शहरात बनावट पावतीद्वारे पारगमन शुल्क वसूल केले जात असल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पालिकेचे कर उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, साहाय्यक आयुक्त पल्लवी शिरसाठ व जकात अधीक्षकांसह संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसह प्रसंगी दोषी व्यक्तींच्या निलंबनाचाही प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाईल, असे आश्वासन आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिले.
महापालिका क्षेत्रातील चितोड नाक्यावर बनावट पावतीद्वारे पारगमन शुल्क वसुली होत असल्याचे पुराव्यासह दाखविल्याचे सांगत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त जीवन सोनवणे यांनाच धारेवर धरले. या प्रकरणात प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या १६ कर्मचाऱ्यांची खात्यांतर्गत चौकशी सुरू झाली आहे. दरम्यान, पाच जणांवर गुन्हाही दाखल झाला आहे.
एवढेच नव्हे तर या प्रकरणाचा सीआयडीमार्फत तपास करावा, असा ठराव महापालिकेने मंजूर केला आहे. या सर्व प्रकरणांत उपायुक्त डॉ. पठारे यांना अभय देण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय शिवसेनेने व्यक्त केला आहे.