कृष्णा साखर कारखान्याच्या प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी काहींना कारखाना शॉर्ट मार्जिनमध्ये गेल्याचा साक्षात्कार होतो. शॉर्ट मार्जिनची भाषा करणाऱ्यांना सभासदांनी शॉर्ट सर्किट केल्यामुळेच सभेपूर्वी शॉर्ट मार्जिन, शॉर्ट मार्जिन असा आभास त्यांना होत असल्याची टीका करताना कृष्णा कारखाना कोणत्याही प्रकारच्या शॉर्ट मार्जिनमध्ये नसल्याचे कारखान्याचे अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी ठासून सांगितले. कारखाना यंदा उसाचे एककांडेही गेटकेन आणणार नसून, केवळ कारखाना कार्यक्षेत्रातील उसाचेच गाळप करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या ५७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. ‘कृष्णा’चे उपाध्यक्ष सुरेशराव पाटील व संचालकांसह माजी जिल्हा परिषद सदस्य पहिलवान शिवाजीराव जाधव, कराड पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप पाटील, क्रांती साखर कारखान्याचे संचालक लालासाहेब महाडिक, दाजीराम मोहिते आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
अविनाश मोहिते म्हणाले, की कोणत्याही यंत्रसामग्रीचे विस्तारीकरण न करता केवळ आधुनिकीकरणाच्या जोरावर येत्या हंगामात कृष्णा कारखाना प्रतिदिनी साडेआठ हजार मेट्रिक टन ऊसगाळप करेल. गेल्या सव्वातीन वर्षांपासून कारखान्यावर खऱ्या अर्थाने सर्वसामान्य सभासदांची सत्ता आली आहे. सभासदांच्या आशाआकांक्षांना अनुसरून तसेच, उसाला वेळेवर पाणी, वेळेत तोड व योग्य दर या त्रिसूत्रीप्रमाणे संचालक मंडळाचा कारभार सुरू असल्याचा विश्वास त्यांनी दिला. दोन रुपयेप्रमाणे सवलतीच्या दराने मिळणाऱ्या साखरेमुळे सभासदांना मोठा लाभ मिळत आहे. एवढय़ा कमी दराने सर्वात जास्त साखर पुरवणारा कृष्णा हा एकमेव साखर कारखाना असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला. कारखान्याची सत्ता सर्वसामान्यांच्या हातात असल्याचे मोठे समाधान जनतेत असून, हेच समाधानकारक वातावरण व कारखान्याचा लौकिक वृद्धिंगत करण्याचा आपण व आपले सहकारी कसोशीने प्रयत्न करीत असल्याची ग्वाही अविनाश मोहिते यांनी दिली.
शिवाजीराव जाधव म्हणाले, की परीक्षेत नापास झालेलं पोरगं ज्याप्रमाणे पास झालेल्या पोरांची माप काढत त्याप्रमाणे कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत सर्वात ढोक नंबरला असणारे कारखान्याचे माजी अभ्यासू अध्यक्ष विद्यमान संचालकांवर टीका करत आहेत. त्यांनी दिवाळीला एक रुपया हे दुखवटय़ाप्रमाणे दिलेले बिल सभासद कधीही विसरणार नसल्याचे त्यांनी सुनावले.
एल. एम. पाटील यांनी आपल्या भाषणात कारखान्याच्या कारभाराची माहिती देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवण्यासाठी कारखान्याचे संकेतस्थळ असावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावर अविनाश मोहिते यांनी वेबसाईट तयार करण्याचे काम सुरू असून, दोनच महिन्यांत ते पूर्ण करण्यात येणार असल्याचे व्यासपीठावरच जाहीर केले.