30 November 2020

News Flash

मारबत, बडग्यांच्या मिरवणुकांनी शहर दुमदुमले

डीजे आणि ढोल ताशांच्या निनादात स्वतंत्र विदर्भाला लुटणारा नेता , बलात्कारी बडग्या, चीनी वस्तू हटाओ, दहशतवादी अब्दूल करीम टुंडा, भ्रष्टाचारी नेता

| September 7, 2013 03:46 am

डीजे आणि ढोल ताशांच्या निनादात स्वतंत्र विदर्भाला लुटणारा नेता , बलात्कारी बडग्या, चीनी वस्तू हटाओ,  दहशतवादी अब्दूल करीम टुंडा, भ्रष्टाचारी नेता आणि एफडीआय आदी विषयांवर तयार करण्यात आलेल्या ११ बडग्यासह ऐतिहासिक काळी व पिवळी मारबतीची मिरवणूक आज उत्साहात काढण्यात आली. निघालेल्या ११ बडग्यांपैकी आसाराम बापू, स्वतंत्र विदर्भाला विरोध करणारे नेत्यांचे दोन बडगे मिरवणुकीचे खास आकर्षण होते. ‘घेऊन जारे मारबत’, अशा घोषणा देत समाजातील अनिष्ट प्रथांचा यावेळी विरोध केला.
विदर्भाचे सांस्कृतिक वैभव आणि परंपरा जपत गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील अनिष्ट प्रथाचे उच्चाटन करण्याच्या हेतूने दरवर्षी तान्हा पोळ्याच्या दिवशी निघणाऱ्या ऐतिहासिक काळ्या, पिवळ्या मारबतींसह विविध सामाजिक प्रश्नांवर खास तयार केलेल्या प्रतिकात्म बडग्यांची जंगी मिरवणूक पाहण्यासाठी तुफान गर्दी उसळली होती. मस्कासाथ, शहीद चौक, टांगा स्टँड, इतवारी, गांधी पुतळा, बडकस चौक महाल शिवाजी पुतळा या भागात पाय ठेवायलाही जागा नव्हती. डीजेवर वाजविल्या जाणाऱ्या गीतांवर तरुणाई बेधुंद नाचत होती. यावर्षी छोटे मोठे ११ बडगे आणि ६ मारबती सहभागी झाल्या होत्या. या माध्यमातून भ्रष्टाचार, महागाई, दहशतवाद, स्वतंत्र विदर्भ, एफडीआय, चीन वस्तूंवरील बंदी आणि सध्या गाजत असलेल्या आसाराम बापूंवर यथार्थ टीका करण्यात आली. जनता दल (युनायटेड)ने स्वतंत्र विदर्भाचा विरोध करणाऱ्या नेत्यांचा बडगा काढून निषेध केला. मस्कासाथ भागातील छत्रपती शिवाजी पार्क बडग्या उत्सव मंडळाचा ‘चीनी वस्तू हटाओ देश बचाओ’ हा बडग्याही चर्चेचा विषय ठरला. दहशतवादी टुंडाचा बडग्याही खास आकर्षण ठरला. मासूरकर चौकातील बाल विद्यार्थी बडग्या उत्सव मंडळाने भूखंड घोटाळा करणारा नेता, खैरीपुरा मित्र बडग्या उत्सव मंडळ व विदर्भ क्रांती दलाने महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचा बडग्या तयार केला होता. दक्षिण नागपुरातही मारबत मिरवणूक काढण्यात आली. यात डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या करणाऱ्या आणि महिला पत्रकारावर अत्याचार करणाऱ्यांचा बडग्या तयार करून आरोपींचा शोध न घेणाऱ्या पोलिसांचा निषेध करण्यात आला. या ठिकाणी आसाराम बापूचा बडग्या तयार करण्यात आला होता मात्र पोलिसांनी तो लगेच जप्त केला. तत्पूर्वी सकाळी तऱ्हाने तेली समाजतर्फे काढण्यात येणारी पिवळ्या मारबतीची व नेहरु पुतळा येथील श्री देवस्थान पंचकमेटीतर्फे काढण्यात आलेल्या काळ्या मारबतीची पूजा करण्यात आली. त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. काळी व पिवळी मारबत एकाचवेळी निघाल्यावर नेहरू चौकात एकत्र आल्या होत्या. शहीद चौक, गांधी चौक, बडकस चौक, शिवाजी पुतळा, चिटणीस पार्क, अग्रेसन चौक, जागनाथ बुधवारी, हंसापुरी मार्गे पिवळी नदीवर मारबतीचे विसर्जन करण्यात आले.
दुपारी १२.३० च्या सुमारास पिवळी मारबत शहीद चौकात आल्यानंतर परिसर ढोल ताशांच्या निनादात दुमदुमुन गेला होता. मिरवणुकीदरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी मिरवणुकीच्या मार्गावर सकाळी १० वाजेपासून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2013 3:46 am

Web Title: huge crowd gathered to see statue of different social issue in procession at nagpur
Next Stories
1 विदर्भातील व्याघ्रप्रकल्पांसाठी आता ऑनलाइन बुकिंग सुरू
2 राहुल गांधींच्या दौऱ्यामुळे शहर काँग्रेसमध्ये उत्साह
3 वीज प्रकल्पांनी घेरलेल्या चंद्रपूरचे नवे ‘रेशीमबंध’
Just Now!
X