वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करताना केवळ पैसा हे उद्दिष्ट न ठेवता मानव हिताच्या दृष्टीने काम करणे गरजेचे असल्याचे सांगताना, केवळ शिक्षण देणे हा उद्देश न ठेवता सुसंस्कृत व जागतिक दर्जाचा नागरिक घडवण्याचे कार्य कृष्णा अभिमत विद्यापीठाने साधले असून, त्याचे या भागासाठी मोठे योगदान राहिल्याने हे नियमित विद्यापीठ व्हावे असे मत पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील यांनी व्यक्त केले.
कराडनजीकच्या मलकापूर येथील कृष्णा अभिमत विद्यापीठाचा दुसरा दीक्षान्त समारंभ शिवराज पाटील यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते. माजी मंत्री आमदार दिलीपराव देशमुख, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील, कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष मदनराव मोहिते, डॉ. सुरेश भोसले, कुलगुरू डॉ. जे. एच. जाधव, उपकुलगुरू डॉ. ए. व्ही. नाडकर्णी, वैद्यकीय संचालक जी. वाय. क्षीरसागर, डॉ. एम. व्ही. घोरपडे, अतुल भोसले यांची या वेळी उपस्थिती होती.
शिवराज पाटील म्हणाले, की कराड छोटे शहर असूनही यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे ते देशपातळीवर पोचले आहे. त्या शहराच्या विकासात कृष्णा विद्यापीठाची भर पडली आहे. विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यांचे दौरे करत असताना मुलांपेक्षा मुलीच हुशार असल्याचे दिसून येते. कृष्णा विद्यापीठामध्ये बाहेरील देशांतील ६९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यावरून विद्यापीठाचा विस्तार व दर्जा लक्षात येतो. ग्रामीण भागाच्या बदलासाठी या विद्यापीठाच्या माध्यमातून प्रयत्न झाले पाहिजेत. समाजाला माणुसकीची गरज असल्याने शिक्षण पद्धतीमध्ये पुस्तकी ज्ञानाबरोबर संस्कार होणे गरजेचे आहे. त्यासाठी जुन्या शिक्षण पद्धतीचा संदर्भ घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, की विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह परदेशातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नवनवीन अभ्यासक्रमाच्या माध्यमातून संशोधनाद्वारे आंतरराष्टीय दर्जाचा नागरिक घडविण्याचे काम हे विद्यापीठ करते. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी शिकवली जाते. प्रास्ताविक  डॉ. ए. व्ही. नाडकर्णी यांनी केले.