डॉ. वसंतराव देशपांडे नाटय़गृहाची नव्याने उभारणी करण्यात येणार असून प्रेक्षक क्षमता पाचशेने वाढवून ती दीड हजार करण्यात येणार आहे. तसेच नागभवन परिसरात आवश्यक सुविधांसह नवीन विश्रामगृह बांधण्यात येणार आहे.
यासंबंधीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने १५ दिवसात सादर करावा, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
नागपूर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री व सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, वित्त व नियोजन राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या उपस्थितीत मंगळवारी विधानभवनात बैठक झाली. या बैठकीत दोन्ही कामांचा आढावा घेण्यात आला. दीड हजार प्रेक्षक बसतील अशा सुसज्ज नाटय़गृहाची मागणी अनिल देशमुख यांनी केली. डॉ. देशपांडे सभागृहाच्या मागील बाजूस असलेले जुणे निवासस्थान पाडून नवीन नाटय़गृह बांधावे, वाहनतळाचीही व्यवस्था करावी, भविष्यात वाढीव बांधकाम करावयाचे झाल्यास त्यासाठी संकल्पनेतच आवश्यक तरतूद करावी, असे भुजबळ यांनी सुचविले.
नाग भवन विश्रामगृह १९०४ साली बांधलेले असून ती इमारत पाडून अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी २४ कक्ष, परिसरात उद्यान व कार पार्किंगची सुविधा असलेले विश्रामगृह बांधण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिले. बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव रा.भा. गाडगे, बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अजित सगणे, अधीक्षक अभियंता व्ही.आर. बरगीनवार, कार्यकारी अभियंता पी.डी. नवघरे, उपविभागीय अभियंता बांधवकर आदी उपस्थित होते.