उल्हासनगर येथील चांदीभाई महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी जवळच असलेल्या किसनचंद चेलाराम या मूकबधिर शाळेतील मुलांना बुधवारी सकाळी मनोरंजक प्रयोगांच्या माध्यमातून वैज्ञानिक संज्ञा समजावून दिल्या.  
निरनिराळ्या वैज्ञानिक संज्ञा व्यावहारिक प्रयोगांच्या माध्यमातून समजून घेतल्या तर नीट समजतात. उल्हासनगर येथील चांदीभाई महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक भगवान चक्रदेव यांनी दैनंदिन जीवनातील उदाहरणांचा वापर करून असे शेकडो प्रयोग तयार केले आहेत. चांदीभाई महाविद्यालयातील विद्यार्थी त्या प्रयोगांचा उपयोग करीत आहेतच, पण त्यांच्या आधारे परिसरातील विशेष मुलांनाही विज्ञान समजून सांगण्याचा प्रयत्नही ते दरवर्षी करीत आहेत. यंदा उल्हासनगरमधीलच किसनचंद चेलाराम शाळेतील मूकबधिर मुलांना प्रयोग दाखविण्यात आले. प्रा. चक्रदेव यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या द्वितीय वर्षांत शिकणाऱ्या २० विद्यार्थ्यांनी त्यात भाग घेतला. प्रकाश किरणांचे परावर्तन-अपरावर्तन, न्यूटनचा झोपाळा, चुंबकीय शक्तीचे परिणाम, आरशांमधील गुणित प्रतिमा, केंद्रोत्सारी बल आदी वैज्ञानिक संज्ञा प्रयोगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आल्या. मूकबधिर विद्यार्थ्यांनी या उपक्रमास चांगला प्रतिसाद दिला. त्यांनी उत्साहाने पुढे येत प्रयोग करूनही पाहिले. निवृत्तीनंतर विज्ञान प्रसाराचे व्रत अंगीकारलेले प्रा. चक्रदेव अंबरनाथमध्ये मराठी विज्ञान परिषदेच्या माध्यमातून नियमितपणे शालेय विद्यार्थ्यांना निरनिराळे वैज्ञानिक प्रयोग विनामूल्य शिकवितात. तसेच विविध ठिकाणी व्याख्याने आणि प्रात्यक्षिकेही सादर करतात.