मराठीचा सुपरस्टार म्हणून उदयास येत असलेल्या सिध्दार्थ जाधवचे नाटक, अशी ओळख असणाऱ्या ‘जागो मोहन प्यारे’ या नाटकाचे जोरदार पुनरागमन होत असून येत्या २६ जानेवारीला पुणे व िपपरी-चिंचवडमध्ये एकाच दिवशी तीन प्रयोग होत आहेत. तब्बल ५०० पेक्षा अधिक प्रयोगांचा टप्पा ओलांडल्यानंतर अंतर्गत मतभेदांमुळे जवळपास अडीच वर्षे बंद पडलेले नाटक परत रंगभूमीवर आल्याने ते पाहण्याची संधी सिध्दार्थच्या चाहत्यांसह नाटय़प्रेमी रसिकांना पुन्हा उपलब्ध झाली आहे.
यशासाठी झगडत असतानाच्या काळात सिध्दार्थला ‘जागो मोहन’ ने मोठा आधार दिला तसेच ओळखही मिळवून दिली होती. महेश मांजरेकर यांनी ‘दे धक्का’ चित्रपटात सिध्दार्थला संधी दिली. त्या चित्रपटाला मिळालेल्या दणदणीत यशानंतर सिध्दार्थला ‘स्टार’ वलय मिळाले व त्याचा सर्वाधिक फायदा नाटकाला झाला. अल्पावधीत नाटकाचे मोठय़ा संख्येने प्रयोग होऊ लागले व त्यास रसिकांचा भरघोस प्रतिसादही मिळू लागला व हा-हा म्हणता ‘जागो’ ने ५०० प्रयोगांचा टप्पा गाठला. २५ जानेवारी २०१० ला मुंबईतील शिवाजी मंदिरात या निमित्ताने मोठा सोहळा झाला. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, महेश मांजरेकर यांच्यासह मराठी नाटय़-चित्रपटसृष्टीतील नामवंत मंडळींच्या उपस्थितीत ५०० वा प्रयोग धडाक्यात झाला. मात्र, त्यानंतर ‘जागो’ टीममधील अंतर्गत धुसफूस वाढू लागली, तसे नाटकाचे प्रयोग कमी होत गेले. पुढे कलाकारांमध्ये बदल झाले व काही कालावधीतच नाटकाचे प्रयोग पूर्णपणे थांबले.
भरत जाधवचे ‘सही रे सही’, मकरंद अनासपुरेचे ‘केशवा-माधवा’, संजय नार्वेकरचे ‘आधी बसू, मग बोलू’, प्रशांत दामलेचे सध्याचे ‘माझ्या भाऊजीची रीत कळेना’ अशी स्टार व त्यांच्या नाटकांची समीकरणे मांडली जातात. सिध्दार्थचे नाटक म्हणून ‘जागो मोहन प्यारे’ ची ओळख होती. नाटक का बंद झाले, अशी विचारणा सर्व ठिकाणी होत होती. नाटक पुन्हा सुरू करण्याची मागणी होत होती. मात्र, बऱ्याच कालावधीनंतर महत्त्वाचे बदल करत नाटक हे पुन्हा रंगभूमीवर आणण्यात आले आहे. २६ जानेवारीला पुण्यात भरत नाटय़मंदिर, बालगंधर्व तसेच चिंचवडला रामकृष्ण मोरे नाटय़गृहात प्रयोग होत आहेत. पुनरागमन करणाऱ्या सिध्दार्थला रसिकांकडून कसा प्रतिसाद मिळतो, याकडे नाटय़क्षेत्राचे लक्ष लागले आहे.