परभणी लोकसभा मतदारसंघातून एकदा निवडून आलेला माणूस दुसऱ्या वेळी चालत नाही, असे कोठे तरी वाचले होते, अशा मार्मिक शब्दांत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आमदार सुभाष देसाई यांनी खासदार गणेश दुधगावकर यांना सेनेची उमेदवारी मिळणार नसल्याचे संकेत दिले. सेनेच्या प्रतिज्ञादिनाच्या पूर्वतयारीसाठी देसाई येथे आले होते.
मराठवाडय़ातील लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पदाधिकाऱ्यांची बैठक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नुकतीच घेण्यात आली. त्या वेळी परभणीचे खासदार दुधगावकर गैरहजर होते. त्यामुळे दुधगावकर शिवसेनेला ‘नॉट रिचेबल’ अशी चर्चा सुरू झाली होती. या पाश्र्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची स्वतंत्र भेट घेऊ, असे दुधगावकर यांनी म्हटले होते. शुक्रवारी झालेल्या बैठकीनंतर दुधगावकरांनी सेना भवनात हजेरी लावली का, असे देसाई यांना विचारले असता, ‘ते स्वतंत्रपणे पक्षप्रमुखांना भेटले असतील तर माहीत नाही. पण मी असे वाचले आहे की, तेथून निवडून आलेला माणूस दुसऱ्या वेळी चालत नाही,’ असे उत्तर देसाई यांनी दिले.
‘आप’चा परिणाम जाणवलाच तर तो काँग्रेसलाच जाणवेल, असेही ते म्हणाले. ‘एमआयएम’ या राजकीय पक्षाची भूमिका कोणाला घातक किंवा कोणासाठी उपयुक्त हे कळायला आणखी काही काळ जावा लागेल. सार्वजनिक निवडणुका झाल्यानंतरच त्यांची शक्ती कळेल. त्यामुळे आताच त्यांच्या विषयी आकलन करता येत नाही. निवडून आलेल्या खासदारांपैकी बहुतेकांची उमेदवारी नक्की आहे. त्यातील काही अपवाद असतील, असेही त्यांनी सांगितले.