जिल्ह्य़ातील प्रत्येक तालुक्यात तीन गावे निवडून त्यात मनरेगाच्या योजना राबवून ही गावे आदर्श होण्यासाठी यावर्षीपासून प्रयत्न करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी दिली.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची व्यापक स्वरूपात प्रसिद्धी व्हावी व अधिकाधिक लोकापर्यंत ही योजना पोहचावी या उद्देशाने जिल्ह्य़ातील ग्रामीण पत्रकारांच्या कार्यशाळेचे आयोजन जिल्हा परिषदेच्या आबासाहेब खेडकर सभागृहात करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. अभिषेक कृष्णा म्हणाले, ही योजना सुरू होऊन आठ वर्षे झाली असून आता व्यापक प्रमाणामध्ये ही योजना लोकांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. मागेल त्याला काम देणारी ही योजना ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनात स्थैर्य निर्माण करणारी आहे. कामाचे मोजमाप करून त्या आधारावरच मंजुरी दिली जाते. या योजनेच्या यशस्वीतेसाठी सगळ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्ह्य़ातील मनरेगांतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेताना शिवाजीराव जोंधळे म्हणाले, मनरेगांतर्गत १२५० विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. या विहिरींना तातडीने विद्युत पुरवठा होणे आवश्यक असून यासंदर्भात पाऊले उचलली जातील. या योजनेअंतर्गत जिल्ह्य़ात १६ हजार शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी प्रतिलाभार्थी १२ हजार रुपये अनुदान देय आहे. या अनुदानातील तीन हजार रुपये तातडीने लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत. काम सुरू झाल्यानंतर उर्वरित निधी दिला जाईल.तसेच ग्रामीण भागात शौचालयाच्या बांधकामासाठी काही कंपन्यांनी पुढाकार घेतल्यास त्यांनाही कामाची परवानगी दिली जाईल. सुजाता गंधे यांनी मनरेगाची कार्यपद्धती, मजुरांची नोंदणी, ग्रामपंचायत व ग्रामसभेची भूमिका या विषयावर प्रकाश टाकला.