नाव गणेश असले तरी कल्याण पूर्वेकडच्या या तलावात त्या मंगलमूर्तीच्या लौकिकास साजेसे काहीच नाही. उलट निर्माल्य आणि परिसरातील नागरिकांनी टाकलेल्या कचऱ्यामुळे कमालीची अमंगल अवकळा या तलावास आली आहे.
इतर तलावांप्रमाणे येथेही गणेशोत्सवात गणेश मूर्तीचे विसर्जन होते. त्यामुळे दरवर्षी त्याआधी तलावाची होणारी तात्पुरती स्वच्छता सोडल्यास वर्षभर कल्याण पुर्वेतील या तलाव्याची अवस्था उकिरडय़ासारखी असते. निर्माल्यांचा खच आणि गणेशमूर्तीचा गाळाने भरलेला हा तलाव कचरा टाकण्याचे ठिकाण बनले आहे. महापालिका प्रशासनाचा गलथान कारभार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेमुळे हा तलाव नामशेष होण्याची भीती पर्यावरणप्रेमी व्यक्त करीत आहेत.   
कल्याण पूर्व विभागात विठ्ठलवाडी स्थानकाजवळच पुणे लिंक रोड लगतच गणेश विसर्जन तलाव आहे. तलाव आकाराने लहान असला तरी या भागातील नागरिकांसाठी ते एक विरंगुळ्याचे ठिकाण होते. महापालिकेने काही वर्षांंपूर्वी काठ बांधल्यामुळे तलावास चांगली झळाळी मिळाली होती. मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये मात्र या तलावाची देखभाल दुरुस्ती केली गेली नसल्यामुळे हा तलाव कचऱ्याच्या विळख्यात सापडू लागला. वर्षांनुवर्षे गणेश मुर्तीचे विसर्जन केल्याने हा तलाव गाळाने भरला आणि त्याची खोली कमी होऊ लागली. शिवाय परिसरातील नागरिक निर्माल्य टाकण्यासाठी या तलावाचा वापर करून लागल्याने तलावाच्या दुर्दशेत भर पडली. हल्ली तर  गॅरेज आणि तबेलेवालेही त्यांचा कचरा तर शेजारील इमारतींचे सांडपाणीही थेट तलावात सोडले जात असल्याने तलावाची अवस्था अतिशय वाईट झाली आहे.   
लोकप्रतिनिधी गेले कुठे..
मतदार संघाच्या नव्या रचनेमुळे कल्याण पूर्व विभागास स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ मिळाला आहे. इथून निवडून आलेले आमदार या तलावाच्या सौदर्यीकरणाकडे लक्ष देतील, अशी अपेक्षा होती. मात्र ती पुर्णपणे फोल ठरली आहे. गणेशोत्सवाच्या काळात याच तलावाच्या काठावर मांडव टाकून लोकांचे सत्कार स्विकारणारे लोकप्रतिनिधी गणेशोत्सव सरला की या तलावाकडे कधीच फिरकत सुध्दा नाहीत. विशेष म्हणजे महापौरपदी निवडून आल्यानंतर ‘स्वच्छ कल्याण सुंदर कल्याण’ साठी प्रयत्न करू असे सांगणाऱ्या कल्याणी पाटीलही याच भागात राहतात.
तातडीने कचरा रोखणे आवश्यक  
कल्याण पूर्वेत पर्यावरण स्नेही क्षितीज या संस्थेने गणेश विसर्जन तलावात होणाऱ्या निर्माल्याची घाण रोखण्यासाठी ‘निर्माल्य दान करा’ उपक्रम सुरू केला होता. मात्र वर्षांच्या बारा महिने होणारा कचरा रोखणे मात्र या मंडळींच्या ताकदी पलिकडचे काम असून महापालिका प्रशासनानेच याकडे लक्ष देण्याची गरज आहे.