भारतीय दंड विधान संहितेत ५११ कलम परिचयात असताना कायद्याच्या चौकटीतून कशी सुटका करून घ्यावी आणि कोणती दक्षता घ्यावी यासाठी गुन्हेगारांनी आपापले तंत्र विकसित केल्याचे दिसते. याचाच परिपाक म्हणजे ‘ड्राप’ समजला जातो. अर्थात, ही प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी एखाद्या लोभी व्यक्तीला फसवणूक करणारे जाळ्यात ओढतात. विशेष म्हणजे ड्राप हा शब्द दरोडेखोर यांच्यामार्फत वापरला गेला आणि पोलीस यंत्रणेमार्फत त्याच नावाने ओळखला आणि बोलला जातो.
येवला येथे अलीकडेच पडलेले दरोडे आणि ५० लाखांच्या लुटीच्या घटनेमुळे गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. उपरोक्त प्रकारांमध्ये गुन्हे दाखल होऊन संशयितांचा शोधही सुरू आहे. परंतु, ड्रापसारख्या घटना येवल्यासह अनेक भागांत घडत असुनही त्याचे गुन्हे अपवादाने दाखल होतात. त्याचे कारण अर्थात वेगळे आहे. ही बाब खुद्द पोलीस अधिकारी मान्य करतात. ड्रापच्या माध्यमातून करोडोंची माया मुद्देमालासह सहज पचविता येण्यासाठी येवला तालुका दरोडेखोरांचे जणू नंदनवन बनले आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील चार्टर्ड अकाऊंटट्स ललित मंडलेचा, जिल्हा परिषद सदस्य बाजीराव साळवे यांचा बळी घेतल्यानंतर दरोडेखोरांचे थैमान सुरू राहिले. नववसाहती, पेट्रोलपंप, सॉ मिल यांवर यशस्वी दरोडे टाकल्यानंतर दरोडेखोरांनी ड्रापचे विशिष्ट तंत्र आत्मसात केल्याचे निदर्शनास येते. मागील १० ते १५ वर्षांपासून ते या तंत्राचा वापर करत आहेत. त्यासाठी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अंदरसुल, पठेगाव व उंदीरवाडी अशा आसपासच्या शिवारांची निवड केली जाते. ही मंडळी मुंबई, कोलकाता, इंदूर, अहमदाबाद या भागांतील ठेकेदारांकडे मजुरीसाठी दाखल होतात. शहरात विशेषत: जलवाहिनी, केबल किंवा चुनावाडा घरे पाडण्याच्या कामावर मजुरी करतात. या काळात स्थानिक पातळीवरील लोभी धनदांडग्यांची मर्जी संपादित करतात. मला सोने सापडले ते खरे आहे का अथवा घाबरत घाबरत काही कौटुंबिक समस्या, हुंडय़ाचा प्रश्न अशी काही कारणे दिली जातात.
अशा जाळ्यात स्थानिक व्यक्ती अलगदपणे अडकतो. मग या व्यक्तीला गावकुसाबाहेर असलेल्या संबंधितांच्या वस्तीवर किंवा निर्जनस्थळी नेले जाते. पोलीस आपल्या मागावर नाही ना याची पूर्ण खात्री केली जाते. एकदा परिस्थिती नियंत्रणात आली असा विश्वास झाला की विशिष्ट आवाज काढून आपल्या साथीदारांना बोलाविले जाते. त्या व्यक्तीला धमकावत त्याच्याकडील मुद्देमाल, चीजवस्तू हिसकावून घेतल्या जातात. काही वेळा तर ती व्यक्ती सहज मुख्य रस्त्याला लागू नये यासाठी अंगावरील कपडेही काढले जातात. यामुळे पोलिसांकडे जाण्यास विलंब होतो. जवळचे पोलीस ठाणे म्हणून तो अंदरसुल किंवा अन्य ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो तर पोलीस ठाण्यात हद्दीचा वाद उपस्थित होतो. त्यातही पोलिसांकडून शरीरावरील झालेल्या जखमेच्या अवलोकनानुसार गुन्हा नोंदविला जातो, पण फ सवणुकीत रक्कम छोटी किंवा मोठी असो कलम ४२० अंतर्गत तो एकच मानला जातो.
या कलमानुसार किमान पाच जणांहून अधिक जण सहभागी असल्यास गुन्ह्य़ास दरोडय़ाचा उल्लेख केला जातो. प्राणहाणी नसल्यास १० वर्षांपर्यंत, जबरी चोरीत सात वर्षे तर ‘ड्राप’ अर्थात फसवणुकीच्या गुन्ह्य़ात तीन ते चार वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. ड्रापमध्ये फसणारादेखील एक गुन्हेगार असतो. ते जर टाळायचे असेल तर पोलिसांकडून ‘आपण आयकर भरला आहे का?’ यासारख्या विविध प्रश्नांच्या भडिमारामुळे तो त्रस्त होतो आणि नामुष्की ओढवून घेण्यापेक्षा तो शांत राहणे पसंत करतो. याचा फायदा गेल्या काही वर्षांपासून भामटे घेत आहेत. ड्राप प्रकारात अडकणाऱ्याची स्थिती ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ अशी होत असल्याचे लक्षात येते.