बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने (बीएसई) विदर्भातील १०हजार युवकांना आर्थिक प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शवली आहे. याच तरुणांमधून नवे उद्योजक तयार होणार आहेत. बीएसईने याबाबत प्रस्ताव दिल्यास राज्य सरकार त्याकरिता गुंतवणूक करण्यासंदर्भात विचार करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.  बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मनी बी इंस्टिटय़ूट, नागपूर महानगर पालिका, एल अँड टी व सीडीसीएल यांच्या वतीने आयोजित मनी बी गुंतवणूकदार शिक्षण कार्यक्रम महिन्याचा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
या प्रसंगी बोलताना फडणवीस पुढे म्हणाले की, प्रत्येकाला आपल्या पैशातून संपत्ती निर्माण करता आली पाहिजे व त्यासाठी बॅंकिंग व भांडवली बाजार या दोहोंचे व्यवहार समजून घेतले पाहिजे. या पुढील काळात जो आर्थिकदृष्टय़ा साक्षर तोच खरा सुशिक्षित समजला जाईल. आर्थिक फसवणूक झाल्याच्या अनेक तक्रारी येत असतात. मात्र, आपण आपले पैसे गुंतवणुकीसाठी दुस-याकडे देताना ती व्यक्ती ते पैसे कशात गुंतवणार आहे, याची चौकशीच करीत नाही. आम्हाला आमची मानसिकता बदलण्याची व आर्थिक व्यवहार समजून घेण्याची गरज आहे.
नव्या पिढीने बँकिंगसह भांडवली बाजाराचे ज्ञान मिळवणे आवश्यक आहे. आर्थिक साक्षरतेमधूनच देशाचा विकास होणार असल्याचे ते म्हणाले.
केंद्र शासनाच्या जन-धन योजनेंतर्गत दोन महिन्यात १३ कोटी खाती बँकांमध्ये उघडण्यात आली आहे व साधारणत: ४० कोटी लोक बँकेच्या व्यवहारांच्या अखत्यारित आले आहे. अशाच प्रकारे प्रत्येक व्यक्तीचा आर्थिक व्यवहारात सहभाग झाला पाहिजे.
येणा-या काळात आम्हाला नवउद्योजक व गुंतवणूकदार तयार करावे लागतील. सर्वाधिक तरूण येणा-या काळात आमच्या देशात राहणार आहे व त्या सगळयांना रोजगार देण्याची जबाबदारी आपल्याला पार पाडावी लागणार आहे. वित्तीय संस्थांचे जाळे ज्या भागात जास्त तेथील विकासाचे प्रमाणही जास्त असते. मुंबई, पुणे,ठाणे या भागात विदर्भ व मराठवाडय़ाच्या तुलनेत वित्तपुरवठा करणा-या संस्था जास्त आहे व त्यामुळे तेथील विकासही जास्त झालेला आहे. वित्तीय संस्था लघु व मध्यम उद्योगांच्या दृष्टीने अधिक फायदेशीर ठरतात व त्यातूनच त्या प्रदेशाचा विकास होतो, असेही फडणवीस म्हणाले.
बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान, सीडीसीएलचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पी.एस.रेड्डी, एल अ‍ॅंड टी फायनान्स होल्डिंगचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यशवंत देवस्थळी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, मनी बीच्या संचालिका शिवानी दाणी यावेळी मंचावर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले.
नागपुरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, गुंतवणूकदार, उद्योजक व व्यवस्थापन महाविद्यालयांचे विद्यार्थी कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने उपस्थित होते.