जुळे सोलापूर किंवा मजरेवाडीसारख्या दाट लोकवस्ती असलेल्या भागात पिण्याच्या पाण्याची पुरेशा प्रमाणात सुविधा अद्याप झाली नसताना महापालिका स्थायी समितीने त्याकडे लक्ष देऊन सुविधा पुरविण्याऐवजी लोकवस्तीच नसलेल्या भागात जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यात संबंधित जमीनमालकाला श्रीमंत करण्याचा हेतू दिसत असल्याचा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केला आहे.
पालिका स्थायी समितीची बैठक समितीचे सभापती कोंडय़ाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी आदित्यनगर ते नवीन डोणगाव नाका या दरम्यान २७ लाख ६९ हजार खर्च करून पिण्याच्या पाण्यासाठी वाहिनी टाकण्याचा ठराव मंजूर झाला. वास्तविक पाहता या संपूर्णत: परिसरात अभावानेच लोकवस्ती दिसते. त्यामुळे या प्रस्तावाला भाजपचे सदस्य नरेंद्र काळे यांनी कडाडून विरोध केला. या ठिकाणी लोकवस्ती आहे का, असल्यास किती आहे, याठिकाणी घालण्यात येणारी जलवाहिनी किती लांबीची आहे, याचा उलगडा होत नाही, असा हरकतीचा मुद्दा नगरसेवक काळे यांनी उपस्थित केला. त्यावर प्रशासनाला एकाही मुद्यावर समाधानकारक उत्तर देता आले नाही, असे नगरसेवक काळे यांनी सांगितले.
ज्या भागात लोकवस्ती आहे, तेथे गेल्या २० वर्षांपासून महापालिकेने स्थानिक मिळकतदारांकडून कायदेशीर कर वसूल करूनदेखील विविध पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या नाहीत. याउलट, पालिकेतील सत्ताधारी मंडळींचे हितसंबंध जोपासण्यासाठी व सदर लोकवस्ती नसलेल्या परिसरातील जागेचा दर वाढविण्यासाठी व त्यातून माया कमावण्यासाठी गरज नसताना जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप नगरसेवक काळे यांनी केला.