत्रकार परिषद घेतल्याचा दावा केला. या सर्व घडामोडीत पक्षातील गटबाजीचे उघड दर्शन सर्वाना झाले.