अधिवेशनानिमित्त मंत्र्यांची, आमदारांची आणि अधिकाऱ्यांची निवास व्यवस्था रविभवन, नागभवन, आमदार निवास, १६० खोल्यांच्या गाळ्यात करण्यात आली असली तरी शहरातील सर्व हॉटेल्स बुक झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सिव्हील लाईन भागातील हॉटेल हेरिटेज, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने तुली इंटरनॅशनल, तुली इम्पिरियल आणि सेंटर पॉईंट, तर भाजपने हॉटेल प्राईड आणि हॉटेल एअरपोर्ट सेंटर पॉईंट या ठिकाणी व्यवस्था केली आली असल्याची माहिती मिळाली. या संदर्भात हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये चौकशी केली असता ९ ते २२ डिसेंबर या काळात हॉटेलमधील पाचवा, सहावा आणि सातवा मजल्यावरील सर्व खोल्यांचे बुकिंग झाल्याचे सांगण्यात आले.
तीन दिवसांनी सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर शहर गजबजू लागले असताना विविध पक्षनेते, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारीही उपराजधानीत दाखल होत असताना विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचीही गर्दी दिसून येत आहे. रविभवन, रामगिरी, देवगिरी, आमदार निवास, सचिवालय परिसर, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयात लगबग वाढली असून शासकीय वाहनांचा ताफा दिसून येत आहे.
एकीकडे गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढत असतानाच दुसरीकडे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर शहरात राजकीय वातावरणही तापू लागले आहे. शहरातील विविध भागात मंत्र्यांच्या स्वागतासाठी विविध राजकीय पक्षांचे पोस्टर्स, होर्डिग्ज लावण्यासाठी कार्यकर्त्यांंची धडपड सुरू आहे. विेशेषत वर्धा मार्गावर आणि विधिमंडळ परिसरात काही विशिष्ट जागा मिळविण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी महापालिकेकडे अर्ज केले आहेत. जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे बॅनर्स शहरातील विविध भागात झळकत आहेत. त्यामुळे शहरात पोस्टर्स युद्ध सुरू आहेत की काय, असे भासायला लागले आहे. विधिमंडळ परिसरात ठिकठिकाणी कठडे बांधणे सुरू आहे. विधानभवन परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून ओळखपत्राशिवाय कोणालाही आत प्रवेश दिला जात नाही.
अधिवेशन काळात सर्वाधिक मोर्चे यशवंत स्टेडियमवरून निघणार आहेत. सीताबडीवरील झिरो माईलजवळ मोर्चे येणार असल्यामुळे त्या भागात मोर्चे अडविण्यासाठी कठडे बांधणे सुरू करण्यात आले आहे. शिवाय, पोलिसांसाठी तंबू उभारले जात आहेत. प्रत्येक संघटनेच्या मोर्चासाठी जागा ठरवून दिल्या असल्याने त्याच ठिकाणी ते येतील, याची काळजी पोलिसांकडून घेतली जात आहे. अधिवेशन काळात मोच्र्यामुळे दुपारी १२ नंतर या भागातील वाहतूक बंद केली जाणार आहे. सुरक्षेसोबतच शहराच्या सौदर्यीकरणाचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. शहरातील अनेक रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत असून काही ठिकाणी खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. रस्ते दुभाजकांना पिवळा व काळा रंग लावण्याचे काम वेगात सुरू आहे. झाडांना नित्यनेमाने पाणी देणे सुरू असून फुलझाडांची देखरेख आणि कापणी सुरू आहे. वर्धा मार्गावरील रस्त्यावरची साफसफाई दिवसातून दोन वेळा, तर सिव्हील लाईन भागातील रस्त्याची डागडुजी आणि स्वच्छता केली जात आहे. जे सिग्नल बंद आहे ते दुरुस्त केले जात आहेत. मंत्र्याच्या गाडय़ांचा सामान्यांना त्रास होऊ नये यासाठी पोलीस दल त्या दृष्टीने सुरक्षा व्यवस्थेची तयारी करीत आहेत. जिल्हाधिकारी व सचिवालय परिसरात अधिकाऱ्यांना ने-आण करण्यासाठी राज्यातील विविध भागातून दोन हजारावर गाडय़ा मागविण्यात आल्या असून त्यातील १२०० च्या जवळपास गाडय़ा नागपुरात पोहोचल्या आहेत. नागपूरबाहेरून अधिकाऱ्यांसाठी विविध विभागाच्या गाडय़ा मागविण्यात आल्यामुळे गाडय़ाची संख्या मोठय़ा प्रमाणात दिसून येत आहे. सध्या जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त, सचिवालय, रविभवन, आमदार निवास या भागात या गाडय़ा दिसून येत आहे.
एलआयसी व रिझर्व चौक क्वार्टर परिसरात धरणे आंदोलन करण्यासाठी मंडप उभारण्यात येत आहेत. अनेक कर्मचारी संघटना, सामाजिक संघटनांच्या न्याय मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करीत असतात. वर्षांनुवर्ष मागण्या मान्य होत नसल्यामुळे अनेकजण अधिवेशन काळात आत्मदहनाचे इशारे देत असतात. त्यासाठी पोलीस दल सतर्क आहेत. शहरात ठिकठिकाणी पोलिसांची वाहने गस्त घालताना दिसत आहेत. रेल्वे स्थानक आणि विमानतळावरून अधिकाऱ्यांना आण्ण्यासाठी वाहनांची गर्दी दिसून येत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Dec 2013 रोजी प्रकाशित
अधिवेशन तोंडावर आल्याने लगबग वाढली
अधिवेशनानिमित्त मंत्र्यांची, आमदारांची आणि अधिकाऱ्यांची निवास व्यवस्था रविभवन, नागभवन, आमदार निवास, १६० खोल्यांच्या

First published on: 07-12-2013 at 01:14 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flurry increased due to assembly session ahead